Arpita Mukherjee : आधी सरकारी नोकरी सोडली मग 'पती'; छोट्या सिनेमात काम करणारी अर्पिता मुखर्जी 'अशी' झाली 'धनकुबेर'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 04:14 PM2022-07-30T16:14:04+5:302022-07-30T16:39:11+5:30

Arpita Mukherjee : मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली अर्पिता मुखर्जी कोट्यवधींची मालकीण कशी बनली? याबाबत आता माहिती समोर आली आहे.

पश्चिम बंगालमधील ममता सरकारमध्ये मंत्री असलेले पार्थ चॅटर्जी देशभरात चर्चेत आले आहेत. पार्थ चॅटर्जीला ईडीने अटक केली केली आणि चॅटर्जीची सहकारी अर्पिता मुखर्जीच्या (Arpita Mukherjee) घरांवर छापेमारी केली. यात आतापर्यंत 50 कोटींहून अधिकची रोख आणि अनेक किलो सोने सापडले आहे.

ईडीने पार्थची सहकारी आणि या शिक्षक भरती घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या अर्पिता मुखर्जीच्या ठिकाणांवर छापेमारी केली. ईडीच्या पथकाने अर्पिताच्या दुसऱ्या फ्लॅटवर छापा टाकल्यानंतर सापडलेली रक्कम पाहून अधिकारीही चक्रावले.

दोन हजारांच्या नोटांच अक्षरशः ढिग सापडला. एवढेच नाही तर सोन्याच्या वीटा, दागिने, विदेशी चलन आणि मालमत्तेची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. ईडीच्या गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या दोन छाप्यांमध्ये आतापर्यंत एकूण 50.36 कोटी रुपये रोख आणि 5.07 कोटी रुपयांचे सोने सापडले आहे

ईडीच्या पथकाने 55 कोटींहून अधिकचा काळा पैसा जप्त केला आहे.फ्लॅटमधून सुमारे 30 कोटी रुपयांची रोकड मिळाली आहे. यासोबतच दागिने आणि पाच किलो सोनेही सापडले आहे. सोन्याची किंमत 4.31 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय मालमत्तेची कागदपत्रेही सापडली आहेत.

मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली अर्पिता मुखर्जी कोट्यवधींची मालकीण कशी बनली? याबाबत आता माहिती समोर आली आहे. सरकारी अधिकारी असलेल्या वडिलांच्या निधनानंतर अर्पिताला त्यांच्या जागी नोकरी मिळाली पण तिने ही नोकरी करण्यास नकार दिला.

अर्पिताचे एका व्यावसायिकाशी लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर काही महिन्यांतच तिने नवऱ्याला सोडलं. अर्पिताला सरकारी नोकरी करताना कोणत्याही बंधनात अडकायचं नव्हतं. तिची स्वप्ने मोठी होती. ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तिने मॉडेलिंग आणि अभिनयाच्या जगात पाऊल ठेवलं.

कॉलेजच्या दिवसांतच अर्पिताने मॉडेलिंग आणि अभिनयाला सुरुवात केली. पण अभिनयाची खरी सुरुवात बंगाली चित्रपटांमुळे झाली. सुरुवातीला अर्पिताला तिच्या सौंदर्यामुळे चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका मिळू लागल्या

2008 साली पार्टनर या बंगाली चित्रपटात पदार्पण करण्याची तिला संधी मिळाली होती. तिने चित्रपटात चांगले काम केलं असून तिच्या भूमिकेची चर्चाही झाली. त्यामुळेच दिग्दर्शक अनूप सेनगुप्ता यांनी मामा-भगने या पुढच्या चित्रपटाची नायिका म्हणून तिची निवड केली. हा चित्रपट 2010 मध्ये आला होता.

बंगाली चित्रपटांव्यतिरिक्त अर्पिताला इतरही चित्रपटांमध्ये काम मिळाले आहे. अनेक चित्रपटांमध्ये साईड रोल्स मिळालो. 2011 मध्ये अर्पिताला बांगला बचाओ या चित्रपटात काम करण्याची संधीही मिळाली आणि येथून हळूहळू नाव आणि तिची कीर्ती वाढू लागली.

2010 मध्येच अर्पिताची पार्थ चॅटर्जीशी भेट झाली. त्यांची भेट एका बंगाली अभिनेत्रीने केली होती. त्यानंतर दोघे वारंवार भेटू लागले. दोघेही अनेक ठिकाणी एकत्र दिसू लागले. असं म्हटलं जातं की, अर्पिताचं संपूर्ण फिल्मी करिअर केवळ 6 वर्षांचंच होतं.

2008 ते 2014 या काळात चित्रपटांमध्ये काम केले. यानंतर पार्थ चॅटर्जीने पश्चिम बंगाल सरकारमध्ये शिक्षण मंत्री असताना अर्पिताला 2016 मध्ये दुर्गा उत्सव समितीची स्टार प्रचारक बनवलं होतं. यानंतरच संपत्तीत देखील वेगाने वाढ होऊ लागली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिेले आहे.

अर्पिता मुखर्जीच्या आईला आपल्या लेकीकडे किती पैसा आहे याची कल्पनाच नसल्याचं आता समोर आलं आहे. पश्चिम बंगालमधील एका जुन्या, मोडकळीस आलेल्या घरामध्ये त्या राहतात. हे घर उत्तर 24 परगनाच्या बेलघोरिया परिसरात आहे. येथे अर्पिताची आई मिनती मुखर्जी या एकट्याच राहतात.

घर जवळपास 50 वर्षे जुनं आहे. या घरामध्ये अर्पिताच्या वृद्ध आणि आजारी असलेल्या आईकडे कोणतंच मौल्यवान सामान देखील नाही. मुलगी सोयीसुविधा आणि श्रीमंतीचं आयुष्य जगत असताना दुसरीकडे आईजवळ मात्र आवश्यक गोष्टींची देखील कमतरता असलेली पाहायला मिळत आहे.

अर्पिताने आपल्या आजारी आईची काळजी घेण्यासाठी दोन हाऊस हेल्पर ठेवले आहे. ते त्यांच्या जेवणाची व्यवस्था करतात. परिसरातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्पिता कधी कधी आपल्या आईला एका कारमधून भेटायला येते. पण ती येथे जास्त वेळ थांबत नाही. अर्पिताच्या आईने आपल्या लेकीबाबत बोलण्यास नकार दिला आहे.

ईडीला अर्पिता मुखर्जीच्या टालीगंजमधील फ्लॅटमधून 21 कोटी रुपये मिळाले होते. म्हणजेच ईडीने अर्पिताच्या दोन घरांतून 50 कोटींहून अधिक रोकड जप्त केली आहे. पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांना अटक करण्यात आली असून, दोघांना 3 ऑगस्टपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे.

ईडीच्या छाप्यात 55.43 कोटींहून अधिकची रक्कम सापडली आहे. सोन्याची एकूण रिकव्हरी सुमारे 5 किलो आहे, ज्यामध्ये 1-1 किलो वजनाच्या 3 सोन्याच्या पीटा आहेत, अर्धा किलोपेक्षा जास्त वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या आणि सोन्याच्या पेनाचा समावेश आहे.

ईडीच्या गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या दोन छाप्यांमध्ये आतापर्यंत एकूण 50.36 कोटी रुपये रोख आणि 5.07 कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणात अधिक कारवाई करण्यात येत असून घटनेने एकच खळबळ उडाली आहे. (सर्व फोटो - सोशल मीडिया)