जस्टिन ट्रुडोंनी विमानातून कोकेन आणलेले? स्निफर डॉग्‍सना सुगावा लागलेला, माजी राजदुताचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 08:29 PM2023-09-25T20:29:30+5:302023-09-25T20:34:26+5:30

G20 या अशा हाय-प्रोफाइल कार्यक्रमाच्या वेळी ट्रूडो हे चांगल्या स्थितीत नव्हते, अशी चर्चा सुरू झाली होती.

भारतावर खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येचा आरोप करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या जी २० दौऱ्याबाबत खळबळजनक माहिती समोर येत आहे. दिल्ली विमानतळावर तीन दिवस नादुरुस्त असलेल्या ट्रुडो यांच्या विमानात कोकेन होते, असा दावा भारताच्या माजी राजदुतांनी केला आहे.

ट्रुडो यांना पंतप्रधान मोदी यांनी हातचे राखून वागणूक दिली. यानंतर जगभरात नाचक्की झाल्यावर मायदेशात गेलेल्या ट्रुडो यांनी भारताविरोधात वक्तव्ये करण्यास सुरुवात केली. जी २० परिषदेला ते भारतात आले होते. यावेळी त्यांचे विमान तीन दिवस नादुरुस्त होते.

या काळात विमानतळावरील स्निफर डॉग्‍सना ट्रुडो यांच्या विमानात ड्रग्ज असल्याचा वास आला होता, असा दावा दीपक व्होरा यांनी केला आहे. व्होरा हे अर्मिनिया, पोलंड, जॉर्जिया सारख्या देशांमध्ये भारताचे राजदूत राहिले आहेत.

व्होरा यांनी एका न्यूज चॅनललला दिलेल्या मुलाखतीत हे खळबळजनक दावे केले आहेत. अलीकडेच ट्रूडो जी-20 साठी भारतात आले होते, तेव्हा विमानतळावर ट्रूडोंच्या विमानात स्निफर डॉग्सना कोकेन आढळून आले होत, असे व्होरा यांनी म्हटले आहे.

तेव्हापासून, G20 या अशा हाय-प्रोफाइल कार्यक्रमाच्या वेळी ट्रूडो हे चांगल्या स्थितीत नव्हते, अशी चर्चा सुरू झाली होती. G20 नंतर राष्ट्राध्यक्षांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या डिनरलाही ट्रूडो उपस्थित राहिले नाहीत. या सर्व कड्यांना आता अनेकजण जोडून पाहू लागले आहेत.

कॅनडाच्या नागरिकाची म्हणजेच निज्जरची हत्या भारत सरकारच्या एजंट्सनी केली आहे, असा आरोप ट्रुडो आणि त्यांच्यानंतर त्यांच्या संरक्षण मंत्री ब्लेअर यांनी केला आहे. भारताने निज्जरला दहशतवादी घोषित केले होते. ब्लेअर एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी ट्रुडो यांचे विमान नादुरुस्त करण्यामागे भारताचाच हात असल्याचा आरोप केला आहे.

ट्रूडो यांच्या विमानात ड्रग्ज असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. परंतू त्यावर कॅनडा सरकारने काही स्पष्टीकरण दिले नव्हते. आता पुन्हा असे उघड आरोप झाल्याने कॅनडा काय प्रतिक्रिया देतेय याकडे जगाचे लक्ष आहे.