वादग्रस्त आध्यात्मिक गुरू

By admin | Published: November 19, 2014 12:00 AM2014-11-19T00:00:00+5:302014-11-19T00:00:00+5:30

स्वामी सदाचारी- एकेकाळी आध्यात्मिक गुरू व तांत्रिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्वामी सदाचारी यांना कुंटणखाना चालवण्याच्या आरोपाखाली तुरूगांची हवा खावी लागली आहे.

जयेंद्र सरस्वती- स्वामिगल कांची कामकोटी पीठाचे ६९वे शंकराचार्य असणारे स्वामी जयेंद्र सरस्वती यांना मंदिरातील कर्मचा-याच्या खुनाच्या आरोपावरून नोव्हेंबर २००४ मध्ये अटक करण्यात आली होती.

स्वामी परमहंस नित्यानंद - तामिळनाडूतील एक मोठे अध्यात्मिक गुरू असणा-या स्वामी नित्यानंद यांचे परदेशातही अनेक भक्त आहेत. संपूर्ण तामिळनाडू राज्यासह वाराणसी व पुरी येथे त्यांचे अनेक आश्रमही आहेत. अनेक भक्तांच्या आदर्शस्थानी असणा-या नित्यानंद यांची एका न्यूज चॅनेल सेक्स टेप प्रसारित केली होती. त्यानंतर ते वादाचा भोव-यात सापडले.

गुरमीत राम रहीम सिंग- डेरा सच्चा सौदाचे प्रमुख असणा-या बाबा गुरमीत राम रहीम सिंग यांच्यावर बलात्काराचा आरोप ठेवण्यात आला आहे. सिरसा येथील कार्यालयातील महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर असून एका खून प्रकरणातील सहभागाबाबतही त्यांची चौकशी सुरू आहे.

आसाराम बापू- आध्यात्मिक गुरू आसाराम बापू व त्यांच्या मुलाने आपले शोषण केल्याचा आरोप दोन बहिणींनी लावला होता. याप्रकरणी गेल्या वर्षी त्यांना अटकही करण्यात आली होती तर त्यांचा मुलगा फरार झाला होता. मात्र अनेक महिन्यांच्या शोध मोहिमेनंतर त्यालाही अटक करण्यात पोलिसांना यश आले. तसेच त्यांच्या गुरूकुलातील दोन मुलांच्या मृत्यूप्रकरणीही त्यांच्यावर संशयाची सुई असून त्यांच्यावर काळी जादू केल्याचा आरोप आसाराम यांच्यावर आहे.

नेमीचंद जैन उर्फ चंद्रास्वामी - नेमी चंद जैन उर्फ चंद्रास्वामी हा तथाकथित ज्योतिषी असून त्याच्यावर फेराअंतर्गत नऊ गुन्हे तसेच फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला. तसेच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

प्रेमानंद तामिळनाडूतील तिरूचिरापल्ली आश्रमातील स्वामी प्रेमानंद यांना १३ महिलांवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. तसेच एका श्रीलंकन नागरिकाचा खून केल्याचा आरोपही त्यांच्यावर लावण्यात आला आहे.

संत रामपाल यांच्यावरील खुनाचा आरोप व अटक प्रकरणामुळे अध्यात्मिक गुरूंच्या विश्वासार्हतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वादग्रस्त कृत्य अथवा वक्तव्यांमुळे देशातील अनेक गुरू अडचणीत सापडले असून अनेकांना तुरूंगाची हवा खावी लागली आहे. संत रामपाल यांच्या खुनाचा आरोप असून त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्यात आले आहे. रामपाल यांना अटक करण्यासाठी पोलिस त्यांच्या आश्रमात गेले असता हजारो भक्तांनी त्यांच्यावर गोळीबार करत त्यांना अडवले. या धुमश्चक्रीत पोलिसांसह अनेक निष्पापांना आपला जीव गमवावा लागला आहे.