नागपुरातील ट्रॉमा केअर युनिट हा केवळ ‘ड्रामा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 10:46 AM2018-05-09T10:46:43+5:302018-05-09T10:46:53+5:30

नागपूर मंडळांतर्गत म्हणजे सहा जिल्ह्यांमध्ये १४ ट्रॉमा केअर युनिटला मंजुरी मिळाली. परंतु गेल्या आठ ते दहा वर्षांत केवळ आठ ट्रॉमा केअर युनिटच सुरू होऊ शकले.

The Trauma Care Unit in Nagpur is the only 'Drama' | नागपुरातील ट्रॉमा केअर युनिट हा केवळ ‘ड्रामा’

नागपुरातील ट्रॉमा केअर युनिट हा केवळ ‘ड्रामा’

Next
ठळक मुद्देकशी मिळेल अपघातग्रस्तांना मदत?नागपूर मंडळातील १४ पैकी केवळ ८ युनिट सुरूआरोग्य विभागाची उदासीनतालोकलेखा समिती देईल का लक्ष?

सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील अपघातातील जखमीला तातडीने वैद्यकीय सेवा मिळून त्याला जीवनदान मिळण्यासाठी ‘ट्रॉमा केअर युनिट’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. नागपूर मंडळांतर्गत म्हणजे सहा जिल्ह्यांमध्ये १४ ट्रॉमा केअर युनिटला मंजुरी मिळाली. परंतु गेल्या आठ ते दहा वर्षांत केवळ आठ ट्रॉमा केअर युनिटच सुरू होऊ शकले. यातही जे सुरू झाले ते ‘ट्रॉमा’च्या निकषात बसत नसल्याने केवळ मलमपट्टी करण्यापुरतेच मर्यादित असल्याचे चित्र आहे तर उर्वरित सहा युनिटचा प्रस्ताव सरकारकडे धूळ खात पडून आहे. याचा पाठपुरावा कुणीच करीत नसल्याने योग्य उपचारविना जखमी दगावत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
नागपूरच्या मेडिकल ट्रॉमा केअर युनिटची पाहणी करण्यासाठी बुधवारी ‘लोकलेखा समिती’ येत आहे. ही समिती विदर्भातील या ‘ट्रॉमा केअर युनिट’कडेही लक्ष देईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
भारतात रस्ता अपघातातील मृत्यूची संख्या ही कुठल्याही आजाराच्या तुलनेत सर्वाधिक आहे. रस्ते अपघातातील जखमींना पहिल्या तासात (गोल्डन अवर) तातडीने वैद्यकीय सोयी मिळाव्यात यासाठी राज्याने ११ व्या पंचवार्षिक योजनेत म्हणजे २००७ ते १२ या वर्षांत राष्ट्रीय महामार्गावरील शासकीय रुग्णालयात ट्रॉमा केअर युनिट विकसित करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार पूर्व विदर्भात म्हणजे सार्वजनिक आरोग्य नागपूर मंडळांतर्गत टप्प्याटप्प्याने १४ ट्रॉमा केअर युनिटची घोषणा करण्यात आली. यात नागपूर जिल्ह्यात तीन, वर्धा जिल्ह्यात तीन, भंडारा जिल्ह्यात एक, गोंदिया जिल्ह्यात दोन, चंद्रपूर जिल्ह्यात दोन व गडचिरोली जिल्ह्यात तीन ट्रॉमा केअर सुरू करण्यात येणार होते. परंतु आठ ते दहा वर्षांचा कालावधी होऊनही केवळ यातील आठ ट्रॉमा युनिटच सुरू झाले.

अपर्याप्त मनुष्यबळ, साधनसामुग्रीची कमतरता
ट्रॉमा केअर युनिटमध्ये शल्यचिकित्सक, आॅर्थाेपेडिक सर्जन व बधिरीकरण तज्ज्ञासह त्यांच्या मदतीला परिचारिका, तंत्रज्ञ, शस्त्रक्रिया गृह, प्रयोगशाळा, वैद्यकीय अधिकारी, सफाई कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. परंतु अनेक ठिकाणी ही पदेच भरण्यात आलेली नाही. यातही सिटी स्कॅनसारखे अद्ययावत उपकरण व इतर सोयी उपलब्ध नाहीत.

नागपूर जिल्ह्यात तीनपैकी एकही ट्रॉमा नाही
नागपूर जिल्ह्यात काटोल, उमरेड व भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात ‘वर्ग तीन’चे ट्रॉमा केअर युनिट सुरू होणार होते. परंतु अद्यापही एकही ट्रॉमा सुरू झालेला नाही. या मार्गावरील जखमींना नागपूर मेडिकलचे ट्रॉमा गाठावे लागते. विशेष म्हणजे, काटोलमध्ये ट्रॉमाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन दोन ते तीन वर्षांचा कालावधी लोटला. परंतु पदभरती व उपकरणांअभावी ही इमारत कुलूपातच आहे.

केवळ मलमपट्टीपुरतेच ‘ट्रॉमा’
आरोग्य विभागाचे जे आठ ट्रॉमा केअर युनिट सुरू आहेत ते केवळ मलमपट्टीपुरतेच मर्यादित आहेत. बहुसंख्य ठिकाणी कायमस्वरूपी विशेषज्ञ नसल्याने जे पदव्युत्तर विद्यार्थी एक वर्षासाठी ग्रामीण भागात बॉण्ड पूर्ण करण्यासाठी येतात त्यांच्याच भरवशावर हे युनिट सुरू आहे. यातही बॉण्ड संपल्यावर दुसऱ्या विद्यार्थ्याची नियुक्ती होईपर्यंत दोन-तीन महिने या जागा रिक्तच असतात. यादरम्यान जखमी आल्यास त्याला आल्यापावली परत पाठविले जात असल्याची माहिती आहे.

Web Title: The Trauma Care Unit in Nagpur is the only 'Drama'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.