Aditya Thackeray: उद्धव ठाकरेंनंतर आदित्यही पोहोचले बांधावर, शेतकऱ्यांना दिला धीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 02:21 PM2022-10-27T14:21:33+5:302022-10-27T14:31:15+5:30

आदित्य ठाकरे हे शिंदे गटावर टीका करत असून तेही शेतकऱ्यांच्या बांधावर उतरल्याचं दिसून येत आहे.

राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट अशी विभागणी झाल्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटात सामना रंगत आहे. शिंदे गटातील आमदारांना गद्दार म्हणत आदित्य ठाकरेंनी संवाद यात्रांमधून जबरी टीका केली होती. आता, अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीवर ते सरकारवर हल्लाबोल करत आहेत.

ठाकरे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. आपल्या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांना आसूड घेऊन सरकारविरुद्ध आवाज उठवण्याचं आवाहन केलं.

उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया देताना हा केवळ वरवरचा दौरा असून शेतकऱ्यांना यातून काहीही मिळणार नाही. याउलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीच शेतकऱ्यांना अनुदान दिल्याचं म्हटलं आहे. आता, आदित्य ठाकरे हे शिंदे गटावर टीका करत असून तेही शेतकऱ्यांच्या बांधावर उतरल्याचं दिसून येत आहे.

आदित्य ठाकरेंनी आज नाशिक जिल्ह्यातील पांढुर्ली गावच्या स्थानिकांनी आत्ता भेट घेऊन दिलेले निवेदन स्विकारले आणि त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या समस्या आणि प्रश्न समजून घेतले.

धामणगाव, इगतपूरी, जिल्हा नाशिक इथे पावसाने शेतीचे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. सांगितलं की, यापूर्वीही अशी अनेक संकटे आली होती, पण त्याचा तुम्ही सामना केलात. आत्ताही तुम्ही घाबरू नका. आम्ही तुमच्या सोबत आहोत!, असा विश्वास आदित्य यांनी शेतकऱ्यांना दिला.

सोनारी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथील संपत रामनाथ शिंदे व दत्तात्रय धोंडू शिंदे ह्या शेतकरी बांधवांची बांधावर जाऊन भेट घेतली. अतीवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन धीर दिला. बळीराजा व्यथीत आहे, अडचणीत आहे, पण महाराष्ट्राचा अन्नदाता हरलेला नाही, शिवसेना त्याच्यासोबत आहे, असे आदित्य यांनी यावेळी म्हटले.

दरम्यान, परतीच्या पावसामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नसल्यावरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.

गेल्या १० वर्षांमध्ये उद्धव ठाकरेंनी अगदी बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. तुम्ही किमान धीर तरी द्यावा, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांकडून आत्ता तरी शेतकऱ्यांच्या भेटी घेण्याची अपेक्षा नाही. कारण हे सरकार निर्दयी झाले आहे. शेतकऱ्यांसोबत उभे राहाणे गरजेचे आहे. त्यांना जाऊन धीर देणे एवढे जरी केले तरी पुरेसे आहे, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.

राज्याच्या राजकारणात अनेक मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. महाविकास आघाडीचे नेते सातत्याने विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत असून, बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गट आणि भाजप टीकाकारांना प्रत्युत्तर देत आहेत.