Corona Virus : चीनमध्ये संतापाचा उद्रेक! अखेर जनतेसमोर झुकलं सरकार; झिरो कोविड पॉलिसीत मोठा बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 05:06 PM2022-12-06T17:06:19+5:302022-12-06T17:35:04+5:30

China Corona Virus : चीनमध्ये कोरोनाने थैमान घातले असून रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.

चीनमध्ये कोरोनाने थैमान घातले असून रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. चीन सरकारने संपूर्ण देशात झिरो कोविड पॉलिसीची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी केली होती, ज्याच्या विरोधात हळूहळू देशभरात निषेधाची आग पसरली. आता चीन सरकारला लोकांच्या विरोधापुढे नमतं घ्यावं लागलं आहे.

चीनमध्ये लोकांच्या संतापाचा उद्रेक झाल्यामुळे अखेर सरकार जनतेसमोर झुकलं आहे. झिरो कोविड पॉलिसीत मोठा बदल केला आहे. बीजिंगमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये कोणतीही घट झालेली नाही, परंतु सार्वजनिक वाहतूक, बार-रेस्टॉरंट्स, शाळा, इंटरनेट कॅफे, इनडोअर गेमिंग स्टेडियम इत्यादी हळूहळू सुरू होत आहेत.

जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली तर त्याला क्वारंटाईन सेंटरमध्ये जाण्याची गरज नाही. त्याला फक्त घरीच क्वारंटाईन केले जाऊ शकते. गेल्या आठवड्यापासून चीनमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांनंतर, चीन सरकार हळूहळू स्वतःहून कठोरपणे आपली झिरो कोविड पॉलिसी संपवत आहे.

चीनची राजधानी बीजिंगने मंगळवारी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या झिरो कोविड पॉलिसीला विरोध केल्यानंतर दोन वर्षांत प्रथमच कोरोना व्हायरस चाचणी आवश्यकतांचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. चीन सरकारच्या नव्या घोषणेनुसार, शॉपिंग मॉल्स, सुपरमार्केट, निवासी संकुलांमध्ये प्रवेश करण्यासाठी लोकांना कोरोना रिपोर्टची गरज नाही.

बीजिंगच्या रहिवाशांनी रेस्टॉरंट, शाळा, बार, इंटरनेट कॅफे, इनडोअर गेमिंग स्टेडियम, नर्सिंग होम, कल्याण सुविधा, रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांमध्ये प्रवेश करण्यासाठी 48 तासांच्या आत कोविड-19 चा रिपोर्ट दाखवावा लागेल. ज्यामध्ये ते संक्रमित नाहीत याचा उल्लेख असायला हवा.

बीजिंग शहरात कोविड-19 ची मोठ्या प्रमाणात प्रकरणे समोर येत आहेत. सोमवारी शहरात 2,260 कोविड संसर्गाची नोंद झाली आहे. दुसरीकडे, सरकारच्या झिरो कोविड पॉलिसीविरोधात बीजिंग आणि शांघाईसह चीनच्या अनेक शहरांमध्ये सार्वजनिक आंदोलने होत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

चीनमध्ये सरकारच्या कठोर कोविड निर्बंधांविरोधातील निदर्शने तीव्र झाली होती. कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांविरोधात मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरत होते. शांघाईच्या रस्त्यावर हजारोंच्या संख्येने लोक उतरलेले पाहायला मिळाले. बीजिंग आणि नानजिंग येथील विद्यापीठांमध्येही विद्यार्थ्यांनी निदर्शने केली आहेत.

चिनी अधिकार्‍यांनी 'कोविड निर्बंधांमुळे मृत्यू' हा आरोप फेटाळला आहे. उरुमकी अधिकाऱ्यांनी माफी मागितली. चीनचं सर्वात मोठं शहर शांघाईमध्ये रस्त्यावर शी जिनपिंग आणि कम्युनिस्ट पार्टीविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. काहींनी व्हाईट बॅनरसह निदर्शनात भाग घेतला होता.