‘आयआयएम-नागपूर’च्या ८ टक्के विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात पूर्ण माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2022 01:52 PM2022-05-07T13:52:44+5:302022-05-07T13:59:14+5:30

२०२२-२४ या बॅचपासून ‘आयआयएम’ने गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष पुढाकार घेतला असून दोन वेगवेगळ्या शिष्यवृत्तींमधून २० विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

complete waiver of tuition fees for 8% students of IIM-Nagpur | ‘आयआयएम-नागपूर’च्या ८ टक्के विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात पूर्ण माफी

‘आयआयएम-नागपूर’च्या ८ टक्के विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात पूर्ण माफी

googlenewsNext
ठळक मुद्देएससी, एसटी, दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती गरीब विद्यार्थ्यांनाही संधी

योगेश पांडे

नागपूर : महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ असलेल्या ‘आयआयएम-नागपूर’कडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचे चित्र आहे. २०२१-२३ या बॅचसाठी संस्थेचे शुल्क १३.७५ लाख होते. अशा स्थितीत गुणवंत तसेच गरीब विद्यार्थ्यांना येथे शिक्षण घेण्याची संधी मिळावी यासाठी विशेष योजना सुरू करण्यात आली आहे. संस्थेतर्फे २० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीसाठी निवडलेल्या उमेदवारांना दोन वर्षांच्या कार्यक्रमासाठी शिक्षण शुल्कासाठी संपूर्ण माफी मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘आयआयएम-नागपूर’ची स्थापना २०१५ साली झाली. पहिल्या वर्षी दहा लाख रुपये इतके शुल्क होते. मात्र देशातील इतर ‘आयआयएम’शी स्पर्धा करताना शुल्कवाढ करणे आवश्यक असल्याने टप्प्याटप्प्याने शुल्क वाढविण्यात आले. २०२२-२४ या बॅचपासून ‘आयआयएम’ने गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष पुढाकार घेतला असून दोन वेगवेगळ्या शिष्यवृत्तींमधून २० विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. ‘आयआयएम’ची एकूण प्रवेशक्षमता २४० इतकी असून ८.३३ टक्के विद्यार्थ्यांना शिक्षणशुल्कात पूर्ण माफी मिळणार आहे. ‘मेरिट स्कॉलरशिप ’अंतर्गत कॅटमध्ये ९५ पर्सेंटाईल किंवा त्याहून अधिक गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना शिष्यवृत्ती मिळेल तर ‘नीड कम मेरिट स्कॉलरशिप’मध्ये ५ लाखांहून कमी उत्पन्न असलेल्या १० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल.

शिष्यवृत्ती प्रक्रिया सुलभ करण्यावर भर

केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांद्वारे प्रदान केलेल्या अनेक शिष्यवृत्तींच्या प्रक्रियेला आणखी सुलभ करण्यावर आमचा भर आहे, अशी माहिती संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दिव्यांग, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी उच्च श्रेणीतील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. तसेच अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय फेलोशीप व शिष्यवृत्तीचेदेखील पर्याय आहेत. झारखंडमधील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री फेलोशीप योजना तर राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकतो. याशिवाय कॉर्पोरेट्स आणि खाजगी संस्थांद्वारे प्रदान केलेल्या शिष्यवृत्तीची सुविधा देखील उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

देशातील इतर १९ ‘आयआयएम’मधील शुल्कप्रणाली (२०२१ किंवा २०२२ बॅच)

आयआयएम अहमदाबाद - २३ लाख

आयआयएम बंगळुरू - २३ लाख

आयआयएम-कोलकाता - २७ लाख

आयआयएम-लखनौ - १९.२५ लाख

आयआयएम-कोझिकोड - २२.५० लाख

आयआयएम-इंदोर - २०.०६ लाख

आयआयएम-शिलॉंग - सुमारे १४.५० लाख

आयआयएम-रायपूर - १४.२० लाख

आयआयएम-रांची - १६.३० लाख

आयआयएम-रोहतक - १६.१० लाख

आयआयएम-काशीपूर - १५.४२ लाख

आयआयएम-त्रिची - १६.५० लाख

आयआयएम-उदयपूर - १७.९० लाख

आयआयएम-अमृतसर - १३.२० लाख

आयआयएम-बुद्धगया - १२.९५ लाख

आयआयएम-संबलपूर - १३.०३ लाख

आयआयएम-सिरमौर - ११.७५ लाख

आयआयएम-विशाखापट्टणम - १६.५९ लाख

आयआयएम-जम्मू - १५.५६ लाख

Web Title: complete waiver of tuition fees for 8% students of IIM-Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.