बाळासाहेबांच्या पक्षप्रवेशाचा बार आपटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 11:06 PM2020-11-19T23:06:41+5:302020-11-19T23:08:39+5:30

नाशिक : दिवाळी संपताच राजकीय फटाक्यांचे बार उडणे अपेक्षित होतेच. त्यानुसार त्याला सुरुवातदेखील झाली आहे. भाजपकडून राष्ट्रवादी आणि नंतर शिवसेनेत दाखल झालेल्या माजी आमदार बाळासाहेब सानप हे पुन्हा स्वगृही परतणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाचा बार कसा वाजणार? उडणार की आपटणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. सानप यांना पक्षात घेण्याविषयी मतभेद असल्याने आजतरी त्यांना स्वगृही परतणे सोपे नाही.

Will Balasaheb's party entry be hit? | बाळासाहेबांच्या पक्षप्रवेशाचा बार आपटणार?

बाळासाहेबांच्या पक्षप्रवेशाचा बार आपटणार?

Next
ठळक मुद्देशिवसेनेत घुसमटसमर्थनाबरोबरच विरोधही मोठा

संजय पाठक, नाशिक: दिवाळी संपताच राजकीय फटाक्यांचे बार उडणे अपेक्षित होतेच. त्यानुसार त्याला सुरुवातदेखील झाली आहे. भाजपकडून राष्ट्रवादी आणि नंतर शिवसेनेत दाखल झालेल्या माजी आमदार बाळासाहेब सानप हे पुन्हा स्वगृही परतणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाचा बार कसा वाजणार? उडणार की आपटणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. सानप यांना पक्षात घेण्याविषयी मतभेद असल्याने आजतरी त्यांना स्वगृही परतणे सोपे नाही.

सानप हे खरे तर मूळ काँग्रेस पक्षाचे ! पण भाजपात त्यांचे नशीब फळफळले आणि थेट महापौर झाले. त्यानंतर पक्षाला अधिक ‘अच्छे दिन’ आल्यानंतर थेट आमदार झाले. गेल्या पंचवार्षिक कारकिर्दीत तर मंत्रिपदाच्या स्पर्धेत कायम राहिले. अर्थातच, ते तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अत्यंत निकटवर्तीय असल्याने त्यांच्या शब्दाला इतके वजन वाढले की, संघटनात्मक शिस्तीमध्येदेखील संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी अनेकदा तडजोडी करून त्यांना सोयीची वाटतील असे निर्णय घेतले. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शहराध्यक्ष म्हणून उमेदवारी वाटप पूर्णत: त्यांच्या हाती होते. त्यानंतर महापालिकाच पूर्णत: त्यांच्या अधिपत्याखाली होती. मात्र, अशी सर्व अनुकूल स्थिती असतानाही त्यांच्याविषयी पक्षात रोष वाढत गेला आणि त्यांनी नंतर तर थेट तत्कालीन पालकमंत्री आणि तत्कालीन भाजप सरकारचे संकट मोचक गिरीश महाजन यांच्याशी वैमनस्य पत्करून संकट ओढवून घेतले. त्याची परिणीती त्यांची उमेदवारी कापण्यात झाली आणि त्यामुळेच बाळासाहेब सानप यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी करावी लागली. त्यातही अपयश आल्यानंतर त्यावेळी शिवसेनेने त्यांना चुचकारले आणि थेट शिवसेनेत ते दाखल झाले.

खरे तर सानप यांना उमेदवारी नाकारलेल्या समाजाचे प्रतिनिधित्व म्हणून शिवसेना खूप काही देईल. राज्यात भाजप सत्तेवर न आल्याने आता शिवसेना त्यांचा उपयोग नाशिकमध्ये भाजप डॅमेज करण्यासाठीच करेल त्यासाठी त्यांना जिल्हाप्रमुखपद किंवा विधान परिषदेवर संधी मिळेल अशा अटकळी होत्या. त्यातही सानप यांचा जीव आमदारकीत होता, असे सांगितले जाते. परंतु शिवसेनेने तसे काही केले नाही. भाजपा संस्कृतीशी नाळ जुळलेल्या सानप यांना येथे मात्र तसे काही न करता आल्याने त्यांची तेथेही घुसमट सुरू झाली, त्यातून आता स्वगृही परतण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून ते फिल्डिंग लावत असले तरी या साऱ्या गाेष्टी सोप्या नाहीत. पक्षात असतानाही सानप यांना ज्या पद्धतीने कामकाज केले त्यातून दुखावलेले मूळ भाजप कार्यकर्ते आजही सानप यांना अनुकूल नाही. शहरातील तीन आमदारांपैकी अपवादानेच कोणी सानप यांना पक्षात पुन्हा प्रवेश देण्यासाठी अनुकूल असेल अशी स्थिती आहे.

सानप यांचे संघ परिवाराशी चांगले संबंध असले तरी तरी नेमके ते कितपत तारतील याविषयी शंका आहे. मुळात सानप यांच्या पक्षप्रवेशाला प्रमुख अनुकूलता हवी ती गिरीश महाजन यांची ! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे मंत्री असलेले म्हणून महाजन यांचे नाव होते आणि त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत जेव्हा सानप यांना डावलून ॲड. राहुल ढिकले यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी फडणवीस यांनी थेट सानप यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते. त्यामुळे आता सानप दीड दोन वर्षांत कसे पावन झाले? असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ते आता काय निर्णय ‌घेतात हेदेखील महत्त्वाचे आहे.

Web Title: Will Balasaheb's party entry be hit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.