Sensex shutters, dropped 800 points, hiked by 138 points | सेन्सेक्सला हादरे, ८०० अंक उतरला, १३८ अंक चढला

मुंबई : गुजरात निवडणुकीचे सुरुवातीचे निकाल एक्झिट पोलविरुद्ध जात असल्याने, सोमवारी दोन तास शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता होती. त्यानंतर बाजार सावरला. या दरम्यान सेन्सेक्सने एकाच दिवसांत तब्बल १२०० अंकांचा चढ-उतार अनुभवला. गुजरात निकालात सुरुवातीला काँग्रेस-भाजपा यांच्यात काट्याची टक्कर दिसताच, शेअर बाजाराचा निर्देशांक ८१६ अंकांनी गडगडला. दोन तासांनी मात्र, कल पूर्णपणे भाजपाच्या बाजूने दिसले. सकाळी ३३,३६४ वर उघडून ३२,५९५ पर्यंत खाली घसरून सेन्सेक्स ३३,६०१ अंकांवर बंद झाला. या दरम्यान तो ३३,८०१ पर्यंत वर गेला होता. राष्टÑीय शेअर बाजाराचा १०,१२९ पर्यंत खाली गेलेला निफ्टी निर्देशांकही १०,४४१ पर्यंत वधारून १०,३८९ वर बंद झाला.
बाजार विश्लेषक म्हणतात...
केंद्र सरकारने उद्योग विश्वासाठी विशिष्ट धोरणे हाती घेतली आहेत. सत्ता परिवर्तन होणे या धोरणांतील अडथळा ठरले असते. त्या भीतीनेच सुरुवातीला बाजारात विक्री दिसून आली. मात्र, सत्ताधारी पक्षाचा विजय होताना दिसताच पुन्हा खरेदीचा जोर वाढला.
आर्थिक सुधारणा पुढे नेण्यासाठी जेमतेम दीड वर्षांचा कालावधी असल्याचा इशारा या निकालांनी दिला आहे, असे मत अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ अरुण ठुकराल यांनी व्यक्त केले.
रुपयातही चढ-उतार
सुरुवातीचे निकाल एक्झिट पोलच्या विरुद्ध जात असल्याच्या भीतीने रुपयादेखील डॉलरसमोर चढ-उतार होताना दिसला. भाजपा मार खात असल्याचा कल आल्याने रुपया ६८ पैशांनी घसरला होता.


Web Title:  Sensex shutters, dropped 800 points, hiked by 138 points
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.