राम मंदिरातील प्रत्येक मजल्याची उंची 20-20 फूट असणार; जाणून घ्या, डिझाईनसंबंधी 10 महत्त्वाच्या गोष्टी...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 03:11 PM2024-01-05T15:11:22+5:302024-01-05T15:21:05+5:30

Ram Mandir : प्रभू रामाच्या मंदिरासोबतच या परिसरात इतर 7 मंदिरेही बांधली जात आहेत.

अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी जोरात सुरू आहे. येत्या 22 जानेवारीला मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. दरम्यान, राम मंदिराचा तळमजला जवळपास तयार झाला आहे. हे मंदिर तीन मजली असणार आहे. म्हणजे दोन मजल्यांचे बांधकाम करणे बाकी आहे. प्रत्येक मजल्याची उंची 20-20 फूट असणार आहे. एकूण 2.7 एकर जागेवर राम मंदिर बांधले जात आहे.

मंदिराची उंची अंदाजे 161 फूट असेल. मंदिराचे बांधकाम आणि इतर प्रकल्पांना आणखी दोन वर्षे लागतील. पण, अयोध्येत भव्यता दिसू लागली आहे. येत्या काही दिवसांत येथील भाविकांना त्रेतायुग सारखाच काहीसा अनुभव येणार आहे. मंदिराच्या डिझाईनपासून ते शहरी शैलीपर्यंत सर्वकाही खास आहे.राम मंदिराच्या डिझाईनचे सर्वजण कौतुक करत आहेत.

राम मंदिराची खासियत जाणून घेण्यासाठी लोकांनाही उत्सुकता आहे. गुजरातमधील रहिवासी चंद्रकांत सोमपुरा आणि आशिष सोमपुरा यांनी राम मंदिराची डिझाईन केली आहे. चंद्रकांत सोमपुरा यांनी सुमारे 30 वर्षांपूर्वी राम मंदिर आंदोलनादरम्यान डिझाईन तयार केले होते. मात्र, नंतर त्यात काही बदल करून मंदिराला नवे रूप देण्यात आले.

राम मंदिर ट्रस्टचे म्हणणे आहे की, प्रभू रामाच्या मंदिरासोबतच या परिसरात इतर 7 मंदिरेही बांधली जात आहेत. यामध्ये महर्षी वाल्मिकी मंदिर, महर्षी वशिष्ठ मंदिर, महर्षी विश्वामित्र मंदिर, महर्षी अगस्त्य मंदिर, निषाद राज, माता शबरी, देवी अहिल्या मंदिर आहे. मंदिराचा मुख्य दरवाजा सिंह द्वार या नावाने ओळखला जाईल. हे मंदिर पूर्णपणे भारतीय परंपरेनुसार आणि स्वदेशी तंत्रज्ञानाने बांधले जात आहे. मंदिराच्या डिझाईनबद्दल आणखी माहिती जाणून घ्या...

1) मंदिरात पाच मंडप असतील. नृत्य मंडप, रंगमंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप अशी त्यांची नावे आहेत.

2) प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. प्रभू रामाचा संपूर्ण दरबार पहिल्या मजल्यावर सजवण्यात येणार आहे. खांब आणि भिंतींवर देवी-देवतांच्या मूर्ती कोरल्या जात आहेत.

3) मंदिराची लांबी (पूर्व ते पश्चिम) 380 फूट, रुंदी 250 फूट आणि उंची 161 फूट असेल. मंदिर तीन मजली असेल. प्रत्येक मजल्याची उंची 20 फूट असेल. मंदिरात एकूण 392 खांब आणि 44 दरवाजे असतील.

4) मंदिराजवळ प्राचीन काळातील सीताकूप पाहायला मिळेल. मंदिराच्या चारही कोपऱ्यात सूर्य, भगवती, गणेश आणि शिवाची मंदिरे बांधण्यात येणार आहेत. उत्तर आणि दक्षिण भागात अन्नपूर्णा आणि हनुमान यांची मंदिरे असतील.

5) महर्षि वाल्मिकी, महर्षि वशिष्ठ, महर्षि विश्वामित्र, अगास्य, निषाद राज, शबरी यांची मंदिरे प्रस्तावित आहेत.

6) मंदिरात लोखंडाचा वापर केला नाही. जमिनीवर काँक्रीट अजिबात नाही. मंदिराच्या खाली 14 मीटर जाड रोलर कॉम्पॅक्टेड काँक्रीट (RCC) ने पाया घालण्यात आला आहे. त्याला कृत्रिम खडकाचे स्वरूप देण्यात आले आहे.

7) मातीच्या आर्द्रतेपासून मंदिराचे रक्षण करण्यासाठी ग्रॅनाइटचा 21 फूट उंच प्लिंथ बनवण्यात आला आहे.

8) संपूर्ण परिसर एकूण 70 एकरांचा आहे. 70 टक्के क्षेत्र हिरवेगार असणार आहे. पर्यावरण आणि जलसंधारणावर भर देण्यात आला आहे.

9) मंदिर परिसरात स्नानगृह, शौचालय, वॉश बेसिन, ओपन टॅप्स आदी सुविधाही असतील. मंदिरात अपंग आणि वृद्धांसाठी रॅम्प आणि लिफ्टची व्यवस्था असेल.

10) 25 हजार क्षमतेचे अभ्यागत सुविधा केंद्र बांधण्यात येत आहे. अभ्यागतांचे सामान ठेवण्यासाठी लॉकर आणि वैद्यकीय सुविधा असतील.