मंत्रीच ४ तास थांबले कार्यकर्त्यांच्या प्रतीक्षेत; नंतर पुष्पहार, पुष्पगुच्छ देण्यासाठी अक्षरशः लोटालोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 01:34 PM2021-08-18T13:34:23+5:302021-08-18T13:42:37+5:30

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच रावसाहेब दानवे ( Raosaheb Danave ) हे विशेष बोगीतून प्रवास करीत मंगळवारी पहाटे ४.२० वाजता औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर दाखल झाले. पण नियोजित वेळेआधीच पोहोचल्यामुळे स्वागतासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी त्यांनी ४ तास बोगीतच विश्रांती घेतली. सकाळी ८.५० वाजता ते बोगीतून बाहेर पडले. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची एकच गर्दी झाली होती. पुष्पहार, पुष्पगुच्छ देण्यासाठी अक्षरशः लोटालोटी झाली. ( फोटो - सचिन लहाने )

रावसाहेब दानवे हे मुंबईहून देवगिरी एक्स्प्रेसने मनमाडपर्यंत आणि मनमाडहून पुढील प्रवास सचखंड एक्स्प्रेसने करीत सकाळी १० वाजता औरंगाबादला येणार होते. मात्र, सचखंड एक्स्प्रेस तब्बल ३.३० तास उशिरा धावली.

त्यामुळे ऐनवेळी नियोजनात बदल करून देवगिरी एक्स्प्रेसनेच ते थेट औरंगाबादेत दाखल झाले. ही रेल्वे पहाटे ४.२० वाजता रेल्वे स्टेशनवर दाखल झाली. कार्यकर्त्यांना सकाळी ७.३० वाजेचा निरोप देण्यात आला.

लवकर पोहोचल्यामुळे दानवे विशेष बोगीत विश्रांती घेत होते. प्लॅटफाॅर्मवर आणि स्टेशन बाहेर थांबलेले कार्यकर्ते त्यांच्या बाहेर येण्याची वाट पहात होते.

सकाळी ८.५० वाजता दानवे बोगीतून बाहेर आले आणि कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी एकच चढाओढ केली. रेल्वे स्टेशन परिसरातील स्टेजवर सत्कार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी ढकलाढकली केली.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे, शहराध्यक्ष संजय केनेकर, शहर जिल्हा सरचिटणीस राजू वैद्य, बसवराज मंगरुळे, सूरज लोळगे आदींची उपस्थिती होती. सर्वांचे स्वागत स्वीकारत दानवे रेल्वे स्टेशनवरून रवाना झाले.

रावसाहेब दानवे यांच्या दौऱ्यामुळे रेल्वे स्टेशनवर विविध खबरदारी घेण्यावर भर दिला गेला. स्वच्छतेपासून तर सोयीसुविधांच्या बाबतीत कोणतीही त्रुटी निदर्शनास येणार नाही, याची दक्षता घेण्यात आली होती. मात्र, रेल्वे राज्यमंत्री नाराजी व्यक्त करतील, असा कोणताही प्रसंग उद‌्भवला नाही. त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

रेल्वे स्टेशनच्या नव्या इमारतीसमोर आणि जुन्या इमारतीसमोर भाजपचे दोन स्टेज टाकण्यात आले होते. दोन्ही स्टेजवर हजेरी लावत दानवे यांनी सत्कार स्वीकारले. या दोन स्टेजमुळे भाजपतील गटबाजीची चर्चा सुरू होती.

गर्दीतून मार्ग काढीत एक आजी रेल्वे स्टेशनच्या नव्या इमारतीसमोरील स्टेजवर पोहोचल्या. ही बाब लक्षात येताच त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधत दानवे यांनी आजींना पुष्पगुच्छ घातला. या सत्काराने मोठ्या आनंदात आजी गर्दीतून बाहेर पडल्या.