दोघांना चिरडणाऱ्या भाजप नेत्याच्या मुलाने केली मृतदेहाची अवहेलना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 09:04 AM2024-04-10T09:04:51+5:302024-04-10T09:05:15+5:30

आरोपी जय घरत फरार; पोलिसांच्या तपासावरच नागरिकांना संशय

The son of the BJP leader who crushed both of them ignored the dead body | दोघांना चिरडणाऱ्या भाजप नेत्याच्या मुलाने केली मृतदेहाची अवहेलना

दोघांना चिरडणाऱ्या भाजप नेत्याच्या मुलाने केली मृतदेहाची अवहेलना

लोकमत न्यूज नेटवर्क
उरण : पती-पत्नीला गाडीखाली चिरडून त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीला पोरके करणाऱ्या भाजप आमदार महेश बालदी यांचे निकटवर्तीय भाजप नेते चंद्रहास घरत यांचा फरार मुलगा जय घरत अजूनही उरण पोलिसांच्या हाती लागलेला नाही. विशेष म्हणजे जय घरत याने अपघातानंतर उन्मादाने घटनास्थळावर उपस्थित पोलिसाला शिविगाळ करत मृतदेहाची अवहेलना करत पळ काढला, असे पोलिसांच्या एफआयआरमध्ये नोंदविण्यात आले आहे. या प्रकाराने उरण परिसरात संताप व्यक्त होत असून पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

शनिवारी भरधाव क्रेटा कारचा चालक आरोपी जय घरत याने स्कुटीला दिलेल्या जोरदार धडकेत पवित्र बराल (४०), रश्मिता बराल (३४) या दाम्पत्याचा मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी झालेली त्यांची तीन वर्षीय मुलगी परी अपोलो रुग्णालयात उपचार घेत आहे. उरण रेल्वे स्थानकासमोरील रस्त्यावरच झालेल्या भीषण अपघाताचा मोठा आवाज ऐकून रेल्वे पोलिस कर्मचारी अतुल चौहान हे प्रवेशद्वारावर धावून आले होते. मात्र, नियंत्रण सुटलेल्या जयने जखमींना उपचारासाठी दाखल करण्याऐवजी रेल्वे पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण, अश्लील शिवीगाळ केली. जमलेल्या जमावाशी हुज्जत घालून अपघाताची पोलिसात वर्दी न देताच घटनास्थळावरून पोबारा केला.

आरोपीला शोधून काढण्यासाठी उरण पोलिसांनी दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार केले आहे. मात्र तीन-चार दिवसांच्या शोधकार्यानंतरही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
- अमोल खाडे, तपास अधिकारी
आरोपीचा घटनास्थळी उन्माद

अपघातानंतर घटनास्थळी आलेले रेल्वे पोलिस कर्मचारी अतुल चौहान यांच्याशी जय घरत याने हुज्जत घातली. चौहान यांच्या गालावर चापट मारली. त्यानंतर शिविगाळ करून तो घटनास्थळावरून पळून गेला.

व्हिडीओ व्हायरल
उरण स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच नव्हे तर उरण-खारकोपर दरम्यान नव्याने उभारलेल्या कोणत्याही स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले नाहीत. त्यामुळे या अपघाताच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नाहीत. मात्र, अपघातानंतरच्या घटनेचे एक-दोन मोबाइल व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओत वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीतच आरोपी जय घरत एका ओळखीच्या दुचाकीवर बसून घटनास्थळावरूनच पसार झाला असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: The son of the BJP leader who crushed both of them ignored the dead body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.