नाशिकमध्ये माकपाच्या आंदोलकांचा सातव्या दिवशीही मुक्काम

By Suyog.joshi | Published: March 3, 2024 04:38 PM2024-03-03T16:38:22+5:302024-03-03T16:39:26+5:30

ऐन सुटीच्या दिवशी रविवारी आंदोलनामुळे शहराच्या काही ठिकाणची वाहतूक खोळंबली.

CPM agitators stay in Nashik for seventh day | नाशिकमध्ये माकपाच्या आंदोलकांचा सातव्या दिवशीही मुक्काम

नाशिकमध्ये माकपाच्या आंदोलकांचा सातव्या दिवशीही मुक्काम

नाशिक - वनहक्क दावे मंजूर करावेत, कांदानिर्यात बंदी उठवावी, शेतमालाला हमीभाव, आशासेविकांच्या मानधनात वाढ देऊन शासकीय सेवेचा दर्जा द्यावा तसेच अन्य मागण्यांसाठी गेल्या सोमवारपासून नाशिकमध्ये धडकलेल्या ‘माकपा’च्या लाल वादळाने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सलग सातव्या दिवशी रविवारी मुक्काम ठोकला आहे. सोमवार (दि. ४) रोजी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. त्यानंतर मोर्चाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे माजी आमदार जे. पी. गावित यांनी सांगितले.

यावेळी बोलताना गावित म्हणाले, जिल्हाधिकारी जलज शर्मा काही कामानिमित्त बाहेरगावी जात आहे. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्यासोबत सोमवारी (दि.४) बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या कामांच्या अंमलबजावणी नेमकी कशी करणार याबाबत चर्चा होईल. त्यात आमच्या मागण्या कशा पूर्ण होतात, किती दिवसांत त्यांची अंमलबजावणी केली जाते त्यानुसार आंदोलनाची पुढील दिशा ठरेल, असेही गावित यांनी सांगितले. शासकीय कार्यालयांचे कामकाज सोमवारी पूर्ववत सुरू झाल्यानंतर वनहक्क दाव्याबाबत तातडीने अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन महिन्यांच्या टाइमबॉन्ड कार्यक्रम आखून सर्व दावे निकाली काढण्याची ग्वाही जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली तर, धोरणात्मक निर्णयाबाबत केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे सांगत शर्मा यांनी आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. मात्र त्यास माजी आ. जे. पी. गावित यांनी नकार देत आंदोलनावर ठाम राहत असल्याचे सांगितले.

रविवारीही वाहतुकीचा खोळंबा
ऐन सुटीच्या दिवशी रविवारी आंदोलनामुळे शहराच्या काही ठिकाणची वाहतूक खोळंबली. रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, मुंबई नाका, त्र्यंबक नाका, मध्यवर्ती बसस्थानक परिसरात बराच वेळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.

Web Title: CPM agitators stay in Nashik for seventh day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक