ना जामतारा ना मेवात...'या' जिल्ह्यात होते सर्वाधिक सायबर गुन्हे; पाहा टॉप 10 यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 06:18 PM2023-09-19T18:18:37+5:302023-09-19T18:22:06+5:30

देशातील 10 जिल्ह्यातून सायबर क्राइमच्या 80 टक्के घटना घडतात.

Cyber Crime: देशात गेल्या काही वर्षांमध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, देशातील 80 टक्के सायबर गुन्हे फक्त 10 जिल्ह्यांतून घडतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सायबर फसवणुकीसाठी कुप्रसिद्ध असलेले जामतारा आणि मेवात, या यादीत पहिल्या क्रमांकावर नसून राजस्थानचे भरतपूर शहर अव्वल स्थानावर आहे. या शहरातून 18% फसवणूक होते. आयआयटी कानपूरशी संबंधित असलेल्या द फ्युचर क्राइम रिसर्च फाउंडेशन ( FCRF ) संस्थेने आपल्या ताज्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे.

फसवणुकीत हे जिल्हे अव्वल-FCRF ने अशा जिल्ह्यांची यादी तयार केली आहे, जिथून विविध प्रकारचे सायबर गुन्हे घडतात. 80 टक्के घटना फक्त 4 राज्यांतील 10 जिल्ह्यांतून घडल्या आहेत. राजस्थानचे भरतपूर आघाडीवर आहे. तर उत्तर प्रदेशातील मथुरा दुसऱ्या क्रमांकावर असून, तेथून 12 टक्के घटना घडतात. त्याचप्रमाणे नूह (मेवात) येथून 11 टक्के, देवघरमधून 10 टक्के, जामतारा येथून 9.6 टक्के, गुरुग्राममधून 8.1 टक्के, अलवरमधून 5.1 टक्के, बोकारो आणि करमातांडमधून 2.4 टक्के आणि गिरिडीहमधून 2.3 टक्के फसवणुकीच्या घटना घडत आहेत.

राजस्थान हनीट्रॅपचे केंद्र बनले-एफसीआरएफने आपल्या रिपोर्टमध्ये हे देखील सांगितले की, कोणत्या राज्य आणि जिल्ह्यातून कोणत्या प्रकारची सायबर क्राइम फसवणूक केली जात आहे. रिपोर्टनुसार, राजस्थान हे सेक्सटोर्शन आणि हनीट्रॅपचे सर्वात मोठे केंद्र आहे. तसेच ओएलएक्स फसवणूक आणि कस्टमर केअरच्या नावाखाली येथे बिनदिक्कतपणे फसवणूक केली जात आहे. झारखंड हे ओटीपी, केवायसी फसवणूक आणि केबीसीच्या नावाने होणार्‍या घोटाळ्यांचे प्रमुख केंद्र आहे.

दिल्ली लोक अॅपद्वारे फसवणुकीचा अड्डा-FCRF च्या अहवालात राजधानी दिल्लीबद्दल धक्कादायक बाब समोर आली आहे. या अहवालानुसार सायबर फ्रॉडमध्ये दिल्लीही मागे नाही. येथे लोन ऍपच्या माध्यमातून लग्न, वीजबिल, नोकरीच्या नावाखाली फसवणूक करून बिनदिक्कतपणे फसवणूक केली जात आहे. त्याचप्रमाणे, बिहार हे OTP फसवणूक, डेबिट-क्रेडिट कार्ड घोटाळा आणि बनावट लिंकद्वारे सायबर फसवणुकीचे केंद्र आहे.

आंध्रचे चित्तूर नवीन हॉटस्पॉट-एफसीआरएफने आपल्या अहवालात सायबर फसवणुकीचे नवीन हॉटस्पॉट म्हणून उदयास येत असलेल्या राज्यांचाही उल्लेख केला आहे. या यादीत आंध्र प्रदेशचे चित्तूर अव्वल स्थानावर आहे. तर आसाम दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यातील गोलपारा, धुबरी, बारपेटा, मोरीगाव आणि नागाव हे सायबर फसवणुकीचे नवे केंद्र म्हणून उदयास येत आहेत.

3.5 वर्षांच्या अभ्यासानंतर रिपोर्ट-FCRF सह-संस्थापक हर्षवर्धन सिंह म्हणतात की, जानेवारी 2020 ते जून 2023 पर्यंत सुमारे साडेतीन वर्षांच्या अभ्यासानंतर सायबर गुन्ह्याशी संबंधित हा पेपर तयार करण्यात आला. 'ए डीप डायव्ह इन टू सायबर क्राईम ट्रेंड्स इम्पॅक्टिंग इंडिया' असे याचे शीर्षक आहे. या अहवालामुळे सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यास नक्कीच मदत होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.