आलिशान जीवनाचा त्याग, कोट्यवधींची संपत्ती नाकारली; व्यापारी कुटुंबातील चौघांनी घेतला संन्यास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 11:18 AM2023-02-14T11:18:23+5:302023-02-14T11:32:20+5:30

एका कुटुंबाने कोट्यवधींचा व्यवसाय सोडून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्या आयुष्यात पैसे कमवावे आणि चांगले जीवन जगावे. पण काही लोक सर्व काही सोडून धर्माच्या मार्गाने पुढे जातात. कष्टाने कमावलेली संपत्तीही ते सोडायला तयार होतात. अशीच घटना समोर आली आहे. गुजरातमधील एका व्यापारी कुटुंबाने असं केलं आहे.

जैन धर्म त्याच्या अहिंसेवरील मूळ विश्वासासाठी ओळखला जातो. या धर्माचे अनेक अनुयायी स्वेच्छेने आपले कुटुंब सोडून त्या तत्त्वांच्या मार्गावर चालण्यासाठी अध्यात्माच्या मार्गावर पुढे जातात. असेच काहीसे गुजरातमधील भुज येथील एका कुटुंबाने केले आहे.

भुजमध्ये जैन धर्मीय लोकांची संख्या मोठी आहे. येथील एका कुटुंबाने कोट्यवधींचा व्यवसाय सोडून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे लोक भुजमधील वागदा भागातील अजरामार संप्रदायाचे आहेत.

दीक्षा घेणार्‍यांमध्ये मुमुक्ष पीयूष कांतीलाल मेहता, त्यांची पत्नी पूर्वीबेन, मुलगा मेघकुमार आणि पुतण्या कृष्णकुमार निकुंज यांचा समावेश आहे. हे सर्वजण श्री कोटी स्थानकवासी जैन संघाच्या अंतर्गत विधिवत भगवती दीक्षा घेतील. यावेळी भव्य समारंभाचे आयोजनही करण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पीयूषभाई पूर्वीबेन यांच्या पत्नीने महासतीजींच्या उपस्थितीत संन्यास घेण्याचा कठीण मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांचा मुलगा मेघकुमार, पती पीयूषभाई आणि चुलत भाऊ क्रिश यांनीही निवृत्तीचा निर्णय घेतला.

संन्यासी होण्याचा निर्णय घेतलेल्या पीयूषभाईंचा भुजमध्ये रेडिमेड कपड्यांचा घाऊक व्यवसाय आहे. त्यांची वार्षिक उलाढाल कोट्यवधींची आहे. याआधी रामवाव कुटुंबातील 19 सदस्यांनीही दीक्षा घेतली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. (सर्व फोटो - न्यूज 18 हिंदी)