उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं नवं नाव ठरलं; निवडणूक आयोगाला पाठवली 'ही' ३ चिन्हे?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 12:24 PM2022-10-09T12:24:45+5:302022-10-09T12:28:32+5:30

खरी शिवसेना कुणाची हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पोहचल्यानंतर आयोगाने एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोन्ही गटाला आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत दिली होती. शनिवारी ही मुदत संपल्यानंतर आयोगाने निर्णय होईपर्यंत तात्पुरतं शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यात आता सोमवारपर्यंत निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना पसंतीच्या ३ चिन्हाचे पर्याय देण्याची मुदत दिली आहे. त्यानुसार उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं नव चिन्ह ठरल्याची माहिती समोर आली आहे.

उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला त्रिशूल, उगवता सूर्य आणि मशाल या ३ चिन्हाची पसंती दिली आहे. त्यानुसार या तीन चिन्हापैकी कुठलं चिन्ह निवडणूक आयोग उद्धव ठाकरेंच्या पक्षाला देणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.

धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठविले असल्याने शिवसेनेच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दिलेल्या निवडणूक चिन्हांच्या पर्यायापैकी त्यांना हवे ते वेगवेगळे चिन्ह मिळेल. त्यासाठी ३ पर्याय देण्याचे दोन्ही गटांना आदेश दिले होते त्यानुसार उद्धव ठाकरेंनी ३ पसंती चिन्हे दिले आहेत.

हिंदू धर्माशी निगडीत उद्धव ठाकरेंनी हे ३ चिन्ह सुचवले आहेत. त्यात त्रिशूल हे भगवान शंकराचं शस्त्र आहे. उगवता सूर्य हा भगव्या प्रकाशात नवी पहाट आणण्याचं प्रतिक आहे. तर मशाल ही क्रांतीचं प्रतिक मानले जाते. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून या ३ पैकी एक चिन्ह देण्यात यावं अशी विनंती केल्याचं समोर आले आहे.

त्याचसोबत उद्धव ठाकरेंकडून शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिवसेना(प्रबोधनकार ठाकरे) या ३ नावांचा पर्याय देण्यात आला आहे. या ३ नावांपैकी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला कुठले नाव द्यायचं हे निवडणूक आयोग ठरवणार आहे.

उद्धव ठाकरेंकडून निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात या ३ नावांपैकी आणि ३ चिन्हापैकी तात्काळ १ नाव, चिन्ह आजच वितरीत करण्यात यावं अशी विनंती करण्यात आली आहे. मात्र त्याचसोबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात कोर्टात दाद मागायची का यावर उद्धव ठाकरेंनी वकील आणि शिवसेना नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे त्यात पुढील रणनीतीवर चर्चा होणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय अनपेक्षित होता. आजच्या बैठकीत सर्व महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित असतील. माध्यमांमध्ये ज्या चिन्हाची चर्चा सुरू आहे. त्यावर अद्याप काही ठरलं नाही. प्रादेशिक पक्ष असल्याने चिन्ह मिळणार आहे. सर्वसाधारण कुणाचा आक्षेप नसेल असं चिन्ह मिळेल. दुपारपर्यंत यावर ठोस निर्णय होईल असं खासदार अनिल देसाई म्हणाले.

नावाबाबत शिवसेनेतील दोन गटांना केंद्रीय निवडणूक आयोगाने एक दिलासा दिला आहे. दोन्ही गटांची जर इच्छा असेल तर शिवसेना हे नाव वापरून त्यापुढे स्वत:च्या गटाचे नाव जोडून ते वापरण्यास आयोगाने हरकत घेतलेली नाही.

मात्र त्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी आपल्याला कोणत्या नावाने ओळखले जावे याचे तीन पर्याय पसंतीक्रमानुसार निवडणूक आयोगासमोर सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत सादर करावे लागती, असे आदेशही देण्यात आले आहेत. त्यावर निवडणूक आयोग निर्णय देणार आहे.