मद्यनिर्मितीसाठी होणारा पाणीउपसा थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 11:41 PM2018-12-08T23:41:14+5:302018-12-08T23:46:22+5:30

येथे झालेल्या पाणीटंचाई आराखडा निवारण बैठकीत बोअर अधिग्रहण, नवीन बोअर या मागणीबरोबर शेळगाव (ध) येथील मत्स्यव्यवसायासाठी व मद्यनिर्मिती करणा-या कंपनीला दररोज होत असलेल्या लाखो लिटर पाणी पुरवठ्यास विरोध करण्यात आला़ पाणीटंचाईच्या काळात दारूची निर्मिती होत असलेल्या कंपनीला पाणीपुरवठा कशासाठी ? हा प्रश बैठकीत चांगलाच गाजला.

Stop water supply for alcohol | मद्यनिर्मितीसाठी होणारा पाणीउपसा थांबवा

मद्यनिर्मितीसाठी होणारा पाणीउपसा थांबवा

Next
ठळक मुद्देधर्माबादेत आराखडा बैठक पाणीटंचाईचे संकट उभे असताना मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीला पाणीपुरवठा

धर्माबाद : येथे झालेल्या पाणीटंचाई आराखडा निवारण बैठकीत बोअर अधिग्रहण, नवीन बोअर या मागणीबरोबर शेळगाव (ध) येथील मत्स्यव्यवसायासाठी व मद्यनिर्मिती करणा-या कंपनीला दररोज होत असलेल्या लाखो लिटर पाणी पुरवठ्यास विरोध करण्यात आला़ पाणीटंचाईच्या काळात दारूची निर्मिती होत असलेल्या कंपनीला पाणीपुरवठा कशासाठी ? हा प्रश बैठकीत चांगलाच गाजला.
आ.वसंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाई निवारण बैठक ६ डिसेंबर रोजी नगरपालिका सभागृहात पार पडली़ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बैठकीत तालुक्यातील सर्व गावांतील पाणीटंचाईच्या समस्या सरपंच, उपसरपंच, सदस्य, प्रतिनिधींनी मांडल्या़
पावसाचे प्रमाण तीन, चार वर्षांपासून कमी झाल्याने गोदावरी पात्रात कमी साठा होत आहे. भविष्यात पाणीटंचाईचे संकट उभे असताना व्यावसायिकांना गोदावरी नदीपात्रातून पाणी का दिले जाते ? जनावरांचा व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर असताना हे प्रशासनास दिसत नाही काय? पहिल्यांदा पिण्यासाठी पाणी की दारूसाठी ? असा प्रश्न मनूर येथील सरपंच एकनाथ जिंकले यांनी उपस्थित केला़ शिवराज गाडीवान यांनी मत्स्यव्यवसायाला होणारा पाणीपुरवठा थांबवावा, अशी मागणी केली़
धर्माबाद तालुक्यात पाटबंधारे विभाग उमरीअंतर्गत होत असलेले स्वजल, पेयजल पाणीपुरवठ्याचे कामे दहा- दहा वर्षांपासून अर्धवट आहेत़ तर काही बंद अवस्थेत आहेत. लाखो रुपये खर्च करून योजना कुचकामी ठरली आहे ; पण उमरी येथील पाटबंधारे विभाग काहीच लक्ष देत नाही. दरवर्षी प्रत्येक पाणीटंचाई आराखडा बैठकीत अनेक तक्रारी केल्या जातात़ त्यावरसुद्धा बैठकीत गांभीर्याने लक्ष दिले जात नाही, असा आरोप सरपंचांनी बैठकीत केला़
बन्नाळीचे सरपंच साईनाथ पाटील यांनी पेयजल योजनेची टाकी पाडण्याची विनंती केली़ पाणी पुरवठ्याचे शेख युसूफभाई हे निष्क्रिय अधिकारी असून प्रत्येक बैठकीत उडवाउडवीची उत्तरे देतात. ते कोणतेच कामे करत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला़ पंचायत समितीचे सदस्य सदस्य मारोती कागेरू यांनी शेख युसूफभाई यांच्या कामकाजावर आक्षेप घेतला़ युसूफभाई यांची तालुक्यातून बदली केली तरच पाणीपुरवठ्याची कामे योग्य होतील, असा संताप सदस्यांनी व्यक्त केला. बहुतांश सरपंचांनी पाणी पुरवठा व वीजवितरणबद्दल तक्रारी केल्या़ गेल्यावर्षीच्या पाणीटंचाई आराखडा बैठकीतील समस्या सोडविल्या जात नाही़ पाणीटंचाई आराखडा बैठक केवळ नावालाच असल्याचे अनेक सरपंचांनी नाराजी व्यक्त केली.
बैठकीस आ. वसंतराव चव्हाण यांच्यासह तहसीलदार ज्योती चौहाण गटविकास आधिकारी मोहन जाधव, नगर परिषद धर्माबादचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, अब्दुल सत्तार शेठ, जिल्हा परीषदचे कृषी सभापती दत्तात्रय रेड्डी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख आकाश रेड्डी, पंचायत समीतीचे सभापती रत्नमाला जयराम पाटील, उपसभापती चंद्रकांत वाघमारे, मारोती कागेरू, नागोराव पाटील रोशनगावकर, दत्ताहारी पाटील चोळाखेकर, प्रा़ रवींद्र मुपडे, संजय मिरजकर आदींसह सर्व गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते.
विजेच्या लपंडावामुळे शेतकरी त्रस्त
या भागात वारंवार डीपी जळत असून वीज वितरण विभागाकडून वेळेवर डीपी दिल्या जात नाही़ त्यामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने अनेकांची पिके करपून जात आहेत़ दिवस, रात्र विजेचा लपंडाव सुरू राहत असून अनेक गावे अंधारात राहत आहेत़ वीज नसल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत़ वीज वितरणचे अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत़ डीपीची मागणी केल्यानंतर त्यास प्रतिसाद देत नाहीत. धर्माबाद तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत वीज नसल्याने डिजिटल धडे देणे बंद आहे. त्यामुळे डिजिटल शाळा कशासाठी ? असा प्रश्न बाचेगावचे उत्तमराव पाटील बाचेगावकर यांनी उपस्थित केला. सभापती दत्तात्रय रेड्डी यांनी यावेळी आपले विचार मांडले.

Web Title: Stop water supply for alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.