Maruti Grand Vitara: प्रतिक्षा संपली; मारुतीने लॉन्च केली 'न्यू ग्रँड व्हिटारा', तब्बल 28kmpl चे मायलेज, पाहा फिचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 05:20 PM2022-07-20T17:20:16+5:302022-07-20T17:26:33+5:30

Maruti Grand Vitara: गेल्या अनेक दिवसांपासून लोक ज्या गाडीची वाट पाहत होते, ती 'मारुती सुझुकी ग्रँड व्हिटारा ग्लोबल' अखेर लॉन्च झाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून लोक ज्या गाडीची वाट पाहत होते, ती 'मारुती सुझुकी ग्रँड व्हिटारा ग्लोबल' अखेर लॉन्च झाली आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुतीचे हे फ्लॅगशिप मॉडेल आहे. या नवीन हायब्रीड एसयूव्हीने मारुतीच्या प्रीमियम हॅचबॅक एस-क्रॉसची जागा घेतली आहे. ग्राहकांना नेक्साच्या डीलरशिपवर ही नवीन ग्रँड व्हिटारा खरेदी करता येणार आहे.

कंपनीने 11,000 रुपयांच्या टोकन रकमेसह या गाडीची बुकिंग सुरू केली आहे. नवीन व्हिटारा हायब्रीड इंजिनसह लॉन्च करण्यात आली आहे. यामुळे गाडीचे मायलेज उत्तम झाले असून, गाडी एका लिटर पेट्रोलमध्ये तब्बल 28 किमीचे मायलेज देईल. कंपनीने ही नवीन एसयुव्ही 6 रंगांमध्ये लॉन्च केली आहे. आजचे तंत्रज्ञान लक्षात घेता कंपनीने यात अनेक फिचर्स दिले आहेत.

मारुती सुझुकी आणि टोयोटा या दोन्ही कंपन्यांनी एकत्रितपणे Highrider आणि Grand Vitara या गाड्या तयार केल्या आहेत. हायरायडरप्रमाणे, ग्रँड विटारामध्ये माइल्ड-हायब्रीड पॉवरट्रेन दिले आहे. हे 1462cc K15 इंजिन आहे, जे 6,000 RPM वर सुमारे 100 bhp पॉवर आणि 4400 RPM वर 135 Nm टॉर्क जनरेट करते. यात माइल्ड हायब्रीड सिस्टम असून, याला 5-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिकशी जोडले गेले आहे.

ग्रँड व्हिटारा इंटेलिजेंट इलेक्ट्रिक हायब्रीड पॉवरट्रेनदेखील टोयोटाकडून घेतलेले आहे. हे 1490 cc 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे, जे 5500 आरपीएमवर 91 बीएचपी आणि 3800-4800 आरपीएम स्टँडअलोनवर 122 एनएम देते. हे 79 बीएचपी आणि 141 एनएममध्ये सक्षम सिंक्रोनस एसी मोटरसोबत जोडले गेले आहे. या पॉवरट्रेनमध्ये फक्त ई-सीवीटी गिअरबॉक्स मिळतो. मारुती ग्रँड व्हिटारा हायब्रीड एसयूव्हीचे मायलेज 27.97 kmpl आहे.

मारुतीने अद्याप ग्रँड व्हिटाराची किंमत सांगितलेली नाही. परंतु, याची एक्स-शोरूम किंमत 9.50 लाख रुपयांपासून सुरू होते. या गाडीच्या लॉन्चिंगपूर्वीच CarPrice वेबसाइटने याची एक्स-शोरुम किंमत 9.50 लाख रुपये असल्याचे सांगितले होते. जर ही किंमत खरी असेल, तर ही गाडी क्रेटा आणि सेल्टॉसपेक्षाही स्वस्त असेल.

EV आणि ड्राइव्ह मोड: ग्रँड व्हिटारामध्ये EV मोड मिळेल. EV मोडमध्ये कार पूर्णपणे इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्याने चालेल. कारची बॅटरी, इलेक्ट्रिक मोटरला एनर्जी देते आणि इलेक्ट्रिक मोटर व्हील्सला पॉवर देतात. ही प्रोसेस सायलेंटली होते. याशिवाय, हायब्रीडमोडमध्ये कारचे इंजिन इलेक्ट्रिक जनरेटरप्रमाणे काम करेल आणि इलेक्ट्रिक मोटर कारच्या व्हीलला चालवेल.

टायर प्रेशर फिचर: ग्रँड व्हिटाराच्या कोणत्या टायरमध्ये किती हवा आहे, याची माहिती कारमध्ये लागलेल्या स्क्रीनवर दिसेल. या कारमध्ये कंपनीने टायर प्रेशर चेक करणारे फीचर दिले आहे. टायचरची हवा कमी झाल्यावर चालवणाऱ्याला स्क्रीनवर याची माहिती मिळेल. यामुळे कमी हवा किंवा पंक्चरची चिंता दूर होणार आहे.

360 डिग्री कॅमरा: मारुती आपल्या कार्सच्या नवीन मॉडेलमध्ये 360 डिग्री कॅमेरा फीचर देत आहे. ग्रँड व्हिटारामध्येही हे कॅमेरा फिचर देण्यात आले आहे. यामुळे ड्रायव्हरला कार चालवताना चांगली मदत होईल. यामुळे ड्रायव्हरला कमी जागेत गाडी पार्क करणे सोपे होईल. तसेच, ट्रॅफिकमध्येही याचा चांगला उपयोग होईल.