तापाने फणफणत असलेल्या बाळाला घेऊन इलेक्शन ड्युटीवर आली शिक्षिका, जिल्हाधिकारी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 04:52 PM2023-11-16T16:52:37+5:302023-11-16T16:57:14+5:30

Madhya Pradesh Assembly Election: ही शिक्षिका तिच्या ८ वर्षांच्या मुलाला घेऊन निवडणूक साहित्य ताब्यात घेण्यासाठी आली होती. तिने एका हाताने ८ महिन्यांच्या मुलाला कडेवर घेतले होते. तर दुसऱ्या हाताने ती मतदानाची सामुग्री ताब्यात घेत होती.

मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी १७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठीची पूर्वतयारी प्रसासनाकडून सुरू आहे. इंदूरमधील नेहरू स्टेडियममध्ये इलेक्शन ड्युटीवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे साहित्य वाटप सुरू होते. त्यावेळी एका तरुण शिक्षिकेनं तिथे असलेल्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

ही शिक्षिका तिच्या ८ वर्षांच्या मुलाला घेऊन निवडणूक साहित्य ताब्यात घेण्यासाठी आली होती. तिने एका हाताने ८ महिन्यांच्या मुलाला कडेवर घेतले होते. तर दुसऱ्या हाताने ती मतदानाची सामुग्री ताब्यात घेत होती.

या मायलेकरांकडे सर्वांचं लक्ष जात होतं. मात्र इलेक्शन ड्युटीचा विषय असल्याने कुणी काही बोलू शकत नव्हतं. निवडणुकीच्या गडबडीमध्ये हे दृष्य पाहून अनेकजण भावूक झाले.

त्याचवेळी ही शिक्षिका आणि तिच्या मुलावर जिल्हाधिकारी इलैया राजा टी. यांचं लक्ष गेलं. बाळाचं संगोपन आणि आपलं कर्तव्य यांचं संतुलन साधण्यासाठी ही शिक्षिका कशाप्रकारे संघर्ष करतेय, हे त्यांनी पाहिलं. ही शिक्षिका आणि तिच्या मुलाला पाहून जिल्हाधिकारी इलैया राजा टी यांचही मन भरून आलं.

जिल्हाधिकाऱ्यांनी या शिक्षिकेला बोलावून घेतले. तसेच तिची इलेक्शन ड्युटी रद्द केली. तसेच या शिक्षिकेला निवडणूक ड्युटी सोडून त्वरित घरी जाण्याचे आणि बाळाची देखभाल करण्याचे आदेश दिले.

बाळाला घेऊन इलेक्शन ड्युटीवर आलेल्या या शिक्षिकेचं नाव ऋतू रघुवंशी आहे. ती खजराना प्राथमिक शाळेमध्ये शिक्षिका आहे. तिची चेतननगरमध्ये इलेक्शन ड्युटी लागली होती. ती ठरलेल्या वेळी सकाळी साडे सात वाजता नेहरू स्टेडियममध्ये पोहोचली. मात्र मुलाला ताप येत असल्याने आणि त्याला सांभाळणारं घरी कुणी नसल्यानं ती बाळाला तिच्यासोबत घेऊन आली होती.