ब्युटी ऑफ खाकी ! 'ग्लॅमऑन मिस इंडिया' स्पर्धेत PSI पल्लवी जाधव फर्स्ट रनरअप

By महेश गलांडे | Published: February 27, 2021 09:18 PM2021-02-27T21:18:41+5:302021-02-27T21:27:27+5:30

जालना दामिनी पोलीस पथकातील प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव या 'ग्लॅमऑन मिस इंडिया' स्पर्धा 2020 च्या फर्स्ट रनर अप ठरल्या आहेत.

आई-वडिलांनी रक्ताचे पाणी करून मुलीला शिकवलं आणि पाहता पाहता पल्लवी भाऊसाहेब जाधव या तरुणीच्या नावापुढे पोलीस उपनिरीक्षक ही पदवी लागली.

20 मे 2015 रोजी पल्लवी यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. पाच ऑक्टोबर 2015 नंतर एक वर्ष प्रशिक्षण घेऊन एम. ए मानसशास्त्र या विषयात देखील पारंगत असलेल्या पल्लवी यांनी विधिज्ञ म्हणूनही अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे.

फक्त पोलीस प्रशासनातच गुंतून न पडता अंगातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठीही पल्लवी जाधव नेहमीच प्रयत्नशील आहेत.

कामातील आणि अभिनयातील चूनुक दाखविण्यासाठी अभिनयाची आवड असल्यामुळे "प्रेमात पेटलं मन सार" या चित्रपटात देखील त्यांनी काम केले आहे.

जयपूरमध्ये नुकतेच पार पडलेल्या 'ग्लॅमऑन मिस इंडिया' स्पर्धेत देशभरातून 70 पेक्षा अधिक महिला स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. त्यात महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या पीएसआय पल्लवी जाधव यांना फस्ट रनर अप घोषित करण्यात आलं.

पीएसआय पल्लवी जाधव गेल्या पाच वर्षांपासून जालना पोलीस दलात कार्यरत आहेत. पोलीस उपनिरीक्षकाची जबाबदारी पार करत असताना पल्लवी जाधव आपले छंदही जोपासतात. या छंदामध्येच त्यांनी यश मिळवलं आहे.

कोयत्याशी असलेली जवळीक सांगताना पल्लवीच्या डोळ्यातील पाणी त्यांना लपवता आले नाही. त्या म्हणाल्या "माझ्यासाठी आई-वडिलांनी घेतलेले काबाड कष्ट हे मी शेवटपर्यंत विसरणार नाही.

पल्लवी जाधव या सोशल मीडियावरही चांगल्या एक्टीव्ह असतात, फेसबुकवरही त्यांना मोठा फॅन फॉलोविंग आहे. डॅशिंग महिला पोलीस अधिकारी अशी त्यांची ओळख आहे.

मिस इंडिया स्पर्धेतील यशानंतर पोलीस खाते आणि सामाजिक क्षेत्रातीतील मंडळींकडून पल्लवी जाधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे