परभणी जिल्ह्यात दोन कोटींतून होणार पाणीटंचाई निवारणाची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 03:33 PM2018-05-28T15:33:47+5:302018-05-28T15:33:47+5:30

जिल्ह्यात यावर्षी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागामध्ये सुमारे २ कोटी रुपयांचे विविध कामे सुरू केली आहेत़

Construction of water shortage works will be done in Parbhani district from 2 crores | परभणी जिल्ह्यात दोन कोटींतून होणार पाणीटंचाई निवारणाची कामे

परभणी जिल्ह्यात दोन कोटींतून होणार पाणीटंचाई निवारणाची कामे

googlenewsNext
ठळक मुद्देपाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने २९ कोटी ४३ लाख रुपये खर्चाच्या कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे़जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागामध्ये सुमारे २ कोटी रुपयांचे विविध कामे सुरू केली आहेत़

परभणी : जिल्ह्यात यावर्षी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागामध्ये सुमारे २ कोटी रुपयांचे विविध कामे सुरू केली आहेत़ या कामांमधून नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करीत आहे़ 

मागील वर्षीच्या उन्हाळ्याच्या तुलनेत यावर्षी पाणीटंचाईची समस्या तीव्र नसली तरी ग्रामीण भागात अनेक गावांना टंचाई जाणवू लागली आहे़ पाणीटंचाईचे संभाव्य संकट लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आॅक्टोबर महिन्यातच पुढील सहा महिन्यांच्या पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा तयार केला होता़ तब्बल २९ कोटी ४३ लाख ६४ हजार रुपयांचा हा आराखडा तयार करून टंचाई निर्माण झालेल्या गावांमध्ये या आराखड्यानुसार उपाययोजना करण्याचे निश्चित केले होते़ आॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च, एप्रिल ते जून या प्रत्येक तीन महिन्यांच्या टप्प्यांमध्ये कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यात आली़ सध्या एप्रिल ते जून या तीन महिन्यांत करावयाच्या कामांचा आढावा घेतला जात आहे़ 

जिल्ह्यात पाणीटंचाईने ग्रासलेल्या गावांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुमारे २ कोटी रुपयांच्या कामांना सुरुवात केली आहे़ यात टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा, विहीर अधिग्रहण, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरती पुरक नळ योजना आणि नवीन विहीर, बोअर घेण्याची कामे केली जात आहेत़ जिल्हाभरात विंधन विहिरींच्या दुरुस्तीवर ५१ लाख ५१ हजारांचा खर्च केला जात असून, नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीवर ६६ लाख ८ हजार रुपये खर्च केला जात आहे़ त्याचप्रमाणे १६ लाख ९९ हजार रुपयांच्या खर्चातून तात्पुरती पूरक नळ योजना घेतली जात आहे़ ग्रामीण भागामध्ये ही कामे सुरू झाली आहेत़ मे महिना जिल्ह्यासाठी टंचाईचाच ठरत आहे़ या महिन्यात टंचाईग्रस्त गावांची संख्याही वाढत चालली आहे़ अजूनही उन्हाची तीव्रता कमी झाली नसल्याने पाणी पातळी खालावत असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे़ 

१२८ विंधन विहिरींना मंजुरी
परभणी जिल्ह्यात या उन्हाळ्यात अनेक गावांमध्ये पाणी पातळी खोल गेली आहे़ त्यामुळे संबंधित गावांत पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने नवीन विंधन विहीर खोदकामांसाठी मंजुरी दिली आहे़ आतापर्यंत १२८ विंधन विहिरींच्या खोदकामांना मंजुरी देण्यात आली असून, या विहिरी घेतल्यानंतर त्या त्या गावांमधील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे़ सध्या विंधन विहीर घेण्याची कामे सुरू आहेत.

विंधन विहीर दुरुस्तीची कामे सुरू

जिल्ह्यात २२४ ठिकाणी विंधन विहिरींची दुरुस्ती केली जात आहे़ त्यात पूर्णा आणि गंगाखेड येथे प्रत्येकी ५१ ठिकाणी विंधन विहिरी दुरुस्त करण्यास मंजुरी देण्यात आली असून, त्यावर पूर्णा तालुक्यात १० लाख ३४ हजार तर गंगाखेड तालुक्यात १० लाख १४ हजारांचा खर्च होत आहे़ सेलू व जिंतूर तालुक्यामध्ये प्रत्येकी ३८ गावांमध्ये विंधन विहिरींची दुरुस्ती होत असून, सेलू तालुक्यात १२ लाख ३२ हजार तर जिंतूर तालुक्यात ९ लाख ४५ हजारांच्या कामांना प्रशासनाने मंजुरी दिली आहे़ मानवत तालुक्यात १०, पाथरी ६, सोनपेठ ९ आणि परभणी तालुक्यात एका ठिकाणी विंधन विहिरीची दुरुस्ती केली जात आहे़ 

जिंतूर तालुक्यात सर्वाधिक कामे
पाणीटंचाईच्या झळा संपूर्ण जिल्ह्यात बसत असल्या तरी जिंतूर, गंगाखेड, पालम या तालुक्यांमध्ये  तीव्रता अधिक आहे़ जिल्हा प्रशासनाने जिंतूर तालुक्यात एकूण ९० कामे सुरू केली असून, ४८ लाख ५० हजार रुपये खर्च करून टंचाईवर मात केली जात आहे़ गंगाखेड तालुक्यामध्ये टंचाई निवारणाची १०३ कामे सुरू असून, त्यावर २६ लाख २५ हजार रुपये खर्च होत आहेत़ तर पूर्णा तालुक्यात १९ लाख २० हजार रुपये खर्चाची ७८ कामे, सेलू तालुक्यात १८ लाख ९४ हजार रुपये खर्चातून ४४ कामे सुरू आहेत़ पालम तालुक्यात १३ लाख ४ हजार रुपये खर्च करून ५१ कामे सुरू आहेत़ परभणी तालुक्यात ३ लाख ४५ हजार, सोनपेठ तालुक्यात २ लाख ५२ हजार, पाथरी तालुक्यात ८ लाख ७४ हजार आणि मानवत तालुक्यात १ लाख ९८ हजारांची कामे सुरू आहेत़ 

२९ कोटी ४३ लाखांचा आराखडा
पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने २९ कोटी ४३ लाख रुपये खर्चाच्या कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे़ त्यात ग्रामीण भागात ५१४ कामे करण्याचे नियोजन करण्यात आले होते़ जिंतूर तालुक्यात सर्वाधिक ९ कोटी २४ लाख २० हजार रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे़ पालम तालुक्यात ४ कोटी १४ लाख, पूर्णा तालुक्यात ५ कोटी १९ लाख तर पाथरी तालुक्यात २ कोटी १२ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार केला होता़ या आराखड्यानुसार कामे घेतली जात आहेत़ 

Web Title: Construction of water shortage works will be done in Parbhani district from 2 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.