अपरिहार्य... आणि मान्य!

By Admin | Published: July 22, 2016 05:33 PM2016-07-22T17:33:17+5:302016-07-22T17:56:38+5:30

आहे ते टिकवून ठेवून जगण्याची परिपूर्ण अनुभूती जी आमच्या आधीच्या पिढीला अनुभवता आली, ती आम्हाला कधी आलीच नाही. कशी येणार?

Inevitable ... and valid! | अपरिहार्य... आणि मान्य!

अपरिहार्य... आणि मान्य!

googlenewsNext

 सागर पांढरे

आईची पिढी पंचविशीत असताना त्यांच्याकडे असं काय होतं जे आज तुझ्याकडे नाही? तुला त्याची रु खरुख वाटते का ?
- माझ्या आईच्या पिढीची पंचविशी म्हणजे साधारण ऐशीचं दशक. कॉम्प्युटरच्या माध्यमातून व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीमध्ये बिचकत पावलं ठेवू पाहणारा असा तो बावरलेला मध्यमवर्गीय कॉमन मॅन तंत्रज्ञानाच्या विशाल, आभासी दुनियेत प्रवेश करायला उत्सुक, तरीही आपल्या मुळांना घट्ट बिलगून उभा असलेला. आर्थिकदृष्ट्या मूठभर वरचढ समूह जरी अमेरिकेची स्वप्नं जगत असला, तरी बहुसंख्य मध्यमवर्गासाठी आपला मुलगा कोकणातून मुंबईला स्थायिक होणं ही घटनाही कासावीस करणारीच होती.. पूर्वजांचा वाडा, गावाकडची जमीन अशा पारंपरिक प्रतीकांवर नितांत श्रद्धा ठेवणारा हा मध्यमवर्गीय उंबरठ्यापाशी येऊन ठेपलेल्या वैश्विकीकरणाच्या रेट्याला यथाशक्ती थोपवताना दमून गेलेला होता. पूर्वापार चालत आलेलं ते आपण बहुतांशी टिकवून ठेवू शकत आहोत याचं असीम समाधान, अभिमान आणि यातलं कितपत, कसं, कितीकाळ असंच टिकवता येईल याविषयी साशंकता.
या पिढीतला सरकारी नोकरी करणारा, नुकताच लग्न झालेला मध्यमवर्गीय तरु ण द्वंद्वात अडकलेला होता. असं असलं तरी ही पिढी आमच्या आजोबा-पणजोबांच्या पिढीइतपत कट्टर आणि बदलाविषयी प्रतिकूल नव्हती. या पिढीमध्ये समजूतदारपणा होता. संयम होता. पुढच्या दशकभरात आर्थिक, सामाजिक आणि व्यक्तिगत नातेसंबंधाचे आयाम पूर्णपणे बदलू शकतात हे दिसत असूनही ही तरुण पिढी हिस्टेरिक किंवा एक्साइट झाली नाही आणि आमच्या पिढीप्रमाणे जुनं सगळं बासनात गुंडाळून ठेवून, सगळे पाश झटक्यात विलग करून आधुनिकतेच्या झगमगाटाकडे धावतही सुटली नाही. आहे तो ‘स्टेटसको’ फार न बदलता, असलेल्या चौकटींची कमीत कमी मोडतोड करत बदल सामावून घेण्याचा प्रयत्न केला या पिढीतल्या तरु णाने. हा शांतपणा, हे सामंजस्य आमच्यात अभावानेच दिसतं. आम्हाला बदलाचं व्यसन आहे. वर्तमान परिस्थितीचा आम्हाला लगेच कंटाळा येतो आणि एका झोक्यावरून दुसऱ्या झोक्यावर झेप घ्यायची सर्कस आम्हाला अत्यंत युफोरिक वाटते. नवं आॅफर लेटर हाती यायच्या आधीच सोडलेली नोकरी, महिनाभरात घडवून आणलेलं ब्रेकअप, तासाला बदलणारे फेसबुक डीपी आणि व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस या सगळ्यात शाश्वत असं काहीच शिल्लक राहत नाही आमच्या हातात. कुठलाही अनुभव पूर्णपणे न अनुभवता, त्यातून पुरेसं शहाणं न होता तो अर्धवट सोडून नवीन अनुभव घ्यायला झेपावतोय आम्ही. अत्यंत खंडित, फ्रॅगमेण्टेड आहे आमच्या पिढीचं वास्तव. अर्धवट, गोंधळलेल्या असंख्य क्षणांची गर्दी. आहे ते टिकवून ठेवून जगण्याची परिपूर्ण अनुभूती जी आमच्या आधीच्या पिढीला अनुभवता आली, ती आम्हाला कधी आलीच नाही.
