गाैरी विसर्जनाला गालबाेट, कोलार नदीत दाेघांचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 10:35 AM2023-09-20T10:35:32+5:302023-09-20T10:39:14+5:30

दाेघांना वाचविण्यात यश : चंद्रभागा व काेलार नदीतील घटना

Two people who went to immersion drowned in the Kolar River | गाैरी विसर्जनाला गालबाेट, कोलार नदीत दाेघांचा बुडून मृत्यू

गाैरी विसर्जनाला गालबाेट, कोलार नदीत दाेघांचा बुडून मृत्यू

googlenewsNext

सावनेर/खापरखेडा : सावनेर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील धापेवाडा (ता. सावनेर) येथील चंद्रभागा, तर खापरखेडा (ता. सावनेर) पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील चनकापूर (ता. सावनेर) येथील काेलार नदीच्या पात्रात दाेघांचा बुडून मृत्यू झाल्याने गाैरी विसर्जनाला गालबाेट लागले. यात दाेघांना वाचविण्यात तरुणांना यश आले. या दाेन्ही घटना मंगळवारी (दि. १९) दुपारी घडल्या.

सागर दिनेश लाडसे (१८, रा. धापेवाडा, ता. कळमेश्वर) व प्रल्हाद दीपक केसरवानी (१२, रा. वाॅर्ड क्रमांक-२, चनकापूर, ता. सावनेर) अशी मृतांची; तर साजन दिनेश लाडसे (१७, रा. धापेवाडा) व मंथन जितेंद्र बावने (१२, वाॅर्ड क्रमांक २, शिवनगर, चनकापूर) अशी वाचवण्यात आलेल्या मुलांची नावे आहेत.

सागर व साजन सख्खे भाऊ असून, ते मंगळवारी दुपारी आईसाेबत गाैरी विसर्जनासाठी चंद्रभागा नदीच्या तीरावर गेले हाेते. आई इतर महिलांसाेबत नदीच्या पात्रात गाैरी विसर्जन करीत असताना दाेघेही अंघाेळ करण्यासाठी पाण्यात उतरले आणि खाेल पाण्यात जाताच गटांगळ्या खाऊ लागले. हा प्रकार लक्षात येताच काठावरील काही तरुणांनी दाेघांनाही पाण्यातून बाहेर काढले. त्याला लगेच धापेवाडा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात नेले. तिथे डाॅक्टरांनी सागरला तपासणीअंती मृत घाेषित केले, तर साजनवर उपचाराला सुरुवात केली. हितज्याेती फाउंडेशनचे हितेश बन्साेड यांनी सागरचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सावनेर शहरातील शासकीय रुग्णालयात आणला.

खापरखेडा परिसरातील डॉ. ओंकार केळवदे यांच्या पत्नी रिमा केळवदे या काही महिलांसाेबत मंगळवारी दुपारी काेलार नदीच्या घाटावर गाैरी विसर्जनासाठी गेल्या हाेत्या. त्यांच्यासाेबत यथार्थ ओंकार केळवदे (१७), प्रल्हाद दीपक केसरवानी (१२), मंथन जितेंद्र बावने (१२), ओंकार रामचंद्र चंद्रवंशी (१७), स्वप्निल प्रदीप घोगरे (१८), अर्शद फिरोज शेख (११), बिहाल विनोद युवनाते (११) सर्व रा. वाॅर्ड क्रमांक - २ शिवनगर, चनकापूर यांच्यासह इतर मुलेही हाेती.

महिला गाैरी विसर्जनात व्यस्त असताना सर्व मुले नदीच्या पात्रात पाणी खेळत अंघाेळ करायला लागली. त्यातच काहींनी दाेघे बुडाल्याची आरडाओरड करायला सुरुवात केली. त्यामुळे ओंकार चंद्रवंशी याने पाण्यात उडी घेऊन दाेघांचा शाेध सुरू केला. मंथन बावणे त्याच्या हाती लागल्याने त्याने मंथनला बाहेर काढले. त्यामुळे ताे थाेडक्यात बचावला. मात्र, प्रल्हाद केसरवानी प्रवाहात आल्याने वाहून गेला.

माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून त्याचा पाेहणाऱ्या स्थानिकांच्या मदतीने प्रल्हादचा शाेध घेतला. काही वेळात त्यांना प्रल्हादचा मृतदेह आढळून आला. पाेलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर शहरातील मेयाे रुग्णालयात पाठविला. या दाेन्ही प्रकरणांत सावनेर व खापरखेडा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.

घाट बांधकाम रखडले

दरवर्षी गाैरी विसर्जन आणि छटपूजानिमित्त काेलार व कन्हान नदीच्या पात्रात महिलांची माेठी गर्दी हाेते. या दाेन्ही ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने काहीही उपाययाेजना नाही. या दाेन्ही ठिकाणी घाटांच्या बांधकामासाठी खनिज निधीतून २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला हाेता. राज्य सरकारने या बांधकामाला स्थगिती दिल्याने घाटांचे बांधकाम हाेऊ शकले नाही. या ठिकाणी घाट असता तर प्रल्हादचा जीव गेला नसता, अशी प्रतिक्रिया जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली आहे.

Web Title: Two people who went to immersion drowned in the Kolar River

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.