Russia Ukraine War: अमेरिकेनं दिली गुप्त माहिती, टार्गेटवर रशियन जनरल अन् युक्रेननं साधला निशाणा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 09:13 AM2022-05-05T09:13:14+5:302022-05-05T09:17:26+5:30

रशिया आणि युक्रेन यांच्या भीषण युद्ध सुरू आहे. यातच एक मोठी माहिती समोर आली आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात रशियाविरोधात अमेरिका, ब्रिटेनसह जगभरातील अनेक देश युक्रेनची मदत करत आहेत. यातच अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने असा दावा केला आहे की अमेरिका युक्रेनला रशियन युनिटच्या हालचालींबद्दल गुप्तचर माहिती पुरवत आहे, ज्याने युक्रेनला रशियन जनरल्सना लक्ष्य करून ठार मारण्यास मदत होत आहे.

युक्रेनने दावा केला आहे की त्यांनी युद्धात १२ रशियन फ्रंट-लाइन जनरलला मारलं आहे. युक्रेनच्या या दाव्यामुळे लष्करी विश्लेषकही आश्चर्यचकित झाले आहेत. खरं तर, बायडन प्रशासन युद्धादरम्यान युक्रेनला रिअल-टाइम गुप्त माहिती पुरवण्याचं काम करत आहे. ज्यामुळे युक्रेनियन सैन्याला खूप मदत होत आहे.

नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका अमेरिकन अधिकाऱ्याने युक्रेनला गुप्त माहिती पुरवण्यासंदर्भात महत्त्वाचे गौप्यस्फोट केले आहेत. अमेरिकन अधिकार्‍याच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेत रशियन लष्कराच्या हालचालींचाही समावेश आहे. अमेरिकेने अलीकडेच युक्रेनला डॉनबास प्रदेशात रशियाच्या युद्ध योजनेची माहिती दिली. असं असलं तरी अमेरिकेच्या मदतीनं युक्रेननं किती रशियन जनरल मारले याचा तपशील देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे.

रशियन सैन्याच्या मोबाइल हेडक्वार्टरचे लोकेशन आणि इतर माहिती देण्यावर अमेरिका भर देत आहे. युक्रेनियन अधिकारी अमेरिकेकडून मिळणाऱ्या लाइव्ह लोकेशनची माहिती घेऊन रशियन अधिकार्‍यांची संपूर्ण माहिती मिळवतात. त्यानंतर संबंधित ठिकाणी हल्ला चढवण्यात येतो. या हल्ल्यात अनेक रशियन जनरल मारले गेले आहेत.

अमेरिका सुरुवातीपासूनच युक्रेनला युद्धात मदत करत आली आहे. रशियाच्या हल्ल्यानंतर अमेरिकेने युक्रेनला मदत म्हणून शस्त्रास्त्रे आणि आर्थिक मदत जाहीर केली होती. याशिवाय अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंधही लादले आहेत. आता गुप्त माहिती देऊन मोठं सहाय्य अमेरिकेकडून युक्रेनला केलं जात आहे.

अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेकडून युक्रेनला मिळालेल्या माहितीचा खूप मोठा फायदा युक्रेनला होत आहे. यामुळे युक्रेनला रशियन अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात मदत होत आहे. एवढेच नाही तर रशियन सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यानुसार कारवाई करण्यासाठी मोठी मदत होत आहे.

युद्धात कीव्हवर नियंत्रण मिळवण्यात रशियाला अपयश आल्यानं त्यांनी आता पूर्व युक्रेनवर अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, बायडन प्रशासनाने युद्धाशी संबंधित सर्व माहिती गुप्त ठेवण्याची मागणी केली आहे. कारण याकडे युद्धाची चिथावणी म्हणून पाहिले जाईल अशी भीती अधिकाऱ्यांना आहे.

अमेरिकी अधिकाऱ्यांनी रशियन लष्कराच्या मुख्यालयाची माहिती कशी मिळवली हे सांगितलेलं नाही. किंबहुना, असं करणं त्यांच्या माहिती मिळवण्याच्या स्रोताला हानी पोहोचवू शकते. पण युद्धादरम्यान अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी रशियन सैनिकांच्या कारवायांचा मागोवा घेण्यासाठी अनेक स्रोत वापरले आहेत. एवढं मात्र नक्की.