Narendra Modi: २५ रुपयांची वाढ करुन २ रुपयांची दर कपात, भुजबळांचा मोदींवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 05:42 PM2022-04-27T17:42:19+5:302022-04-27T17:49:21+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कोविडविषयक बैठकीत पेट्रोल व डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारमुळे पेट्रोल व डिझेलचे दर चढेच राहिले आहेत, असा आरोप केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कोविडविषयक बैठकीत पेट्रोल व डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारमुळे पेट्रोल व डिझेलचे दर चढेच राहिले आहेत, असा आरोप केला.

मात्र, महाराष्ट्रासारख्या, देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या राज्याला आर्थिक बाबतीत जी सापत्न वागणूक दिली जात आहे, त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नागरिकांना वस्तुस्थिती कळावी म्हणून, हे स्पष्ट करणे आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. आता, या वादावरुन महाविकास आघाडी सरकारविरुद्ध भाजप नेते असा वाद रंगला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आहे. तसेच, राज्य सरकारने सर्वसामान्य मराठी माणसाला दिलासा द्यावा, असेही त्यांनी म्हटलंय. तर, छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया दिलीय.

केंद्र सरकार वारंवार इंधनाचे दर वाढवत असून राज्यांना जीएसटीचा परतावा देत नाही, अशी टिका मंत्री छगन भुजबळ यांनी कली. पंतप्रधान मोदींनी राज्य सरकारचे कान टोचल्यानंतर मंत्र्यांनी केंद्रावर पलटवार केला आहे

२५ रुपयांची वाढ करुन त्यानंतर दोन रुपयांची दर कपात करुन फार मोठी कपात केल्याचा आभास केंद्रसरकारकडून निर्माण केला जातोय अशी टीका अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली.

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन छगन भुजबळ यांनी केंद्रसरकारवर निशाणा साधला. किरीट सोमय्या यांच्यावर जो हल्ला झाला त्याबाबतही पत्रकारांनी प्रश्न विचारला असता छगन भुजबळ यांनी रक्तस्त्राव झालेला नाही असे मेडिकल रिपोर्टमध्ये म्हटल्याचे सांगितलं.

दोषारोपाचा खेळ हा बचाव करण्यासाठी आणि गैरकृत्ये लपवण्यासाठी चांगला आहे. पण, त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत नाही, अशी टिका फडणवीस यांनी सरकारवर केली आहे.