NCP चे १० नेते, एकमेकांवर वार-प्रतिवार...; एकाच क्लिकवर वाचा कोण काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 05:35 PM2023-07-05T17:35:29+5:302023-07-05T17:40:07+5:30

अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नवी उभारी घेईल. शरद पवार साहेब आमचे विठ्ठल, मात्र आमच्या विठ्ठलाला बडव्यांचा घेरलंय. कार्यकर्ते, पदाधिकारी नेते यांच्या आग्रहामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत सहभागी झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली सर्व समाजाला सोबत घेऊन काम होईल. साहेब तुम्ही आवाज द्या, या बडव्यांना बाजूला करा, आपण सत्तेत राहून जनेतेचे प्रश्न सोडवू . ज्याप्रमाणे नागालँड मध्ये परवानगी दिली तशी आम्हाला द्या पोटाशी धरा असं आवाहन छगन भुजबळांनी केले.

शरद पवारांसोबत व्यासपीठावर बसणारे बाजूला गेले. प्रत्येकाच्या अडीअडचणीला उभे राहण्याचे काम शरद पवारांनी केले. २ वर्षाचा तुरुंगवास भोगून पुण्यात भुजबळांच्या डोक्यावर फुले पगडी पवारांनी ठेवली. तेव्हा बडवे आडवे आले नाहीत का? पगडीखालून फुलेंचा विचार निघून गेला. ज्यांनी फुलेंचा अपमान केला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला त्याचे उत्तर महाराष्ट्राला काय देणार? बडवे आडवे येत होते मग शिवतीर्थावर २०१९ ला लाखो लोकांच्या साथीने भुजबळांचे नाव शपथविधीला घेतले तेव्हा बडवे आडवे आले नाहीत का? असं सांगत जयंत पाटलांनी भुजबळांवर निशाणा साधला.

मी राजीनामा देतो, संस्था बघतो. सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा असं आम्हाला सांगितले. त्यानंतर २ दिवसांत राजीनामा मागे घेतला. मग दिला कशाला? मी सुप्रियालाही सांगितलं होतं, पण सुप्रिया म्हणाली की ते हट्टी आहेत, ते ऐकत नाहीत. असा कुठला हट्ट? लोकांसमोर मला का व्हिलन केले जाते कळत नाही. माझी काय चूक? माझ्या दैवताला, विठ्ठलाला आजही विनंती आहे की, कुठंतरी थांबायला हवं. एखाद्या गोष्टीचं वय असतं, असे म्हणत आमच्या भूमिकेला समर्थन द्या. मी शेतकरी कुटुंबातील पोरगा आहे, आमच्यात मुलगा २५ वर्षांचा झाली का वडिल शेताची जबाबदारी मुलाकडे देतात. उद्योगपतीही त्यांच्या बाबतीत तसंच करतात, असे म्हणत अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षीय जबाबदारीतून शरद पवारांनी आता मुक्त व्हायला हवं, असे म्हटले.

अजित पवारांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, काही लोकांचं वय झालं त्यामुळे त्यांनी फक्त आशीर्वाद द्यावेत असं म्हणणं आहे. पण का बरं आशीर्वाद द्यावेत? रतन टाटा साहेबांपेक्षा ३ वर्षांनी मोठे आहेत. आजही टाटा ग्रुप पोटतिडकीने लढतात. देशात टाटा ग्रुप हा सर्वात मोठा ग्रुप आहे. रतन टाटांचं वय ८६ आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे साइरस पूनावाला यांचं वय ८४, अमिताभ बच्चन ८२, वॉरेन बफेट, फारूख अब्दुला साहेबांपेक्षा ३ वर्षांनी मोठे आहेत. वय हा फक्त आकडा आहे, जिद्द पाहिजे" असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं

२५ वर्ष भुजबळ तुम्हाला मंत्री ठेवले. प्रत्येकाला सोन्याची कौले असलेली घरे आहेत. आमच्या बापाने हे दिले. शरद पवार यांच्या पायातील मी धूळ आहे. वडिलांवर येते तेव्हा छातीचा कोट करण्याचा इतिहास महाराष्ट्राचा आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी ज्यांना ३०-३० वर्ष मंत्रिपदे दिली ते आज साहेबांवर बोलतायेत. ज्यावर बोट ठेवले या बापाने काढून दिले. जेव्हा अडचणी आल्या तेव्हा तो उभा आला. अधर्माविरुद्ध धर्माची लढाई झाली तेव्हाही नाती होती. तेव्हाही तत्वे होती. ही लढाई आम्ही जिंकणार आहे. धर्माचा पराभव होऊ शकत नाही. कालपर्यंत ज्यांना शिव्या घालत होता त्यांच्या तुम्ही पाया पडलात. ६ तारखेला मिटिंग होती मग त्याआधीच साहेबांना अंधारात ठेवून तुम्ही पळून का गेलात? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना विचारला.

एक व्यक्ती ज्याने सर्वात जास्त अपमान भोगला त्याचे नाव अजित पवार आहे. दैवताच्या हाताला धरून राजकारणाला सुरूवात केली. संधी मिळत असतानाही शरद पवारांच्या शब्दावर इतर सहकाऱ्यांना देण्याचे मोठे मन अजित पवारांकडे आहे. आम्ही फार लहान आहोत. स्वाभिमानाचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी समजतो. ऊसतोड मजुराच्या पोटी जन्माला आलेल्या माझ्यासारख्या नेत्याला बोलण्याची ताकद अजित पवारांनी दिली. आज राष्ट्रवादीवर ही वेळ का येतेय याचा उलगडा अजितदादांनी करावा. किती दिवस मनात साठवून देणार. अजित पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगावे असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.

प्रफुल पटेल सौम्य व्यक्ती आहे म्हणून कमी बोलतो, माझ्यावरही पुस्तक लिहिण्याची वेळ येणार आहे. ज्यादिवशी पुस्तक लिहिन तेव्हा अख्ख्या महाराष्ट्राला, देशाला काय काय समजेल हे सांगायचे नाही. जिथे पवार तिथे पटेल. प्रफुल पटेल शरद पवारांची सावली. आज मी या मंचावर उभा आहे. अजितदादा आणि सहकाऱ्यांच्यासोबत उभा आहे. अजूनही वेळ गेली नाही. आजही जाहीरपणे मी गुरुला विनंती करतो, आमच्याही भावना समजून आम्हाला आशीर्वाद द्या. सगळे राष्ट्रवादी कुटुंबाला याचदिशेने पुढे जाऊ. भाजपासोबत गेले तर वैचारिक मतभेद कसले? ज्यादिवशी मविआ बनली तेव्हा शिवसेना कुणासोबत होती, भाजपासोबत. आतापर्यंत शरद पवारांवर सर्वाधिक टीका केली ती शिवसेनेने. मग शिवसेनेची विचारधारा स्वीकारून आपण त्यांना मिठी मारू शकतो मग भाजपासोबत का नाही? हा सवाल प्रफुल पटेल यांनी विचारला.

आणीबाणीच्या काळात सर्व देशात इंदिरा गांधीच्या विरोधात वातावरण होते. तेव्हा बाळासाहेबांनी देशाच्या नैतिकतेसाठी इंदिरा गांधींना पाठिंबा दिला. विधानसभेची निवडणूक असताना शिवसेनेने एकही उमेदवार उभा न करता काँग्रेसला पाठिंबा दिला. आणीबाणीनंतर वेगळे वातावरण होते. त्यात कटुता वाढू नये यासाठी ठाकरेंनी तो निर्णय घेतला. त्यानंतर सेनेच्या २ जणांना विधिमंडळात जागा दिली. शिवसेनेचे हिंदुत्व आहे ते लपवून ठेवत नाही. त्यांचे हिंदुत्व अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन जाते. भाजपाचे हिंदुत्व मनुवादी, विभाजनवादी आहे हा फरक आहे असा पलटवार शरद पवार यांनी केला.

अजित पवारांनी योग्यवेळी हा निर्णय घेण्याची तत्परता दाखवली. एकच वादा अजित दादा हा एका दिवसात निर्माण झालेले वाक्य असू शकतो. राज्याच्या राजकारणात गेली २५ वर्ष वेगळी छाप अजित पवारांनी पाडली. २ दिवस कार्यक्रम रद्द झाली तेव्हा अजित पवारांची बातमी होते. कार्यकर्त्यांच्या मनात एकप्रकारे खदखद होती. ज्यावेळी असा प्रसंग येतो तेव्हा कार्यकर्त्यांच्या उद्याच्या भविष्यासाठी निर्णय घेण्याची वेळ नेत्यावर येते. सर्वकाही अपमान गिळून अजित पवारांनी पक्षसंघटना राज्यभर उभी करण्याचे काम अजित पवारांनी केले असं सुनील तटकरे यांनी म्हटलं.

जे महाराष्ट्रात घडलं, ते का घडलं याचा विचार व्हायला हवे. आमिष आणि धोका सोडून जे वाटेवर उभे राहतात त्यांच्यामागे तत्वांची लढाई असते. आमच्या विठ्ठलाला बडव्यांना घेरलं म्हणणाऱ्यांनी विनाकारण बडव्यांचे कारण देऊ नये. ज्याच्या मनात पांडुरंगाची भक्ती असते त्याला बडव्याची गरज भासत नाही. पक्ष फोडले, माणसे पळवली, विचारधारा सोडली तर राजकारणातील विश्वासर्हता, जबाबदारी यांचे काय होणार हा प्रश्न मनात असल्याने खासदारकीचा राजीनामा देण्याचा विचार आला. माझ्या बापाने निष्ठा विकली, स्वाभिमान गहाण ठेवला असं अभिमानाने सांगताना कधीच ऐकले नाही. चटणी भाकर खाऊन मी उभा आहे हे सांगणारी संस्कृती महाराष्ट्राची आहे असं खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं.