CoronaVirus Live Updates : चीनचा खोटारडेपणा उघड! "WHO ला कोरोनाची माहिती देण्याआधीच केली होती टेस्ट किटची खरेदी"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 02:05 PM2021-10-05T14:05:05+5:302021-10-05T14:19:21+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसची माहिती लपवण्याचा आरोप हा वारंवार चीनवर करण्यात येत आहे.

जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल 23 कोटींवर पोहोचली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे काही देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

जगातील सर्वच देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. अमेरिकेसारखे प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. काही देशांत पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान आता चीनचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

कोरोना व्हायरसची माहिती लपवण्याचा आरोप हा वारंवार चीनवर करण्यात येत आहे. याच दरम्यान अनेक देशांनी प्रश्न देखील उपस्थित केले. याच दरम्यान एका सायबर सिक्योरिटी कंपनीच्या रिसर्चमधून मोठा दावा करण्यात आला आहे. WHO ला कोरोनाची माहिती देण्याआधीच केली चीनने टेस्ट किटची खरेदी केल्याचं समोर आलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेला कोरोना व्हायरसची माहिती देण्यापूर्वी कित्येक महिने आधी कोरोना टेस्ट किटची खरेदी केली होती अशी धक्कादायक आता माहिती समोर आली आहे. रिसर्चनुसार, चीनी सरकारने कोरोना आजार जाहीर केल्याच्या काही महिन्यांपूर्वी देशातील हुबेई प्रांतात करोना चाचण्यांवरील खर्च वाढवला होता.

ऑस्ट्रेलियाच्या सायबरसुरक्षा कंपनी इंटरनेट 2.0 ने या आठवड्यात प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमधून ही माहिती समोरा आली आहे. चीन सरकारने 2019 मध्ये गेल्या वर्षापेक्षा कोरोना चाचण्यांसाठी वापरण्यात आलेल्या पॉलिमरेझ चेन रिअॅक्शन चाचणीवर जवळपास तीन पटीने अधिक खर्च केला होता.

हुबेई प्रांतातील वुहान शहरात कोरोना व्हायरसचे पहिली प्रकरण नोंदवले गेले होते. जागतिक आरोग्य संघटनेला चीनने 31 डिसेंबर 2019 मध्ये शहरात अज्ञात कारणामुळे न्यूमोनियाची प्रकरणे आढळली आहेत असे कळवले होते.

7 जानेवारी 2020 रोजी, चिनी अधिकाऱ्यांनी एक नवीन प्रकारचा कोरोनाव्हायरसची माहिती देत त्याला SARS-CoV-२ म्हणून ओळखले जाईल असं म्हटलं होतं. त्यानंतर कोरोना हा जवळजवळ जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरला आहे आणि 230 मिलियन अधिक लोकांना संसर्ग झाला आहे आणि जवळपास 48 लाख लोकांचा मृत्यू झाला.

रिसर्चच्या आधारावर, इंटरनेट 2.0 ने निष्कर्ष काढला की चीनने जागतिक आरोग्य संघटनेला कोविड -19 बद्दल माहिती देण्यापूर्वीच कोरोना महामारी सुरू झाली होती. डिजिटल फॉरेन्सिक्स आणि इंटेलिजन्स विश्लेषणामध्ये तज्ज्ञ असलेल्या सायबर सिक्युरिटी फर्मने पुढील तपास करत आहेत.

अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी असे म्हटले आहे की इंटरनेट 2.0 अहवालातून असे निष्कर्ष काढण्यासाठी पुरेशी माहिती नाही. कारण अनेक दशकांपासून व्यापक वापरात असलेली पीसीआर चाचणी लोकप्रिय आहे. ही चाचणी चाचणीसाठी एक मानक पद्धत बनली आहे, असे एका तज्ज्ञाने म्हटले आहे.

प्राण्यांसह, कोविड -19 व्यतिरिक्त इतर रोगजनकांच्या चाचणीसाठी प्रयोगशाळांमध्ये पीसीआर उपकरणे मोठ्या प्रमाणावर वापरली जातात आणि ती सामान्यतः आधुनिक रुग्णालये आणि प्रयोगशाळांमध्ये आढळतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 23 कोटींचा टप्पा पार केला आहे. एकूण रुग्णांची संख्या 236,173,236 पोहोचली आहे तर 4,822,840 लोकांचा बळी घेतला आहे. 213,239,700 लोकांनी कोरोनावर मात केली आहे.

Read in English