Citroen C3 Review: सिट्रॉइन C3 रिव्ह्यू: सात लाखांत एसयुव्हीची मजा की सजा? नवा पर्याय वापरायचा की...

By हेमंत बावकर | Published: February 24, 2023 02:15 PM2023-02-24T14:15:01+5:302023-02-24T14:25:29+5:30

आपल्यासाठी नवी परंतू जगासाठी जुन्या कंपनीची भारतीय रस्त्यांवर एन्ट्री झाली. नवीनच कंपनी आहे, आपण पहिली घेतली तर हात तर पोळायचे नाहीत ना असे अनेक प्रश्न लोकांसमोर आहेत.

फोर्ड कंपनी भारताबाहेर गेली आणि त्याच काळात एक आपल्यासाठी नवी परंतू जगासाठी जुन्या कंपनीची भारतीय रस्त्यांवर एन्ट्री झाली. फ्रान्सची जुनी कंपनी सिट्रॉइनने पहिली प्रिमिअम एसयुव्ही सी५ भारतात आणली. परंतू ती खूपच महाग होती. भारतीय बाजारात आधीपासूनच पाय रोवलेल्या मारुती, टाटा, ह्युंदाई सारख्या कंपन्यांना टक्कर द्यायची असेल तर सात ते १० लाखांत एखादी कार हवी, अशी गरज कंपनीला वाटू लागली होती. यातच कंपनीने कमाल केली.

सिट्रॉइन C3 आणि सी ५ या कारमधील किंमतीचे अंतर एवढे होते, की सी३ हा सामान्यांसाठी ७ लाखांतला पर्याय म्हणून उपलब्ध झाला. आता ही सी३ कशी आहे? नवीनच कंपनी आहे, आपण पहिली घेतली तर हात तर पोळायचे नाहीत ना असे अनेक प्रश्न लोकांसमोर आहेत. ही कार आम्ही जवळपास ३५० किमी चालविली.

सिट्रॉइन सी३ ही कार ही सबकॉम्पॅक्ट एसयुव्हीचा फिल देणारी कार आहे. या रेंजमध्ये इतर कंपन्यांच्या देखील कार आहेत. परंतू या कारचा लूक एवढा जबरदस्त आहे की तुम्ही मुंबई-पुण्याच्या वाहतूक कोंडीतही लगेचच लोकांचे लक्ष वेधून घेता.

बिल्ड क्वालिटी आम्हाला चांगली वाटली. खड्ड्यांमध्ये बाहेरचा आवाज फार कमी आत येत होता. सस्पेंशनमध्ये ही कार खुपच उजवी ठरते. काहीसा बॉडीरोल जाणवत होता. परंतू, ही कार उंच असल्याने ते होणे अपेक्षित आहे. खड्ड्यांमधूनही ही कार मख्खनसारखी धावत होती. रस्त्याची कामे सुरु असलेल्या बोल्डरच्या भागातूनही ही कार वेग कमी न करता ५०-६० च्या स्पीडने चालवून पाहिली. एसयुव्हीचा फिल वाटला...

सर्वात महत्वाचे म्हणजे या कारचा पिकअप... पेट्रोल कार असली तरी या कारचा पिकअप खूप चांगला होता. डिझेल कारसारखा नाही परंतू कार पहिल्या गिअरमध्ये उठविताना कुठेही ताकदीसाठी धडपड करताना दिसली नाही. आम्ही घाट, डोंगर उतार, काहीशा वाहतूक कोंडीतही ही कार चालवून पाहिली. स्पीड ब्रेकरवरही गाडीने चांगला पिकअप दिला.

म्युझिक सिस्टिमची क्वालिटी थोडी कमी वाटली, परंतू नाखूश करणारी नव्हती. टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिमची रिस्पॉन्स फास्ट होता. ब्लूटूथवर डायरेक्ट मॅप, मोबाईल कनेक्ट करता येत होते. यासाठी केबलची गरज लागली नाही. या सेगमेंटमध्ये अन्य कारना केबलद्वारे जोडावे लागते. हे एक चांगले फिचर आहे. यामुळे सारखी सारखी केबल जोडण्याची कटकट होत नाही.

