Vinayak Mete Accident: दोन्ही एअरबॅग उघडल्या, पण त्या विनायक मेटेंसाठी नव्हत्या; अपघातावेळी काय घडले असेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 09:48 AM2022-08-15T09:48:17+5:302022-08-15T09:58:08+5:30

Vinayak Mete Accident Airbag and Impact: पहाटे ४.४८ मिनिटांनी मेटे यांच्या कारने खालापूर टोलनाका पार केला, यानंतर काही मिनिटांतच मेटे यांच्या कारला अपघात झाला. पण जगातील सर्वात दणकट म्हणून प्रसिद्ध असलेली एसयुव्ही फोर्ड एंडोव्हर मेटेंना का वाचवू शकली नाही?

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटेंचा शनिवारी पहाटे भीषण अपघातात मृत्यू झाला. जगातील सर्वात दणकट म्हणून प्रसिद्ध असलेली एसयुव्ही फोर्ड एंडोव्हरमधून ते प्रवास करत होते. या कारमध्ये सहा सहा एअरबॅग असतात. तरी देखील विनायक मेटे वाचू शकले नाहीत. कारमधील पुढील दोन्ही एअरबॅग उघडल्या होत्या, पण त्या मेटेंसाठी नव्हत्याच. अपघाताचा धक्का बसला त्या सेकंदाच्या काही भागांत नेमके काय घडले असावे, मेटेंच्या डोक्याला कसा मार लागला असेल...

विनायक मेटे हे या एसयुव्हीमध्ये दुसऱ्या रो मधील सीटवर बसले होते. पुढे ड्रायव्हर आणि त्याच्या बाजुच्या सीटवर पोलीस अंगरक्षक बसला होता. पहाटे ४.४८ मिनिटांनी मेटे यांच्या कारने खालापूर टोलनाका पार केला, यानंतर काही मिनिटांतच मेटे यांच्या कारला अपघात झाला. चूक कोणाची याचा शोध पोलिसांच्या सात-आठ टीम घेत आहेत.

पोलिसांनी तर मेटेंच्या डोक्यावर असलेली एअरबॅगही उघडल्याचे म्हटले आहे. म्हणजे अपघात झाला त्याचवेळी आघात सोसताच सेन्सर अॅक्टिव्ह झाले होते. त्यांनी एअरबॅगपर्यंत आघाताचे संकेत सेकंदाच्या ०.०१ भागात पोहोचविले. एअरबॅगही उघडल्या. परंतू या एअरबॅगनी चालकाला आणि पोलिसाला डॅशबोर्डवर आदळण्यापासून वाचविले. मेटेंसाठी या एअरबॅगनी काम केले नाही. यामुळेच कदाचित मेटे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला असेल. तसेच मेटेंच्या गाडीचा मधला दरवाजा देखील अपघातग्रस्त आहे. यामुळे मेटे जिथे बसलेले तिथपर्यंत हा ट्रक घुसला होता.

फोर्ड एन्डोव्हर ही एसयुव्ही दणकट आणि दमदार इंजिन असलेली आहे. म्हणजे तिचा वेगही तसाच असणार. मेटे मागच्या सीटवर असल्याने तसेच ते झोपलेले होते, यामुळे ते बेसावध होते. जेव्हा वेगाने त्यांची कार समोरील ट्रकवर आदळली तेव्हा ते त्याच वेगाने पुढे फेकले गेले असतील. ट्रकची बॉडी बांधण्यासाठी लोखंड वापरले जाते. कंटेनर असेल तरी त्याचे लोखंड हे कठीण असेच असते. त्यावर मेटेंचे डोके आदळले असेल आणि जबर मार लागला असेल.

यामुळे दोन्ही गाड्यांचा आघात झाला तेव्हा मेटे डाव्या साईडवरील सीटवर पुढे फेकले गेले असतील, तेव्हाच ट्रक त्याबाजुने आत घुसल्याने त्यांचे डोके त्या ट्रक आणि एसयुव्हीच्या बॉडीवर आदळले असेल. ही धडक वेगाने असेल त्यामुळे मेटेंच्या डोक्याला जबर मार लागला. डॉक्टरांनी मेटेंच्या डोक्याला पुढून आणि पाठीमागून मार लागल्याचे स्पष्ट केले होते. तसेच मेटे यांचा अपघातस्थळीच मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली आहे.

मेटेंच्या आणि ट्रकच्या मध्ये डाव्या बाजुला पोलीस बसलेली सीट होती. अशावेळी सीटही दगडासारखी ठरते. सीटला कुशन असते. परंतू जेव्हा अपघात होतो तेव्हा सीट तिथेच उभी असते आणि वाहनाच्या वेगाने पुढे जात असलेला आतील प्रवासी त्यावर त्याच वेगाने आदळतो. अनेकदा अचानक ब्रेक मारल्यानंतर मागचा व्यक्ती पुढच्या सीटवर आदळतो. तेव्हा त्याला मुका मार लागतो. ज्यांना अॅटोमॅटीक कार चालविण्याची सवय नसते, ते जेव्हा ती चालवतात तेव्हा आतील पॅसेंजरला हा अनुभव आला असेल. तीस-चाळीसच्या स्पीडलाही अचानक ब्रेक लागला तर मागे बसलेल्या व्यक्तीला जोरदार मार लागतो.

आघात झाल्यानंतर पॅसेंजर समोरील डॅशबोर्डवर आदळू नयेत म्हणून एअरबॅग त्या पॅसेंजरच्या तोंडावर छातीवर फेकल्या जातात. हा वेग प्रचंड म्हणजे २० किमी प्रति तास एवढा असतो. तर अनेक एअरबॅग या 26 किमीच्या वेगाने उघडतात. आघातानंतरची ही प्रक्रिया 70 ते 150 मिलिसेकंदमध्ये पार पडते. एअरबॅग प्रवाशावर फेकली जाण्याचा वेग आणि त्या प्रवाशाचा डॅशबोर्डकडे फेकला जाण्याचा वेग या दोन्हीचे गणित घातले तर हा वेग प्रचंड असतो. यामुळे थोडक्यात प्रवाशाच्या चेहऱ्यावर आघात होतो. यामुळे मुका मार लागणे किंवा नाकाला मार बसण्याची शक्यता असते. यामुळे अनेकदा तुम्ही पाहिले असेल की एअरबॅगवर रक्ताचे थोडेबहुत डाग असतात. ही माहिती अपघाती वाहने दुरुस्त करणाऱ्या मेकॅनिक, गॅरेजकडून घेतलेली आहे.