Corona Virus : कोरोनाचा प्रकोप! चीन, जपान, ब्राझीलमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर, अनेक ठिकाणी लॉकडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 11:58 AM2022-11-27T11:58:15+5:302022-11-27T12:12:45+5:30

Corona Virus : पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने प्रकोप दाखवायला सुरुवात केली आहे. जगातील अनेक देशांमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे चित्र आहे.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने (Corona Virus) प्रकोप दाखवायला सुरुवात केली आहे. जगातील अनेक देशांमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे चित्र आहे. कोरोनाचे उगमस्थान असलेल्या चीनमध्ये (China) परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याची माहिती समोर येत आहे.

चीन पुन्हा एकदा कोरोनाचा हॉटस्पॉट बनत आहे. चीनमधील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जर आपण आकडेवारीवर नजर टाकली तर, 26 नोव्हेंबर रोजी देशात 39,791 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली होती. शनिवारी त्यांची संख्या 35,183 होती. यासोबतच एका कोरोना रुग्णाचाही मृत्यू झाला आहे.

चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत आणि त्यामुळेच चीनच्या अनेक प्रांतांमध्ये आता लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. चीनने अलीकडेच स्थानिक लॉकडाउन, टेस्टिंग, प्रवास प्रतिबंध आणि इतर अनेक निर्बंध लागू केले आहेत. लॉकडाऊन आणि अनेक निर्बंधांमुळे लोकांचे हाल होत आहे.

चीन सरकारच्या म्हणण्यानुसार, झिरो-कोविड धोरण जीव वाचवण्यात खूप यशस्वी ठरत आहे. चिनी सरकारने कबूल केले आहे की हा व्हायरस बराच काळ अनियंत्रित राहिल्यास मोठा धोका निर्माण होईल. विशेष म्हणजे, 80 आणि त्याहून अधिक वयाच्या केवळ 66% लोकांना लसीकरण करण्यात आले आहे आणि त्यापैकी फक्त 40% लोकांना बूस्टर डोस मिळाला आहे.

चीनसोबतच ब्राझीलमध्येही कोरोना झपाट्याने पसरत आहे. ब्राझीलच्या अहवालानुसार, देशात 27 पैकी 15 राज्यांमध्ये कोविडची गंभीर प्रकरणे वेगाने वाढत आहेत. फेडरल हेल्थ रेग्युलेटर अन्विसा यांनी मंगळवारी विमानतळ आणि विमानांमध्ये मास्क अनिवार्य केले आहेत. त्यामुळे लोकांना लवकरात लवकर लस घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

InfoGripe डेटानुसार, गेल्या सहा आठवड्यांमध्ये, अलागोस, बाहिया, सिएरा, फेडरल डिस्ट्रिक्ट, गोयास, माटो ग्रोसो डो सुल, मिनास गेराइस, पॅरा, पाराइबा, पियाउई, रिओ ग्रांदे डो नॉर्टे, रिओ डी जनेरियो येथे कोविड प्रकरणे वेगाने वाढली आहेत.

जपानमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. जपान टुडेच्या अहवालानुसार, शनिवारी जपानमध्ये 1,25,327 नवीन कोरोना रुग्ण आढळले. दुसरीकडे राजधानी टोकियोमध्ये 13,569 नवीन प्रकरणे नोंदली गेली. शुक्रवारपासून टोकियोमध्ये गंभीर लक्षणांसह रुग्णालयात दाखल झालेल्या संक्रमित लोकांची संख्या दोन ते 18 ने कमी झाली आहे.

देशभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 164 झाली आहे. फुमियो किशिदा यांनी एका आठवड्यापूर्वी सांगितले होते की "आम्ही परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत आहोत आणि लोकांचे जीवन तसेच आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक उपाय करत आहोत." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.