चीनचं 'भविष्य' धोक्यात...! शी जिनपिंग यांच्या देशाची अशी अवस्था का झाली?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 11:17 AM2024-02-22T11:17:00+5:302024-02-22T11:25:34+5:30

हम दो, हमारे दो..ही जाहिरात सगळ्यांनाच माहिती असेल. लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी अनेक देशांनी ही पॉलिसी अंमलात आणली. परंतु यात जगातील एकमेव देश चीन एकच अपत्य पुरे असल्याचं म्हणत होता. हा नियम इतका कडक होता की, कुठल्याही कुटुंबाने दुसऱ्या मुलाला जन्म दिला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होत होती.

मात्र घटत्या लोकसंख्येकडे पाहता चीनने जास्त मुले जन्माला घाला असं सांगितले. त्यासाठी टू चाइल्ड पॉलिसी बनवली. त्यानेही जास्त फरक पडला नाही. २०२१ मध्ये ३ मुले जन्माला घालण्याची परवानगी दिली. मुल जन्माला घालणाऱ्या जोडप्यांना पैसे देण्याचीही योजना चीन सरकारने आणली. आता चीन त्यांच्याच जाळ्यात अडकत चालला आहे.

चीनची लोकसंख्या सातत्याने कमी होतेय. याठिकाणी मुलांच्या पालनपोषणासाठी सर्वाधिक खर्च होत असल्याचे समोर येत आहे. चीनने अमेरिका आणि जपान यादेशालाही मागे सोडले आहे. बीजिंग थिंक टँकच्या पॉप्युलेशन रिसर्च इन्स्टिट्यूटने त्यांचा रिपोर्ट जारी केला आहे. ज्यात १८ वर्षापर्यंत मुलांचा सांभाळ करण्यासाठी ५३८००० युआन म्हणजे ६३ लाख रुपये खर्च येत असल्याचा अंदाज आहे.

मुलाच्या जन्मानंतर बहुतांश जबाबदारी आईच्या खांद्यावर येते. २०१० आणि २०१८ या कालावधीत मुलांच्या होमवर्कसाठी खर्च होणारा वेळ आठवडी ३.६७ तासाहून ५.८८ तास झाला आहे. मुलांच्या संगोपनासाठी आईला नोकरीपासून लांब राहावे लागत आहे.

चीनच नव्हे तर जगातील बहुतांश देशात जोडपे २ मुलांना जन्म देत नाहीत. त्यामागचे कारण म्हणजे आता महिला अधिक वयात मुलांना जन्म देतात. काही महिला शिक्षण आणि नोकरीसाठी मूल नको ही भूमिका घेतात. मुलांच्या जन्मानंतर येणारा खर्च, कुटुंब आणि काम एकत्रित सांभाळणे कठीण होते त्यामुळे महिला गरोदरापणापासून लांब राहतात.

नॅशनल ब्यूरो ऑफ स्टॅटेटिक्सनुसार २०२३ मध्ये चीनमध्ये ९०.२ लाख मुलांचा जन्म झाला. १९५९-६१ च्या दुष्काळानंतर पहिल्यांदाच चीनमध्ये सातत्याने २ वर्षात लोकसंख्या कमी होत आहे. यापुढच्या काळातही चीनमध्ये मूल जन्माला घालण्याचा दर कमी कमी होत राहील असा अंदाज आहे.

चीनमध्ये वयोवृद्धांची संख्या सातत्याने वाढत आहे. २०५० पर्यंत एक तृतीयांश कामगारांची उत्पादन क्षमता कमी होईल. चीन हा जगातील उत्पादक देश आहे. जर याठिकाणी युवकांची संख्या घटत गेली तर त्याचा बाजारावर परिणाम होईल.

कुठल्याही देशाला पुढे जाण्यासाठी युवकांची गरज असते. त्यामुळे आपल्या देशात युवकांची कमतरता भासू नये ही चीनची इच्छा आहे. २०२४ मध्ये चीनच्या अधिकाऱ्यांना सकारात्मक काही घडेल अशी अपेक्षा आहे. २०२४ हे ड्रॅगनचे वर्ष आहे, जे भाग्याचे मानले जाते असं चीन ज्योतिष शास्त्राने सांगितले.

चीनमध्ये घटत्या लोकसंख्येमुळे चीनचा आर्थिक विकास दर, उत्पादन क्षमता त्याचसोबत देशाच्या विकासावर मोठा परिणाम होणार आहे. सध्या चीनमध्ये जगातील सर्वात कमी जन्मदर असून त्याचा परिणाम देशाच्या विकासावर होणार आहे.