महिंद्रा, शिवशक्ती "मुंबई महापौर" चषक कबड्डी स्पर्धेचे विजेते

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 08:27 PM2019-03-06T20:27:04+5:302019-03-06T20:28:27+5:30

अनंत पाटील, सोनाली शिंगटे स्पर्धेत सर्वोत्तम

Mahindra, Shivshakti winner of "Mumbai Mayor" Kabaddi Cup | महिंद्रा, शिवशक्ती "मुंबई महापौर" चषक कबड्डी स्पर्धेचे विजेते

महिंद्रा, शिवशक्ती "मुंबई महापौर" चषक कबड्डी स्पर्धेचे विजेते

googlenewsNext

मुंबई : मुंबई शहर कबड्डी असो. व मुंबई महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने घेण्यात आलेल्या "मुंबई महापौर चषक" कबड्डी स्पर्धेच्या पुरुषांत महिंद्राने अखेर विजेतेपद राखले, तर महिलांत शिवशक्ती महिला संघाने विजेतेपद मिळविले. महिंद्राचा अनंत पाटील पुरुषांत, तर शिवशक्तीची आंतरराष्ट्रीय खेळाडू सोनाली शिंगटे महिलांत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. पण महिंद्राच्या या विजयाचा तारणहार ठरला तो ऋतुराज कोरवी.

ना म जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे झालेल्या पुरुषांच्या श्वास रोखून धरणाऱ्या अंतिम सामन्यात महिंद्राने मध्य रेल्वेचा प्रतिकार ३८-३२असा मोडून काढला. महिंद्राच्या अनंत पाटीलने बोनस, तर ओमकार जाधवने गुण घेत झोकात सुरुवात केली.त्यानंतर रेल्वेच्या अत्याळकरने चढाईत गडी टिपत संघाचे खाते खोलले. रेल्वेने चढाईत हळूहळू गुण घेत व धाडशी पकडी करीत महिंद्रावर लोण देत आणला. महिंद्राचा कोरवी मैदानात एकटाच शिल्लक राहिला.त्याने आपल्या चढाईत बोनस व ४गडी टिपत होणारा लोण वाचविलाच नाही,तर १०व्या मिनिटाला रेल्वेवर लोण देत १२-०७अशी आघाडीही घेतली.पुन्हा जोरदार खेळ करीत २मिनिटाच्या अंतराने म्हणजे १२व्या मिनिटाला दुसरा लोण देत महिंद्राने आपली आघाडी २१-०७अशी वाढविली. मध्यांतराला महिंद्राकडे २५-१२अशी आघाडी होती. मध्यांतरानंतर रेल्वेने आपल्या खेळाची गती वाढवीत १३व्या मिनिटाला लोण देत ही आघाडी २३-३३अशी कमी केली.पुन्हा जोरदार आक्रमण करीत शेवटच्या काही मिनिटात ती ३०-३४ अशी ४गुणांपर्यंत खाली आणली. शेवटच्या चढाईला सुरुवात होण्यापूर्वी महिंद्राला एक विशेष गुण मिळाल्यामुळे ही आघाडी ३गुणांची शिल्लक राहिली. या वेळी देखील महिंद्राचा एकच खेळाडू मैदानात होता. तो म्हणजे कोरवीच. त्याची पकड झाली तर महिंद्रावर लोण होऊन सामना समान गुणांवर संपतोय व पुन्हा ५-५चढायांचा डाव खेळावा लागणार. पुन्हा एकदा कोरवी महिंद्राच्या मदतीला धावून आला.त्याने रेल्वेचे ३गडी टिपत महिंद्राला महापौर चषक मिळवून दिला.

महिंद्राच्या अनंत पाटीलने २६ चढायात ४बोनस आणि ६गडी बाद करीत १०गुणांची कमाई केली.पण ७वेळा त्याची पकड झाली. ऋतुराज कोरवीने अवघ्या ६चढायात १बोनस व गडी बाद करीत ९गुण वसूल केले. त्याच बरोबर त्याने ४पकडी करीत या विजयात महत्वाची भूमिका बजावली. शेखर तटकरेने ३यशस्वी पकडी करीत त्याला छान साथ दिली. रेल्वेकडून विनोद अत्याळकरने २१चढाया करीत ३ बोनस व ११गडी बाद करीत १४गुण मिळविले.पण ५वेळा तो पकडला गेला.चेतन गावकरने ५चढायात ४गुण मिळवीले. सूरज बनसोडेने ४, तर श्री भारताने ३पकडी यशस्वी केल्या. या अगोदर झालेल्या उपांत्य सामन्यात महिंद्राने देना बँकेवर ४४-३७अशी, तर मध्य रेल्वेने मुंबई बंदरवर २७-१७अशी मात करीत अंतिम फेरी गाठली होती. या स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईचा खेळाडू ठरला तो देना बँकेचा नितीन देशमुख, पकडीचा खेळाडू ठरला तो मध्य रेल्वेचा जेष्ठ खेळाडू परेश चव्हाण.

महिलांचा अंतिम सामन्यात शिवशक्ती महिला संघाने ३२-१७असे पराभूत करीत जेतेपद पटकावले. पहिल्याच चढाईत पौर्णिमा जेधेने स्नेहल शिंदेंची पकड करीत राजमाताला इशारा दिला.पण पण पहिल्या डावात एकमेकांची ताकद अजमावण्यातच गेला. मध्यांतराला दोन्ही संघ १०-१०अशा बरोबरीत होते. मध्यांतरानंतर मात्र शिवशक्तीने टॉप गियर टाकत ६व्या मिनिटाला पहिला लोण देत १९-१२अशी आघाडी घेतली.पुन्हा एक लोण देत आपली आघाडी २८-१६अशी भक्कम केली.शेवटी ३२-१७असा शिवशक्तीने विजयावर शिक्कामोर्तब केले. शिवशक्तीच्या या विजयात सोनाली शिंगटेने १६चढाया करीत २बोनस व ७गडी बाद करीत ९गुण मिळविले. तिला रेखा सावंत व पौर्णिमा जेधेने ६-६ यशस्वी पकडी करीत छान साथ दिली. अपेक्षा टाकळे मात्र आज तशी अपयशी ठरली. राजमाता जिजाऊ कडून सर्वच चढाईचे खेळाडू अपयशी ठरले. स्नेहल शिंदेला आपल्या ५चढईत एकही गुण घेता आला नाही.३वेळा तिची पकड झाली. सायली केरीपाळेने १६चढायात अवघे २गुण मिळविले.५वेळा तिची पकड झाली. नेहा घाडगेने ११चढायात १बोनस व २गुण मिळविले.३वेळा तिची पकड झाली. 

राजमाता जिजाऊंच्या सायली केरीपाळे व अंकिता जगताप यांनाच स्पर्धेतील अनुक्रमे चढाई व पकडीचे उत्कृष्ट खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. या अगोदर झालेल्या उपांत्य सामन्यात शिवशक्तीने महिला संघाने सुवर्णयुग स्पोर्ट्सचा ३२-१७असा, तर राजमाता जिजाउ स्पोर्ट्सने महात्मा गांधी स्पोर्ट्सचा ३९-३१असा पाडाव करीत अंतिम फेरीत धडक दिली होती.

Web Title: Mahindra, Shivshakti winner of "Mumbai Mayor" Kabaddi Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.