देवभूमीत काँग्रेसने तयार केले पाच राक्षस; हिमाचल प्रदेशातील सभेत मोदींचे टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 07:25 AM2017-11-03T07:25:34+5:302017-11-03T07:25:45+5:30

काँग्रेसने हिमाचल प्रदेशात पाच राक्षसांना वाढवले. खाण माफिया, जंगल माफिया, ड्रग माफिया, टेंडर माफिया आणि ट्रान्सफर (बदली) माफिया हे ते पाच राक्षस आहेत. देवभूमी असलेल्या हिमाचलमधील जनता या राक्षसांना संपवेल, अशी मला खात्री आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले.

Five monsters made by Congress; Modi's criticism in Himachal Pradesh assembly | देवभूमीत काँग्रेसने तयार केले पाच राक्षस; हिमाचल प्रदेशातील सभेत मोदींचे टीकास्त्र

देवभूमीत काँग्रेसने तयार केले पाच राक्षस; हिमाचल प्रदेशातील सभेत मोदींचे टीकास्त्र

कांगडा (हिमाचल प्रदेश) : काँग्रेसने हिमाचल प्रदेशात पाच राक्षसांना वाढवले. खाण माफिया, जंगल माफिया, ड्रग माफिया, टेंडर माफिया आणि ट्रान्सफर (बदली) माफिया हे ते पाच राक्षस आहेत. देवभूमी असलेल्या हिमाचलमधील जनता या राक्षसांना संपवेल, अशी मला खात्री आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले.
कांगडा येथील निवडणूक प्रचार सभेत मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आणि ९ नोव्हेंबर रोजी भाजपाला मतदान करून या राक्षसांना भस्मसात करा, असे आवाहन केले. काँग्रेस पक्ष भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची भाषा करतो, मात्र त्यांचे मुख्यमंत्री भ्रष्टाचाराच्या प्रकरणाला तोंड देत आहेत. राज्यातील सत्ताधारी पक्ष ‘लाफ्टर क्लब’ झाला आहे, अशा शब्दांत मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. भ्रष्टाचारात बुडालेले राज्याचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह हेच भ्रष्टाचारासंदर्भात झीरो टॉलरन्सची भाषा करीत असल्याचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, त्यांची ही भाषा हिमाचल प्रदेशातील जनता कदापि सहन करणार नाही. या वेळी काँग्रेसला ठरवून पराभूत करण्याची वेळ आली आहे. (वृत्तसंस्था)

ही गांधींची काँग्रेस नव्हे!
निवडणुकीत हरवून काँग्रेसला शिक्षा द्यायला हवी. काँग्रेस महात्मा गांधीजींचा पक्ष राहिला नाही. हा पक्ष आता भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचे राजकारण करणारा पक्ष झाला आहे, असे सांगून ते म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री सध्या जामिनावर आहेत. त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत.
तरीही भ्रष्टाचार संपविण्याची भाषा ते करत आहेत. वीरभद्र सिंह हे प्राप्तिकर रिटर्न, बेहिशेबी संपत्ती आणि मनी लाँडरिंग यासारख्या प्रकरणाला तोंड देत आहेत. याच मुद्द्यावरून मोदी यांनी त्यांच्यावर टीका केली.

काँग्रेसला निरोप द्या
भ्रष्टाचार हीच काँग्रेसची हिमाचल प्रदेशमधील ओळख आहे. या भ्रष्टाचाराला निरोप देण्यासाठी भारतीय जनता पार्टीला निवडून देणे गरजेचे आहे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. काँग्रेस हा केवळ हिमाचल प्रदेशसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी हास्यास्पद पक्ष बनला आहे. सत्ताधारी काँग्रेसविषयी राज्यातील जनतेत नाराजी आहे. त्यामुळे जनता भाजपालाच निवडून देईल, याची मला खात्री होती आणि आहे. त्यामुळे मी हिमाचल प्रदेशात सभांसाठी येणारच नव्हतो, असेही त्यांनी बोलून दाखवले.

आणखी पाच सभा
पंतप्रधान मोदी यांनी राज्यात आपल्या सभांची गरज नाही, असे म्हटले असले तरी ते ४ व ५ नोव्हेंबर रोजी पुन्हा हिमाचल प्रदेशात येणार आहेत. त्या वेळी ते सुरेंद्रनगर, राईत, पालमपूर, तसेच कुल्लू व उना येथे जाहीर सभा घेणार आहेत.

Web Title: Five monsters made by Congress; Modi's criticism in Himachal Pradesh assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.