आधी ठाकरे अन् आता काँग्रेसला धक्का! अखेरच्या क्षणापर्यंत सस्पेन्स ठेवणं भाजपाची खेळी?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 04:20 PM2023-01-12T16:20:23+5:302023-01-12T16:24:43+5:30

राज्यातील राजकारणात ६ महिन्यापूर्वी विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या हालचाली झाल्या. संख्याबळ नसतानाही भाजपाचे सर्व उमेदवार निवडून आले. तर संख्या असूनही महाविकास आघाडीला पराभव सहन करावा लागला.

मागील विधान परिषद निवडणुकीनंतर राज्यात ऐतिहासिक बंड झाले. एकनाथ शिंदे यांनी समर्थक ५० आमदारांना सोबत घेत थेट सूरत गाठले. शिंदे यांच्या बंडाच्या पवित्र्यानंतर राज्यात खळबळ माजली. मविआ सरकार अल्पमतात आले आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागले.

विधान परिषद निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी खेळलेली खेळी आजपर्यंत कुणालाही समजली नाही. तत्कालीन सत्ताधारी मविआत काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्रित असूनही सहाव्या उमेदवाराला जिंकून आणता आले नाही. त्यात काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला.

आता पुन्हा राज्यात ५ जागांवर विधान परिषद निवडणुका होत आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी येत्या ३० जानेवारीला मतदान होणार आहे. तत्पूर्वी या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा-मविआ पुन्हा आमनेसामने आले आहेत.

या निवडणुकीत सर्वाधिक सस्पेन्स जर कुठल्या जागेसाठी झाला असेल तर तो नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी. या निवडणुकीतील प्रमुख पक्ष काँग्रेस-भाजपाने अर्ज भरण्याच्या दिवशीपर्यंत कुठल्याही उमेदवाराची अधिकृत घोषणा केली नाही.

त्यातच शेवटच्या दिवशी काँग्रेसच्या दिल्ली हायकमांडकडून नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी पुन्हा सुधीर तांबे यांनाच अधिकृतपणे उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र विभागीय कार्यालयात पोहचताच सुधीर तांबे यांनी अर्ज भरलाच नाही. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले.

त्यात सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. त्यामुळे सत्यजित तांबे यांना कुणी अर्ज भरायला लावला की सुधीर तांबे यांनी अर्ज का भरला नाही. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार का? असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत.

सत्यजित तांबे हे भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. त्यात भाजपानेही नाशिक मतदारसंघासाठी कुणालाही अधिकृत उमेदवारी जाहीर केली नाही. त्यामुळे नेमकं पाणी कुठे मुरतंय? याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.

त्यातच सत्यजित तांबे यांनी मी अपक्ष म्हणून फॉर्म भरलाय, मी काँग्रेसचा, मविआचा उमेदवार आहे पण मी भाजपासह इतर पक्षांनी मला पाठिंबा द्यावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं. यावेळी सत्यजित तांबेंनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुकही केले.

देवेंद्र फडणवीस नेहमी नव्या नेतृत्वाला संधी देत असतात. त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. राजकारणापलीकडे आमचे संबंध आहेत. त्यामुळे या निवडणुकीत भाजपा मला पाठिंबा देईल असा विश्वास सत्यजित तांबे यांनी माध्यमांकडे बोलून दाखवला.

त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसला गाफील ठेवणे, अधिकृत उमेदवाराने अर्ज न भरणे, भाजपानेही उमेदवाराबाबत सस्पेन्स ठेवणे, सत्यजित तांबेंना पाठिंबा देऊ असं भाजपा नेत्याने विधान करणे या संपूर्ण घडामोडीमुळे आगामी काळात भाजपा काँग्रेसला असाच धक्का देणार का हे पाहणे गरजेचे आहे.