"मी ६६ केसेस लढल्या आहेत, लग्न करा नाहीतर...", फेटा बांधून ७० वर्षीय वृद्धाची DC ऑफिसात धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 03:55 PM2023-06-30T15:55:11+5:302023-06-30T15:57:44+5:30

सरकारी योजनांपासून वंचित राहिलेल्या एका वृद्ध व्यक्तीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

सरकारी योजनांपासून वंचित राहिलेल्या एका वृद्ध व्यक्तीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. हरयाणाच्या रेवाडीमधील या वृद्धाने अनोख्या पद्धतीने आपला निषेध नोंदवला. डोक्यावर फेटा बांधून हा वृद्ध जिल्हा सचिवालयात पोहोचला. "माझे कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र द्या नाहीतर लग्न लावून द्या", अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

ही वृद्ध व्यक्ती एकटी राहत असल्याने त्यांचे कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र देता येत नाही असे सांगितले जात आहे. यामुळे संतप्त झालेल्या सतबीर नावाच्या वृद्धाने फेटा बांधून रेवाडीतील जिल्हा सचिवालय कार्यालयात धाव घेतली.

खरं तर अनेकांना फॅमिली आयडी बनवताना अडचणी येत आहेत. प्रशासनाकडून वारंवार सांगितले जाते की, फॅमिली आयडीतील त्रुटी दुरूस्त करून घ्या. अनेकांची ही आयडी तयार झाली आहे तर काहींना अद्याप सरकारी कार्यालयात हजेरी लावावी लागत आहे.

रेवाडी जिल्ह्यातील नयागाव येथील रहिवासी असलेले ७१ वर्षीय सतबीर हे देखील यामुळे त्रस्त आहेत. "माझा मुलगा दिल्लीत राहतो आणि पत्नीचा सहा वर्षापूर्वी मृत्यू झाला आहे", असे सतबीर सांगतात.

गावातील एका पडक्या घरात ते एकटे राहतात. एकटे राहत असल्याकारणाने त्यांचे ओळखपत्र, फॅमिली आयडी बनवता येत नाही. यामुळेच वृद्ध सतबीर यांनी जिल्हा सचिवालय कार्यालयात जाऊन आपला संताप व्यक्त केला.

सतबीर यांनी सांगितले की, अद्याप त्यांना वृद्धापकाळातील पेन्शन योजनेचा लाभ मिळाला नाही, त्यामुळे त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. सरकारने गरजूंना वेळीच मदत पोहचवली पाहिजे. मी सरकारविरूद्ध या आधी ६६ खटले लढले आहेत. सरकारने सर्वांना समान दर्जाची वागणुक दिली पाहिजे.

या वृद्ध व्यक्तीची मदत करत असलेले वकील कैलाश चंद यांनी लवकरच समस्येचे समाधान होईल असे म्हटले आहे. तसेच गरज भासल्यास कोर्टात देखील धाव घेऊ, कारण प्रत्येक नागरिकाला सरकारी योजनेचा लाभ घेण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी नमूद केले.