कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 03:02 PM2024-05-03T15:02:10+5:302024-05-03T15:07:57+5:30

Corona Vaccine AstraZeneca : कोरोना लसीबाबत अनेक अफवाही पसरत आहेत. याच दरम्यान, ICMR च्या एका माजी शास्त्रज्ञाने लसीबाबत पसरलेल्या अफवांना पूर्णविराम दिला आहे

कोरोनाची लस बनवणाऱ्या AstraZeneca ची सध्या खूपच चर्चा रंगली आहे. कंपनीने एका रिपोर्टमध्ये कबूल केलं की या लसीचे दुर्मिळ दुष्परिणाम होऊ शकतात. याच कंपनीने कोविशील्ड लसही बनवली आहे. ही बातमी समोर आल्यापासून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

लसीबाबत अनेक अफवाही पसरत आहेत. याच दरम्यान, ICMR च्या एका माजी शास्त्रज्ञाने लसीबाबत पसरलेल्या अफवांना पूर्णविराम दिला आहे आणि म्हटलं आहे की, कोरोना लसीचे दुष्परिणाम फारच कमी प्रकरणांमध्ये होतात, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) माजी शास्त्रज्ञ डॉ. आर. गंगा केटकर यांनी म्हटलं आहे की, "थ्रॉम्बोसिस विथ थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोम' (टीटीएस), ज्यामुळे रक्त गोठणे यासारख्या समस्या उद्भवतात, हे औषध घेतल्याच्या 5 ते 30 दिवसांतच होऊ शकते."

"कोरोना लसीचे आता कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. Covishield लस बनवणारी कंपनी AstraZeneca ने कबूल केलं आहे की लसीमुळे फार कमी लोकांना हा त्रास होऊ शकतो."

"लसीचे फायदे हे तोट्यांपेक्षा जास्त आहेत. जितके जास्त लोक लस घेतात तितका टीटीएसचा धोका कमी होतो." शेवटी त्यांनी असंही सांगितलं की, "लस बनल्यानंतरही शास्त्रज्ञ तिच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवतात."

"कोणत्याही औषधाचे किंवा लसीचे काही दुर्मिळ दुष्परिणाम असू शकतात, परंतु आपण त्याचे फायदे देखील लक्षात ठेवले पाहिजेत." लस उत्पादक कंपनी AstraZeneca विरोधात खटला सुरू आहे.

काही लोकांनी असा दावा केला की, त्यांच्या लसीमुळे रक्त गोठण्याचे विकार (TTS) झाले आणि लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातील सीरम इन्स्टिट्यूटने AstraZeneca च्या परवानगीने Covishield लस बनवली होती.

डॉक्टर केटकर म्हणतात की अफवा दूर करणं महत्त्वाचं आहे. ते म्हणतात की, लोक काळजीत पडतात आणि Google वर शोधतात आणि चुकीच्या माहितीचे बळी ठरतात. जर त्यांच्या मनात नकारात्मक विचार असेल तर त्याचा परिणाम लसीकरणावरही होऊ शकतो.

रिपोर्टनुसार, AstraZeneca ने कायदेशीर कागदपत्रांमध्ये कबूल केलं आहे की त्यांच्या लसीमुळे अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये TTS होऊ शकतं. TTS चा दुर्मिळ धोका असूनही, कोविडशी संबंधित सरकारी पक्षाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारतातील 90% लोकांना दिलेल्या कोविशील्ड लसीने चांगलं काम केलं आहे.