अधिक मास: शुक्र-शनीचा खप्पर योग, ५ राशींना प्रतिकूल; राहावे अखंड सतर्क, ३० दिवस महत्त्वाचे!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 03:13 PM2023-07-20T15:13:07+5:302023-07-20T15:13:07+5:30

अधिक मासात खप्पर नामक फारसा अनुकूल नसलेला योग जुळून येत आहे. कोणत्या ५ राशींच्या व्यक्तींनी अधिक महिन्यात काळजी घ्यावी? जाणून घ्या...

अधिक मासाला सुरुवात झाली आहे. १८ जुलै रोजी सुरू झालेला अधिक महिना १६ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. चातुर्मासातील व्रत-वैकल्यांनी भरलेला श्रावण मास यंदा अधिक आहे. १७ ऑगस्टपासून निज श्रावण सुरू होणार आहे. सुमारे दर तीन वर्षांनी अधिक महिना येतो. अधिक महिना श्रीविष्णूंना समर्पित असल्यामुळे याला पुरुषोत्तम मास म्हटले जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार, अधिक महिन्यात काही शुभ योग तर काही प्रतिकूल योग जुळून येत आहेत. अधिक मासात लक्ष्मी नारायण नामक अत्यंत अद्भूत शुभ राजयोग जुळून येत आहे. अधिक महिन्यात लक्ष्मी नारायण योग जुळून येणे शुभ-फलदायी, पुण्यदायी मानले गेले आहे. तर दुसरीकडे खप्पर नामक प्रतिकूल योग जुळून येत आहे.

खप्पर योग फारसा अनुकूल मानला गेलेला नाही. आताच्या घडीला शनी कुंभ राशीत वक्री आहे. तर शुक्र ग्रहही वक्री होत आहे. याशिवाय पाच बुधवार, पाच गुरुवार येणे, वक्री शनीची नीच दृष्टी गुरु-राहुवर असणे, तसेच मंगळ-शुक्र आणि शनीची समसप्तक दृष्टी अशानेही खप्पर योगाच्या प्रतिकूल प्रभावात भर पडू शकते, असे सांगितले जात आहे.

अधिक मासात खप्पर योग तयार झाल्यामुळे काही राशीच्या लोकांनी पुढील ३० दिवस काळजी घेणे आवश्यक आहे. या राशीच्या लोकांना अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. कोणत्या राशीच्या लोकांना अधिक महिन्यातील खप्पर योगात सतर्क अन् सावधान राहावे, जाणून घ्या...

मिथुन राशीच्या व्यक्तींना खप्पर योग काहीसा मध्यम फलदायी राहू शकेल. कामाच्या ठिकाणी ताण वाढू शकतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अडचणींना सामोरे जावे लागू शकते. एखाद्या गैरसमजामुळे पार्टनरसोबत वाद होऊ शकतो, ज्यामुळे नात्यात दुरावा वाढू शकतो. शक्यतो मोठी गुंतवणूक करू नये, अन्यथा धनहानी सहन करावी लागू शकते. एखादे वाहन किंवा जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही योजना काही काळ पुढे ढकलणे चांगले ठरू शकेल.

कर्क राशीच्या व्यक्तींना खप्पर योग मिश्र फलदायी ठरू शकेल. या काळात खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात काम करणार्‍या लोकांसोबत एखाद्या गोष्टीवर तणाव वाढू शकतो. ज्यामुळे समस्यांना सामोरे जावे लागू शकेल. आक्रमक स्वभावावर नियंत्रण ठेवा. अन्यथा कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबातील सदस्यांशी वाद वाढू शकतात. मुलांच्या आरोग्याची काळजीही राहील. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर काही काळ थांबणे हिताचे ठरू शकेल.

कन्या राशीच्या व्यक्तींना खप्पर योग काहीसा संमिश्र ठरू शकेल. अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. त्यामुळे त्रास होऊ शकतो. पैशाचा योग्य वापर करणे फायदेशीर ठरेल. खर्च सतत वाढू शकतात. नोकरदारांचे सहकाऱ्यांशी किंवा अधिकाऱ्यांशी काही वाद होऊ शकतात. कामात लक्ष द्या आणि इकडच्या तिकडच्या गोष्टींपासून दूर राहा. या काळात जमीन आणि मालमत्तेशी संबंधित कोणत्याही वादाला सामोरे जावे लागू शकते.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना खप्पर योग काहीसा संमिश्र ठरू शकेल. कुटुंबाच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. कोणत्याही प्रकारच्या गुप्त गोष्टी मित्रांना सांगू नका. निर्णय क्षमता प्रभावित होऊ शकते. व्यवसायात कठीण स्पर्धेमुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. व्यावसायिक व्यवहारादरम्यान नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. कोणत्याही प्रकारचे सरकारी नियम मोडू नयेत, अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागू शकते.

मीन राशीच्या व्यक्तींना खप्पर योग संमिश्र ठरू शकेल. कामात जास्त लक्ष द्यावे लागेल. छोटी चूक अनेक समस्या निर्माण करू शकते. बचत करणे कठीण होईल. अनावश्यक खर्च वाढू शकतो. कर्ज घेण्याची परिस्थिती उद्भवू शकते. नोकरी व्यावसायिकांना कठोर परिश्रम करूनही अपेक्षित यश मिळेल असे नाही. नियोजन करून काम केले तर समस्यांना चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकता. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.