नवीन लुक अन् 10 वर्षांची वॉरंटी; Honda ने लॉन्च केले 'या' लोकप्रिय बाईकचे अपडेटेड व्हर्जन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 03:46 PM2023-08-18T15:46:50+5:302023-08-18T15:50:14+5:30

Honda ने आपल्या Livo बाईकचे नवीन व्हर्जन लॉन्च केले असून, यात अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

Honda Livo Bike: भारतातील प्रसिद्ध टू-व्हिलर मेकर Honda Motorcycle and Scooter India (HMSI) ने आज आपल्या लोकप्रिय Honda Livo बाईकचे नवीन व्हर्जन लॉन्च केले आहे. ही बाईक रिअल ड्रायव्हिंग एमिशन नॉर्म्स (RDE) अंतर्गत अपडेटेड इंजिनसह लॉन्च केली गेली आहे.

कंपनीने या बाईक दोन व्हेरियंटमध्ये आणले असून, ड्रम ब्रेक व्हेरियंटची किंमत 78,500 रुपये आणि डिस्क ब्रेक व्हेरियंटची किंमत 82,500 रुपये (एक्स-शोरूम) आहे. कंपनीने नवीन Honda Livo मध्ये 3 कलर पर्याय दिले आहेत. यात अॅथलेटिक ब्लू मेटॅलिक, मॅट क्रस्ट मेटॅलिक आणि ब्लॅक कलर मिळतो.

Honda Livo, 110 cc सेगमेंटमधील अतिशय लोकप्रिय बाईक आहे. या नवीन अपडेटेड मॉडेलबाबत कंपनीने दावा केला आहे की, पूर्वीपेक्षा नवीन बाईक चांगला परफॉर्मन्स देईल. या बाईकच्या लॉन्चिंगदरम्यान, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि सीईओ, त्सुत्सुमु ओटानी म्हणाले की, आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण आम्ही OBD2 मानकांशी सुसंगत अशी 2023 Honda Livo लॉन्च केली आहे. आम्हाला खात्री आहे की, नवीन Livo या सेगमेंटमध्ये सर्वाधिक परफॉर्मन्स देईल.

Honda ने या नवीन बाईकमध्ये 109 cc क्षमतेचे नवीन OBD2 कॉम्प्लायंट इंजिन वापरले आहे, जे 8.67bhp पॉवर आणि 9.30Nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनमध्ये फ्युएल इंजेक्शन आणि सायलेंट स्टार्ट (एसीजी) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे बाईक सुरू करताना कमीत कमी आवाज होतो. कंपनीचे म्हणणे आहे की, प्रोग्राम्ड फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञान बाईकची कार्यक्षमता आणि मायलेज सुधारण्यात मदत करते.

4-स्पीड ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेल्या या बाईकमध्ये 18-इंच अलॉय व्हील्स, समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस ड्युअल स्प्रिंग सस्पेन्शन मिळेल. दोन्ही बाजूंना ड्रम ब्रेक्स मिळतील, पण डिस्क ब्रेक बाईकचाही पर्याय मिळतो. याशिवाय, यात इंटिग्रेटेड इंजिन स्टार्ट/स्टॉप स्विच, डीसी हेडलॅम्प्स, कंबाइंड-ब्रेकिंग सिस्टम, ट्यूबलेस टायर्स आणि मागील सस्पेंशनसाठी पाच-स्टेप प्रीलोड अॅडजस्टॅबिलिटी मिळते.

बाईकचा लूक आणि डिझाईन बऱ्याच अंशी पूर्वीच्या मॉडेलप्रमाणे असला तरी कंपनीने या नवीन बाईकच्या फ्युएल टँक आणि हेडलॅम्प काऊलवर अपडेटेड ग्राफिक्स दिले आहेत. विशेष म्हणजे, Honda ने Livo वर 10 वर्षाची वॉरंटी दिली आहे. यात 3 वर्षांची स्टँडर्ड आणि 7 वर्षांची ऑप्शनल वॉरंटी सामील आहे. बाजारात या बाईकची स्पर्धा TVS Sport, Hero Splendor आणि Hero Passion Xtech या बाईकशी आहे.