४.५ लाख पगार देण्याची तयारी, तरीही ख्रिस्तियानो रोनाल्डोला मिळेना 'आचारी'!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 06:00 PM2023-01-20T18:00:54+5:302023-01-20T18:03:18+5:30

पोर्तुगालचा सुपरस्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने सौदी अरेबियातील नवीन क्लब अल नस्रकडून दमदार सुरूवात केली. जगात त्याचे कोट्यवधी चाहते आहेत.

पोर्तुगालचा सुपरस्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने सौदी अरेबियातील नवीन क्लब अल नस्रकडून दमदार सुरूवात केली. जगात त्याचे कोट्यवधी चाहते आहेत. इंग्लिश प्रीमिअर लीगमधील मँचेस्टर युनायटेडसोबतचा करार संपवून रोनाल्डो सौदी अरेबियाच्या अल नास्र क्लबकडून खेळण्यासाठी रियाधला पोहोचला आहे, तेव्हापासून जगभरात त्याची चर्चा अधिकच रंगत आहे.

पाच वेळा बॅलोन डी ओर पुरस्कार विजेता ३७ वर्षीय रोनाल्डो अन् अल नास्र क्लब यांच्यात अडीच वर्षांचा करार झाला आहे. रोनाल्डो त्यासाठी वर्षाला १७३ मिलियन पाऊंड म्हणजेच १७४८ कोटी रुपये क्लबकडून घेणार आहे आणि त्यामुळे रोनाल्डो पुन्हा एकदा जगातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डोला करारबद्ध करण्याआधी अल नास्र क्लबचे इंस्टाग्रामवर ८ लाख फॉलोअर्सच होते. पण त्यांनी रोनाल्डोला करारबद्ध केल्याची घोषणा केली अन् ही फॉलोअर्सचा आकडा ८७ कोटींच्या वर गेला. रोनाल्डोसोबत अनेक ब्रांडही अल नास्र क्लबसोबत करार करण्यासाठी पुढे आले आहेत.

रोनाल्डोने २००९ ते २०१८ या कालावधीत स्पॅनिश क्लब रिआल माद्रिदसोबत उत्कृष्ट खेळ केला. या काळात त्याने दोन ला लीगा, दोन स्पॅनिश चषक, चार चॅम्पियन्स लीग विजेतेपद आणि तीन क्लब वर्ल्ड कप जिंकले आहेत. रोनाल्डोने क्लब आणि देशासाठी एकूण ८०० हून अधिक गोल केले आहेत. रोनाल्डोने युव्हेंटसमध्ये तीन वर्षात दोन सिरी ए जेतेपद आणि एक कोपा इटालिया ट्रॉफीही जिंकली.

पण, सध्या रोनाल्डो एका विचित्र समस्येत अडकला आहे. रोनाल्डोला त्याच्या कुटुंबासाठी वैयक्तिक आचारी ठेवायचा आहे. पोर्तुगालमधील त्याच्या घरी हा आचारी हवा आहे अन् काही केल्या त्याला तो सापडत नाही.पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार आणि त्याची जोडीदार जॉर्जिना रॉड्रिग्ज हिने वैयक्तिक आचारीबाबत काही अटी घातल्या आहेत. या आचारीला पोर्तुगालमधील रोनाल्डोच्या घरात स्वयंपाकी म्हणून काम करावे लागेल.

ब्रिटीश वृत्तपत्र द मेलच्या मते, या जोडप्याला वैयक्तिक आचारी असा असावा जो पोर्तुगीज खाद्यपदार्थ बनवण्याव्यतिरिक्त स्वादिष्ट आंतरराष्ट्रीय पदार्थ तयार करण्यात माहिर असावा. उदाहरणार्थ, त्याला जपानी फूड सुशी कशी बनवायची हे माहित असावे. रिपोर्टनुसार, रोनाल्डो या आचाऱ्याला दरमहा ४.५ लाख रुपये पगार देण्यास तयार आहे.

रोनाल्डो पोर्तुगालमधील क्विंटा दा मारिन्हा येथे आपल्या कुटुंबासाठी एक आलिशान घर बांधत आहे. ३७ वर्षीय फुटबॉलपटूने सप्टेंबर २०२१ मध्ये आपल्या घरासाठी जमीन खरेदी केली होती. जून २०२३ पर्यंत त्याचे घर पूर्ण होईल असे मानले जाते. रोनाल्डो गेल्या महिन्यात अल नास्रकडून खेळण्यासाठी सौदी अरेबियाला पोहोचला होता.