धोका वाढला! कोरोनातून बरं झालेल्या रुग्णांमध्ये Bone deathची गंभीर समस्या; डॉक्टरांच्या चिंतेत भर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 11:24 AM2021-07-05T11:24:57+5:302021-07-05T11:35:09+5:30

bones death cases after recovering from covid-3 cases found in mumbai : कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा 3,05,85,229 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,02,728 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

गेल्या 24 तासांत देशांत कोरोनाचे 39,796 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 723 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. मात्र कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच विविध ठिकाणी संशोधन देखील सुरू आहे. याच दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एक गंभीर समस्या आढळून येत आहे.

कोरोनावर मात केलेल्या काही रुग्णांमध्ये एवॅस्कुलर नेक्रोसिस (Avascular necrosis- AVN) म्हणजेच बोन डेथ (Bone Death) ची समस्या पाहायला मिळत आहे. बोन डेथमध्ये शरीरातील हाडांवर गंभीर परिणाम होत आहे.

बोन टिश्यूपर्यंत रक्त पुरवठा सुरळीत होत नसल्याने एवॅस्कुलर नेक्रोसिसची गंभीर समस्या रुग्णांमध्ये निर्माण होत आहे. मुंबईतील 40 वर्षांहून कमी वय असलेल्या तीन रुग्णांमध्ये एवॅस्कुलर नेक्रोसिस आढळून आले आहेत.

मुंबईत बोन डेथचे रुग्ण आढळून आल्याने ड़ॉक्टरांच्या चिंतेत भर पडली आहे. तसेच येत्या काही दिवसांत रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची भीती देखील डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

ब्लॅक फंगस आणि एवॅस्कुलर नेक्रोसिसच्या प्रकरणांमधील मुख्य कारण स्टेरॉईड्स असल्याचं म्हटल जात आहे. कोरोना रुग्णांना बरं करण्यासाठी अनेकांमध्ये स्टेरॉईडचा वापर हा केला जातो.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, कोविडवरील उपचार घेतल्यानंतर 2 महिन्यांनी एवॅस्कुलर नेक्रॉसिसची लक्षणं दिसलेल्या 40 वर्षांखालील 3 रुग्णांवर हिंदुजा रुग्णालयामधील डॉक्टरांनी उपचार केले आहेत.

माहिमच्या हिंदुजा हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर आणि ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. संजय अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, "त्या रुग्णांना मांडीच्या हाडाच्या वरच्या भागात दुखणं जाणवलं, तिन्ही रुग्ण डॉक्टर होते म्हणून त्यांना हे लवकर लक्षात आलं आणि त्यांनी लगेच उपचारांसाठी रुग्णालय गाठलं."

डॉ. अग्रवाल यांचा "एवॅस्कुलर नेक्रॉसिस ए पार्ट ऑफ लाँग कोविड-19 (Avascular necrosis as a part of long covid-19)" हा रिसर्च पेपर प्रतिष्ठित मेडिकल जर्नल ‘BMJ Case Studies’ मध्ये प्रसिद्ध झाला आहे.

राज्य सरकारच्या कोविड-19 टास्क फोर्सचे सदस्य आणि इंटेसिव्हिस्ट डॉ. राहुल पंडित म्हणाले, "एवॅस्कुलर नेक्रोसिस प्रकरणावर माझं लक्ष आहे. सामान्यपणे स्टेरॉईड्सचा वापर झाल्यानंतर पाच ते सहा महिन्यांत पेशंटमध्ये एव्हीएनची लक्षणं दिसतात"

"आपल्याकडच्या कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेचा उच्चांक एप्रिलमध्ये गाठला गेला होता. त्यामुळे आता दोन ते तीन महिन्यांमध्ये एव्हीएनचे पेशंट सापडू शकतात असं मला वाटतं. या दुसऱ्या लाटेच्या काळात पेशंटना मोठ्या प्रमाणात स्टेरॉईड्स दिली गेली असल्याने आपल्याला लवकरच या रुग्णांमध्ये एव्हीएनची लक्षणं आढळू शकतात." असंही म्हटलं आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अशातच धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाची दुसरी लाट अधिक जीवघेणी ठरत आहे. मृतांची संख्या 40 टक्क्यांनी वाढली आहे. रिसर्चमधून मोठा खुलासा करण्यात आला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत असून मृतांचा आकडा हा 40 टक्क्यांनी वाढला आहे. तसेच पहिल्या लाटेच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. मॅक्स हेल्थकेअरच्या दिल्ली एनसीआरसह उत्तर भारतातील दहा रुग्णालयामध्ये करण्यात आलेल्या रिसर्चमधून ही माहिती मिळत आहे.

रिपोर्टनुसार, पहिल्या लाटेत 14398 आणि दुसऱ्या लाटेत 5454 रुग्णांवर संशोधन करण्यात आलं. कोरोनाच्या पहिल्या लाटेत 1039 रुग्णांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या लाटेत मृत्यूदर वाढून 10.5 टक्के झाला.

कोरोना मृतांची संख्या ही 40 टक्क्यांनी वाढली आहे. दुसऱ्या लाटेत 45 वर्षांहून कमी वय असलेल्या रुग्णांचा अधिक मृत्यू झाला आहे. काही रुग्ण हे कोरोनासोबतच इतरही आजाराने ग्रासलेले होते.