पारवा गावात गेल्या चार ते पाच दिवसांपासून गॅस्ट्रोची लागण सुरु आहे. याबाबत आरोग्य केंद्रास माहितीही आहे. परंतु, या आजाराबाबत गंभीरता दाखविली जात नाही. परिणामी येथील रुग्ण परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल होत आहेत. याकडे वरिष्ठ विभागाने लक्ष देऊन ग्रामस्थांवर उपचार करावेत, अशी मागणी येथील ग्रामस्थांतून होत आहे. परभणी: तालुक्यातील पारवा येथे २0 ते २५ जणांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. येथील काही रुग्ण खाजगी व शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.
पारवा येथे मागील चार ते पाच दिवसांपासून उलटी, जुलाब होणार्‍या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. अनेक रुग्ण शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी परभणी येथे दाखल झाले आहेत. या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र आहे. आरोग्य विभागाच्या वतीने १0नोव्हेंबर रोजी ग्रामस्थांना भेटी देऊन उपाययोजना करण्यात येईल, असे सांगण्यात आले. दूषित पाणीपुरवठय़ामुळे गॅस्ट्रोची लागण झाली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले अशोक कन्हे, दौलत मुटकुळे, राजेश लोंढे, पद्ममीनबाई सोळंके, सुवर्णा सोळंके, अंगद मुटकुळे, शशिकला मुटकुळे, कोंडाबाई मुटकुळे यांच्यासह अनेक रुग्ण दाखल झाले आहेत. गत चार ते पाच दिवसांपासून गावामध्ये उलटी- जुलाब होत असताना आरोग्य विभागाला याबाबत माहिती मिळाली कशी नाही, याबाबतही ग्रामस्थ आरोग्य विभागाला जाब विचारत आहेत. (/प्रतिनिधी)