Flash Back जुलै २०१४

By admin | Published: December 22, 2014 12:00 AM2014-12-22T00:00:00+5:302014-12-22T00:00:00+5:30

मुसळधार पाऊस पडत असताना पहाटेच्या सुमारास टेकडी खचून आख्खं गाव गाडलं गेल्याची भीषण घटना पुण्याजवळिल माळिण येथे घडली. जवळपास दीडशेजण या दुर्घटनेत नामशेष झाले.

एका मॉडेलवर बलात्कार केल्याचा आरोप मुंबईतील डीआयजी सुनील पारसकर यांच्यावर नोंदवण्यात आला. या आरोपांचा पारसकरांनी इन्कार केला. एसएमएसवरून या दोघांमध्ये मैत्री होती असे दिसून आले.

जेवण निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप करत शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी दिल्लीतल्या महाराष्ट्र भवनातील कर्मचा-याच्या तोंडात बळजबरी चपाती कोंबली. तो कर्मचारी मुस्लीम होता आणि रोजा पाळत होता हे समजल्यावर या प्रकाराला चांगलीच कलाटणी मिळाली आणि हा विषय देशभर गाजला.

२१ जुलै २०१४ रोजी २८ वर्षांनी भारताने लॉर्ड्सवर कसोटी सामना जिंकला. ईशांत शर्माने ७४ धावांमध्ये ७ बळी घेत इंग्लंडला २२३ धावात गुंडाळले आणि भारताने ९५ धावांनी इंग्लंडवर विजय मिळवला.

युक्रेनवरून जाणारे मलेशियन एअरलाइनचे जेट विमान पाडण्यात आले ज्यात २९२ प्रवासी ठार झाले. हे विमान रशियानी पाडले रशियाचा पाठिंबा असलेल्या बंडखोरांनी पाडले की आणखी कुठल्या दहशतवाद्यांनी पाडले हे आजतागायत स्पष्ट झालेले नाही.

शक्ति मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोघे अल्पवयीन आरोपी दोषी सिद्ध झाले आणि त्यांना कमाल म्हणजे तीन वर्षांच्या सुधारगृहाची शिक्षा देण्यात आली.

आपण सीमाप्रश्न सोडवला तर तो जगासाठी आदर्श ठरेल असे चीनला सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ब्रिक्सच्या बैठकीमध्ये चीनशी चांगले संबंध राखण्याची इच्छा व्यक्त केली.

अर्जेंटिनाला एक्स्ट्रा टाइममध्ये १ - ० असे पराभूत करत जर्मनीने फुटबॉल विश्वचठक जिंकला. सामन्यातला एकमेव गोल करत जर्मनीला चौथ्यांदा वर्ल्डकप जिंकून देणा-या या सामन्याचा शिल्पकार ठरला मारियो गोट्झ.

कल्याणमधले चार बेपत्ता तरूण जिहादसाठी इराकमध्ये गेल्याचे स्पष्ट झाले आणि ISISचा विखारी प्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून भारताच्या दारात आल्याने सुरक्षा यंत्रणा खडबडून जागा झाल्या.

उत्तर प्रदेशमधील विजयाचा शिल्पकार अशी ओळख मिळवलेल्या अमित शाह यांची भाजपाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र व हरयाणा या दोन राज्यातल्या निवडणुकांमध्ये शाह यांची परीक्षा होणार आहे.

काँग्रेसला १० टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे ४४ जागा लोकसभा निवडणुकीत मिळाल्यामुळे नियमावर बोट ठेवत विरोधीपक्षनेतेपद देण्यास भाजपा सरकारने विरोध केला. भाजपा सूडाचे राजकारण करत असल्याचा काँग्रेसचा आरोप.