पण आहे हे असं आहे. याबाबत माझा सूर नकारात्मक अथवा तक्र ारीचा नाही. तो फारतर नाइलाजाचा आहे. त्यामुळे या सगळ्याची मला खंत वाटते का? रुखरुख वाटते का? - तर नाही फारशी. वेड्यासारखं धावत असताना ठेचकाळलो तर जखमेवर मलमपट्टी करताना वाटून जातं की आईचं ऐकायला हवं होतं. अडथळ्यांचं भान राखायला हवं होतं. पण जखमा भरून आल्या की धावायला पुन्हा सज्ज असतो मी. मला असायलाच हवं. माझ्याकडे वेळ नाही, जो माझ्या आईच्या पिढीकडे होता. आहे ते टिकवून ठेवण्यासाठी, जे नवीन येऊ पाहतंय त्याचा पूर्णपणे अदमास घेण्यासाठी. 
आईच्या काळात एक खोलीभर कॉम्प्युटर असायचा, ज्यात सकाळी लावलेला दोन ओळींचा प्रोग्राम काही तासांनी, कधी कधी दिवसांनी पूर्ण व्हायचा. आमच्याकडे काही टीबीचे प्रोसेसर आहेत. परमच्या प्रोसेसिंग स्पीडच्या दुप्पट गतीने धावत राहिलो नाही मी तर मागचा पुढे येऊन मला सहज रिप्लेस करून जाईल. त्यामुळे योग्य- अयोग्य, मान्य-अमान्य अशा वर्गीकरणांची चैन करता नाही येऊ शकत माझ्या पिढीला. उपलब्ध संधींच्या तुलनेत संधी उपभोगू पाहणारे कैक पटीने जास्त आहेत आज. अफाट गरजा आणि त्या भागवायच्या तुटपुंज्या पर्यायांचा मेळ साधायचा असेल तर हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे धावण्याशिवाय पर्याय नाही. आधुनिकीकरणाच्या बेफाम वादळात पिढी-परंपरांच्या चौकटी उद्ध्वस्त होणारच. त्यामुळे कुठल्याही चौकटीत, साच्यात न अडकता शांतपणे पुरात वाहत जाणं, शाश्वत असं काही नसतंच मुळी हे स्वीकारून दर क्षणाला नवं वास्तव जगण्यावर चढवत पुढे जात राहणं हाच आमच्या पिढीचा समजूतदारपणा.
पिढी बदलली की सामंजस्याची, शहाणपणाची, प्रगल्भतेची परिमाणं बदलतात. बदलायला हवीत. आमच्या आधीच्या पिढीची आहे ते टिकवून ठेवायची धडपड आणि संयम ही आमच्या तुलनेने कमी आवाक्याच्या, सुरक्षित अशा त्यांच्या जगण्याला सुयोग्य अशी त्यांनी अंगीकारलेली भूमिका होती. आमचा तथाकथित (म्हणजे आमच्या आई-बाबांना वाटणारा) उतावळेपणा, सतत नावीन्याची ईर्ष्या ही आमची वैश्विक जगण्याच्या वेगवान प्रवाहात तग धरून ठेवण्याची शस्त्रं आहेत. त्यामुळे आई-बाबांच्या पिढीकडे त्यांच्या पंचविशीत जे होतं, ते आमच्याकडे नसणारच हे अपरिहार्य आहे. आणि जे अपरिहार्य आहे, ज्याला नाइलाज आहे त्यावर उसासे टाकण्यात आम्हाला गम्य नाही. ते स्वीकारून पुढे जाणं आम्हाला क्र मप्राप्त आहे. 
आईची पिढी पंचविशीत असताना तिच्या वाट्याला आलेलं मध्यमवर्गीय आर्थिक वास्तव अधिक ओढगस्तीचं होतं, त्यामुळं त्या पिढीच्या एकूणच जगण्याला मर्यादा आल्या असं वाटतं का? आर्थिक ताण निवळल्याने, परिस्थिती बदलल्याने तुला आईपेक्षा अ‍ॅडव्हाण्टेज मिळाला असं वाटतं का? अधिक चॉइस असणं हे नेहमीच फायद्याचं असतं की त्याने निर्णय कठीण होतो?
