परभणी जिल्ह्यातील चार नगरपालिकांना स्वच्छतेसाठी मिळाले दीड कोटीचे प्रोत्साहनपर अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 05:51 PM2018-02-01T17:51:14+5:302018-02-01T17:52:18+5:30

नागरी भागामध्ये स्वच्छता अभियानाला गती मिळावी, या उद्देशाने  हगणदारीमुक्त झालेल्या नगरपालिकांना ३० टक्के प्रोत्साहन अनुदान वितरित करण्यात आले असून, जिल्ह्यातील चार नगरपालिकांना १ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे़ 

Four municipal councils of Parbhani district got cleanliness incentive for 1.5 crores | परभणी जिल्ह्यातील चार नगरपालिकांना स्वच्छतेसाठी मिळाले दीड कोटीचे प्रोत्साहनपर अनुदान

परभणी जिल्ह्यातील चार नगरपालिकांना स्वच्छतेसाठी मिळाले दीड कोटीचे प्रोत्साहनपर अनुदान

googlenewsNext

परभणी :  नागरी भागामध्ये स्वच्छता अभियानाला गती मिळावी, या उद्देशाने  हगणदारीमुक्त झालेल्या नगरपालिकांना ३० टक्के प्रोत्साहन अनुदान वितरित करण्यात आले असून, जिल्ह्यातील चार नगरपालिकांना १ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे़ 

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविले जाते़ नागरी भागासाठी असलेल्या या अभियानामध्ये महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींचा समावेश आहे़ मागील एक वर्षांपासून नागरी भागात हे अभियान राबविले जात असून, संपूर्ण परिसर हागणदारीमुक्त करण्यासाठी नगरपालिका कामाला लागल्या आहेत़ सार्वजनिक हागणदारीची स्थळे निष्काशीत करण्याबरोबरच वैयक्तीक शौचालय उभारणीचे काम यानिमित्ताने नागरी भागात पूर्ण करण्यात आली़ 

स्वच्छता अभियानाच्या या कामाला गती मिळावी, या उद्देशाने नगरविभाग विभागाच्या वतीने प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते़ प्रत्येक नगरपालिकेला हे प्रोत्साहनपर अनुदान जाहीर करण्यात आले होते़ स्वच्छता अभियानाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, यात केंद्र आणि राज्यस्तरीय समित्यांनी नगरपालिकांनी राबविलेल्या स्वच्छता अभियानाची पाहणीही केली आहे़ या अभियानाच्या अंमलबजावणीपासून आतापर्यंत हागणदारीमुक्त झालेल्या शहरांपैकी राज्यस्तरीय समितीमार्फत केलेल्या तपासणीत जी शहरे हागणदारीमुक्त झाल्याचे दिसून आले़ अशा शहरांना प्रोत्साहन अनुदानाच्या रकमेच्या ३० टक्के निधी पहिला हप्ता म्हणून वितरित करण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे़ 

राज्यभरात ६१ नगरपालिका यासाठी पात्र ठरल्या असून, परभणी जिल्ह्यातील चार नगरपालिका ३० टक्के निधीसाठी पात्र ठरल्या आहेत़ शासनाने २९ जानेवारी रोजी काढलेल्या अध्यादेशानुसार जिल्ह्यातील चारही नगरपालिकांना तब्बल १ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचे आदेश निघाले आहेत़ या आदेशानुसार परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नगरपालिकेला दीड कोटी रुपये प्रोत्साहनपर अनुदान देय असून, त्यापैकी ४५ लाख रुपयांचा निधी पहिला हप्ता म्हणून मंजूर झाला आहे़ तसेच जिंतूर नगरपालिकेलाही दीड कोटी रुपयांपैकी ४५ लाख रुपयांचा पहिला हप्ता मंजूर झाला़ तर पूर्णा नगरपालिका आणि पालम नगरपंचायतींना प्रत्येकी १ कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मंजूर आहे़ त्याच्या ३० टक्के ३० लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे़ 

जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकांमध्ये स्वच्छता अभियान राबविले जात आहे़ या अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने चारही नगरपालिका हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर केले होते़ त्यामुळे या पालिकांना ३० टक्के अनुदानाचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे़ तर उर्वरित नगरपालिकांमध्ये हे अभियान सध्या गतीने राबविले जात आहे़ या नगरपालिकांची केंद्र व राज्यस्तरीय  पथकाडून लवकरच तपासणी होणार असल्याची माहिती मिळाली़

वैयक्तिक शौचालय : ७१ टक्के बांधकाम
स्वच्छ महाराष्ट्र राज्य अभियानांतर्गत सात नगरपालिका आणि एका नगरपंचायतीमध्ये २० हजार ४२१ वैयक्तिक शौचालय उभारणीचे उद्दिष्ट होते़ २९ जानेवारीपर्यंत १४ हजार ५३७ शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून, आणखी ५ हजार ७७१ शौचालयांचे बांधकाम होणे बाकी आहे़ जिल्ह्यातील नागरी भागात वैयक्तिक शौचालयाचे ७१.७४ टक्के उद्दीष्ट पूर्ण झाले आहे. वैयक्तिक शौचालयाच्या कामगिरीत जिंतूर नगरपालिका आघाडीवर असून, ८६.४३ टक्के काम या शहरात झाले आहे. त्या खालोखाल सोनपेठ ८५ टक्के, पाथरी ८१ टक्के, पालम ७६ टक्के, मानवत ६७.४१ टक्के, गंगाखेड ६३.१५ टक्के आणि पूर्णा शहरात ५८ टक्के  काम पूर्ण झाले आहे.

सर्व शहरे झाली हागणदारीमुक्त
पूर्णा येथे सार्वजनिक हागणदारीची ११ स्थळे होती. तर गंगाखेड शहरात १३, मानवत ६, सेलू ५, सोनपेठ ८, पाथरी ६, जिंतूर ५ आणि पालम शहरात ६ अशी जिल्ह्याच्या नागरी भागात हागणदारीची ६० सार्वजनिक स्थळे होती. या अभियानात ही सर्वच्या सर्व स्थळ निष्काशित झाल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाने दिली.

फोटोही अपलोड
जिल्ह्यातील पूर्ण झालेल्या १४ हजार ५३७ शौचालयांपैकी १३ हजार ९०८ शौचालयांचे फोटो पोर्टलवर अपलोड झाले आहेत.
 

Web Title: Four municipal councils of Parbhani district got cleanliness incentive for 1.5 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.