Reliance Infra Shares : ₹९ वरुन २८० वर पोहोचले अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स, ४ वर्षात ३०००% तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 06:51 PM2024-03-23T18:51:41+5:302024-03-23T18:56:57+5:30

गेल्या काही दिवसांपासून अनिल अंबानी यांचं नाव चर्चेत आलंय. याचं कारण म्हणजे त्यांच्या कंपनीबाबतच्या सकारात्मक बातम्या.

गेल्या काही दिवसांपासून अनिल अंबानी यांचं नाव चर्चेत आलंय. याचं कारण म्हणजे त्यांच्या कंपनीबाबतच्या सकारात्मक बातम्या. अनिल अंबानींच्या कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली आहे. शुक्रवार, 22 मार्च रोजी रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स 5% पेक्षा जास्त वाढून 286.70 रुपयांवर पोहोचले.

शुक्रवारी कंपनीच्या शेअर्सनं 52 आठवड्यांचा नवीन उच्चांकी स्तर गाठला आहे. गेल्या एका महिन्यात रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स सुमारे 22% वाढले आहेत. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर JC फ्लॉवर्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीची 2100 कोटी रुपयांची थकबाकी निकाली काढण्याचं काम करत असल्याचं वृत्त आहे.

गेल्या 4 वर्षांत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. अनिल अंबानी यांच्या मालकीच्या कंपनीच्या शेअर्समध्ये 4 वर्षात जवळपास 3000 टक्क्यांची वाढ झाली आहे. 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स 9.20 रुपयांवर होते.

22 मार्च 2024 रोजी कंपनीच्या शेअर्सनं 286.70 रुपयांचा उच्चांक गाठला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदारानं 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स इन्फ्राच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असेल, तर या शेअर्सचे सध्याचे मूल्य 31.16 लाख रुपये झालं असतं.

गेल्या एका वर्षात रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स 90% पेक्षा जास्त वाढले आहेत. 23 मार्च 2023 रोजी रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स 148.10 रुपयांवर होते. 22 मार्च 2024 रोजी कंपनीच्या शेअर्सनं 286.70 रुपयांचा उच्चांक गाठला आहे. त्याचवेळी, गेल्या 6 महिन्यांत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये 60 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

गेल्या 3 वर्षात कंपनीचे शेअर्स 670 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 36.55 रुपयांवरून 286.70 रुपयांपर्यंत वाढले आहेत. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 131.40 रुपये आहे. (टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती दिली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)