आता उन्हाळा चालू झाल्याने गाडीचा एसीही तपासता आला. उन्हातून कार चालविताना एक नंबरवर एसी केबिन बऱ्यापैकी कुल करत होता. उन्हात गाडी उभी ठेवली तरी कारची केबिन थंड करण्यासाठी दोन नंबर पर्यंतच एसी फॅन बऱ्यापैकी कुलिंग देत होता. एसीच्या नॉबचे युनिट थोडे जुने वाटते. ही एक बाब सोडली तर एसीवर देखील गाडीने पिकअपला दमविले नाही.

आतमध्ये स्टोरेज स्पेस पुरेशी किंवा गरजेपेक्षा जास्त देण्यात आली आहे. म्हणजे मोठ्या प्रवासासाठी उत्तम. पाण्याच्या बॉटल, मोबाईल किंवा अन्य वस्तू ठेवायच्या असतील तर दरवाजा, डॅशबोर्डकडे पुरेशी जागा देण्यात आलेली आहे. गिअर कुठेही अडखळत नाहीत. डिक्कीमध्ये स्टोरेज स्पेसही चांगली मोठी दिलेली आहे. फक्त लाईट दिलेली नाही. यामुळे अंधारात तुम्हाला मोबाईल फ्लॅश वापरावा लागणार आहे. मागची पूर्ण सीट फोल्ड करावी लागते.

अॅव्हरेजच्या बाबतीत बोलायचे झाले तर कारने सिटीमध्ये १२-१३ मायलेज दिले. परंतू हायवेवर किंवा गावखेड्यातील रस्त्यावर कारने बऱ्यापैकी 18-१९ चे अॅव्हरेज दिले. यामुळे जर संमिश्र मायलेज काढले तर 15 च्या आसपास येते.

कारची निगेटिव्ह बाजू म्हणजे ही कार बाहेरून दिसायला एकदम भारी असली तरी आतमध्ये काही बेसिक फिचर्स, जुन्या जमान्यातील नॉब, बटने दिलेली आहेत. फ्रान्सचा ब्रँड ७ लाखांत कार उतरवतोय म्हटल्यावर कॉस्ट कटिंग आलीच. स्पीडोमीटर हा बेसिक अॅनालॉग टाईप आहे. त्याचा पांढरा प्रकाश रात्रीच्या वेळी डोळ्यांना त्रासदायक वाटत होता.

कारचे आरसे हे आतून एका काटक नॉबवर अॅडजस्ट होणारे होते. मॅन्युअली ते अॅ़डजस्ट करावे लागतात. महत्वाचे म्हणजे तुम्ही मिररला हात लावला किवा गाडी पुसताना फडका जरी मारला तरी त्या काचा पुन्हा अॅडजस्ट कराव्या लागतात. मागच्या खिडकीच्या काचांची बटने ही गिअर कंसोलवर दिली आहेत. स्टिअरिंगवर मोजकी म्युझीक सिस्टीमशी संबंधीत बटने दिलेली आहेत.

कारची हेडलाईट रस्त्यावर चांगल्या प्रकारे प्रकाश फेकते. कुठेही कमतरता जाणवलेली नाही. मध्यरात्रीनंतरही फॉग लँप चालू करायची वेळ आली नाही. आतील लाईटही पुरेशी वाटली. परंतू मागे प्रकाश हवा असेल तर मोबाईल लाईटच चांगली. केबिन बऱ्यापैकी सायलंट होती. इंजिनचा आवाजही येत नव्हता एवढी.

एका मध्यवर्गीय फॅमिलीसाठी हा उत्तम पर्याय वाटला. मायलेजच्या बाबतीतही ती चांगली आहे. हायवे किंवा कमी ट्रॅफिक असेल तर खिशाला परवडणारी देखील आहे. काहीसे कॉस्ट कटिंगकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. एवढ्या कमी किंमतीत चांगला परफॉर्मन्स देणारी कार आहे. लाँग टूर असेल की वन डे ट्रिप, पाच जणांची फॅमिली असली तर याचा विचार करून ही कार बनविण्यात आली आहे.