Gadchiroli Encounter: नक्षल्यांचा कर्दनकाळ! C-60 युनिट म्हणजे काय? कसे निवडले जातात कमांडो? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 03:27 PM2021-11-14T15:27:34+5:302021-11-14T15:34:35+5:30

Gadchiroli Encounter by C-60 unit: ही एकमेव अशी फोर्स आहे जिच्या टीमला त्याच्या कमांडरच्या नावाने ओळखले जाते. 2018 मध्ये C-60 यूनिटने 39 नक्षलवाद्यांना मारले होते. याचा बदला नक्षलवाद्यांनी 2019 मध्ये घेतला होता.

गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई झाली आहे. 50 लाखांचा इनाम डोक्यावर असलेला जहाल नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे या चकमकीत मारला गेला आहे. एकूण 1.38 कोटींचे इनाम या नक्षलवाद्यांवर होते. ग़डचिरोली पोलिसांची सी 60 टीमने ही खतरनाक कारवाई केली आहे. चार जवान जखमी झालेले असले तरी कमी नुकसान होत मोठ्या प्रमाणावर नक्षली मारले गेले आहेत. नक्षल्यांचा कर्दनकाळ ठरलेली C-60 तुकडी म्हणजे काय? कसे निवडले जातात जवान? जाणून घ्या

2018 मध्ये C-60 यूनिटने 39 नक्षलवाद्यांना मारले होते. याचा बदला नक्षलवाद्यांनी 2019 मध्ये घेतला होता. सी-60 युनिटच्या जवानांचे वाहन आयईडीने उडवून देण्यात आले होते. त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. यामध्ये 15 जवान शहीद झाले होते. सी 60 ला नक्षलवादी आपला सर्वात मोठा दुष्मन मानतात.

नक्षलवाद्यांचा धोका लक्षात घेऊन 1992 मध्ये सी 60 कमांडोंची फोर्स तयार करण्यात आली होती. यामध्ये पोलीस फोर्समधील खास प्रशिक्षण घेतलेले 60 जवान तैनात असतात. ही तुकडी बनविण्याचे काम तेव्हाचे एसपी के. पी रघुवंशी यांनी केले होते. या पोलिसांना गोरिल्ला युद्धासाठी देखील तयार केले जाते. या पोलिसांची ट्रेनिंग हैदराबाद, बिहार आणि नागपूरमध्ये होते.

या फोर्सला महाराष्ट्राची सर्वोत्कृष्ट फोर्स मानले जाते. दररोज गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीवरून आजुबाजुच्या भागात कारवाया केल्या जातात. C-60 चे जवान आपल्यासोबत जवळपास 15 किलोचे वजने घेऊन जातात. यामध्ये शस्त्रे, जेवण, पाणी, फर्स्ट एड आदी सामान असते.

ही देशातील एकमेव अशी फोर्स आहे जी जिल्हास्तरावर तयार करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे नक्षलवाद्यांच्या भागातीलच तरुण या फोर्समध्ये असतात. याचे मोठे कारण म्हणजे नक्षलवाद्यांसारखेच ते या भागाला ओळखतात. त्यांना या भागाची माहिती असते, भाषेची माहिती असते. यामुळे तेथीलच ग्रामस्थांना कमांडोचे ट्रेनिंग दिले जाते.

अशाच काही फोर्स देशात अन्य ठिकाणी देखील तयार करण्यात आल्या आहेत. तेलंगानामध्ये ग्रेहाउंड्स आणि आंध्र प्रदेशमध्ये स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी) आहे. मात्र या फोर्स राज्य स्तरावर बनविण्यात आल्या आहेत. "वीर भोग्या वसुंधरा" ही या फोर्सची टॅगलाईन आहे.

C-60 म्हणजे हे एक युनिट आहे. या युनिटमध्ये एकापेक्षा जास्त टीम आहेत. प्रत्येक टीममध्ये 60 जवान असतात. सुरुवातीला सी 60 मध्ये 15 टीम होत्या. आता ही संख्या 24 वर गेली आहे.

फोर्समध्ये सहभागी होण्यासाठी आदिवासींना अनेक चाचण्या, खडतर आव्हानांचा सामना करावा लागतो. शारीरिक आणि मानसिक मनोबल पाहिले जाते. ही एकमेव अशी फोर्स आहे जिच्या टीमला त्याच्या कमांडरच्या नावाने ओळखले जाते. हा कमांडर तेथीलच आदिवासी असतो.

या आदिवासींना अद्ययावत हत्यारे आणि गॅजेट्स चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांची गुप्तचर यंत्रणादेथील जबरदस्त असते. कारण त्या भागात त्यांचेच मित्र, नातेवाईक राहत असतात. स्थानिक भाषा येत असल्याने त्यांना इतरांपेक्षा लवकर माहिती मिळते. स्थानिकांना देखील त्यांच्याशी संवाद साधताना अडचणी येत नाहीत.

C-60 कमांडो स्वत:च या फोर्समध्ये दाखल होण्यासाठी येतात. यांच्यापैकी बऱ्याच जवानांचे नातेवाईक नक्षल्यांनी मारलेले असतात. स्थानिक भाषा गोंडी तसेच मराठी त्यांना येते. यामुळे बाहेरून जवान आणण्यापेक्षा तेथीलच पीडित तरुण बदल्याच्या भावनेने नक्षलवाद्यांविरोधात मोठ्या ताकदीने लढतात.