अनोखं करण्याच्या नादात पांड्याची 'रणनीती' फसली? हार्दिक म्हणतो, "मला पश्चाताप नाही..."

By ओमकार संकपाळ | Published: August 14, 2023 01:31 AM2023-08-14T01:31:20+5:302023-08-14T01:33:54+5:30

IND vs WI 5th T20 : पाचवा ट्वेंटी-२० सामना जिंकून वेस्ट इंडिजने मालिका आपल्या नावावर केली.

मागील मोठ्या कालावधीपासून भारताच्या ट्वेंटी-२० संघाची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर आहे. वेस्ट इंडिजविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत देखील संघ व्यवस्थापनाने हार्दिकवर विश्वास दाखवला. पण, पांड्याची रणनीती अन् भारताचा पराभव यामुळे तो टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे.

वेस्ट इंडिजविरूद्धच्या पहिल्या दोन सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. तर, तिसरा आणि चौथा सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत बरोबरी साधली.

अखेरच्या आणि निर्णायक सामन्यात मात्र भारताला आपला विजयरथ कायम ठेवता आला नाही. वेस्ट इंडिजने विजय मिळवून ३-२ ने मालिका खिशात घातली.

भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याची रणनीती अनेकांना विचार करण्यास भाग पाडणारी आहे. विशेष बाब म्हणजे वेगवान गोलंदाज मुकेश कुमारचा वापर अखेरच्या षटकांमध्ये केल्यामुळे हार्दिकला ट्रोल केले जात आहे.

त्यामुळे काहीतरी नवं करण्याच्या नादात हार्दिक पांड्याची रणनीती फसली असल्याचा सूर क्रिकेट वर्तुळात आहे. प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने देखील समालोचन करताना यावरून प्रश्न उपस्थित केले.

हार्दिक पांड्याची रणनीती चुकली असून तो हताश झाला असल्याची टीका चोप्राने केली. तसेच मुकेश कुमारला लवकर षटक का दिले जात नाही? हा मोठा प्रश्न असल्याचे त्याने म्हटले.

याशिवाय मुकेश कुमार कसोटी क्रिकेटमध्ये नव्या चेंडूने गोलंदाजी करतो मात्र इथे तसे होत नाही. ट्वेंटी-२० मध्ये मुकेशला डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणूनच का वापरले जाते, असेही आकाश चोप्राने नमूद केले.

"पराभव कधी कधी चांगला देखील असतो कारण तो आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवत असतो. हार जीत हा खेळाचा भाग आहे असं मी समजतो. गोलंदाजीत बदल केले यासाठी मी कोणतीही रणनीती आखली नव्हती. आम्ही एक संघ म्हणून जे कठीण आहे ते करण्याचा निर्णय घेतला", असे हार्दिकने सामन्यानंतर स्पष्ट केले.

तसेच प्रथम फलंदाजी केल्याचा मला अजिबात पश्चात्ताप होत नसून अशा खेळांमुळे आम्हाला चांगले होण्यासाठी शिकायला मिळेल, असेही पांड्याने सांगितले.

हार्दिक पांड्याने अखेरच्या सामन्यात काही वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. खुद्द पांड्याने तीन षटके टाकली तर अक्षर पटेलला एक षटक टाकण्याची संधी मिळाली. यामुळे पांड्याच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

वेस्ट इंडिजच्या ब्रँड किंगने त्याच्या नावाप्रमाणेच पाचव्या सामन्यात 'राज' केलं. ८५ धावांची नाबाद खेळी करून किंगने भारतीय संघाला पराभवाची धूळ चारली. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून यजमानांनी आघाडी घेतली होती. पण, सलग दोन सामने जिंकून टीम इंडियाने मालिका जिंकण्याच्या आशा कायम ठेवल्या.

मात्र, तिसऱ्या आणि फायनल सामन्यात हार्दिकसेनेला पराभवाचा सामना करावा लागला अन् विडिंजने ३-२ ने मालिका खिशात घातली.