- एका शहरी मध्यमवर्गीय कुटुंबासाठी त्या काळात भासणाऱ्या ठरावीक गरजा आणि त्या भागवायची आर्थिक परिस्थिती या परस्परांशी फार विसंगत होत्या असं नाही दिसत. त्याच्या आधीच्या काळात, म्हणजे आजी-आजोबांच्या पिढीत मध्यमवर्ग असा वर्गच फार संख्येने अस्तित्वात नसल्याने, शिक्षणाचा सार्वत्रिक अभाव आणि एकूणच कॉस्ट अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड आॅफ लिव्हिंग बरंच बेताचं असल्यानं त्यांच्या जगण्याला खऱ्या अर्थाने मर्यादा होत्या असं म्हणायला हवं. उदाहरणार्थ माझे आजोबा संध्याकाळी भाजीपाला विकून शाळेची फी भरायचे आणि माझ्या आईला कॉलेजमध्ये असतानाही घरून मिळणारे दरमहा ५०० रुपये पुरायचे. निदान पदवीधर व्हायचं आणि एक स्थिर (म्हणजे बहुतेकदा सरकारी) नोकरी मिळवायची अशी भावना त्या काळातल्या शहरी मध्यमवर्गात बळकट होत होती. त्यामुळे त्या कमी पण खात्रीच्या स्थिर उत्पन्नात गरजा भागवायचे संस्कार नकळत आमच्या आईबाबांच्या तरु ण पिढीवर होत गेले. अंगातला एक सदरा आणि दोरीवर वाळणारा दुसरा याशिवाय तिसरा सदरा असावा ही गरज त्या पिढीतल्या मध्यमवर्गीय तरुणाला फार जाणवलीच नाही आणि त्याच्या सोशल सर्कलमध्येही कुणी त्याला जाणवू दिली नाही. 
कुटुंबाच्या महिन्याच्या खर्चात बसणार नाहीत अशा गरजा फार निर्माण झाल्याच नाहीत त्या काळात.. 
थोडक्यात काय, तर आज आम्हाला हे सगळं त्यांच्या वाट्याला वगैरे आलेलं जगणं अवघड किंवा सीमित इत्यादि वाटू शकतं. पण ते म्हणजे विकसित देशातून भारतात आलेल्या टुरिस्टना इथल्या गरिबीविषयी वाटणारं तात्कालिक कुतूहल आणि हळहळ यासारखंच हस्तिदंती मनोऱ्यातून त्यांच्या जगण्याचं एकांगी विश्लेषण ठरेल. त्यांच्या जगण्याचा आवाका आजच्या तुलनेत कमी असेल. पण कमी आवाका, कमी एक्सपोजर ही त्यांच्या जगण्यातली मर्यादा असेलच असं नाही. पर्याय आणि मार्ग उपलब्ध असताना ते निवडता न येणं ही जगण्याची मर्यादा असू शकते. मार्ग अस्तित्वातच नसताना किंवा असूनही त्याविषयी अनभिज्ञता असताना निवडीचा प्रश्नच उद्भवत नाही. 
आज अनेक प्रसंगी आम्हाला आमच्या आईबाबांची आमच्याविषयी प्रतिकूल, एकांगी मतं आणि निर्णय हा त्यांच्या वैचारिक मर्यादांचा परिपाक वाटतो. कदाचित या वैचारिक मर्यादा त्यांच्या तारुण्याचा आवाका मर्यादित असल्याने, आजच्या नेटिझन तरु णाईच्या जगण्यातल्या अनेक कंगोऱ्यांविषयी ते अनभिज्ञ असल्याने आम्हाला जाणवत असाव्यात. पण आज अनेक शहरी मध्यमवर्गीय पालक त्यांच्या तरु ण मुलांच्या जीवनशैलीतले बदल हळूहळू स्वीकारताना दिसत आहेत. रुढार्थाने अशा पालकांचं जगणं आज व्यापक होताना दिसतंय. २० वर्षांपूर्वीच्या तरुणाईच्या जगण्याला व्यापक जगण्याची आजची तरु णाईची व्याख्या लागू होणं अवघड आहे. 
त्यामुळे तेव्हाचं तरु ण जगणं मर्यादित होतं, असं सरसकट नाही म्हणता येणार. 
गेल्या २०-२५ वर्षांत आर्थिक परिस्थिती सुधारल्याने, नवनवीन वेतन आयोग जाहीर झाल्याने, आयटी इंडस्ट्रीची भरभराट झाल्याने स्टॅण्डर्ड आॅफ लिव्हिंग सुधारलंय हे नक्की. शिक्षण आणि नोकरीविषयी अनेक पर्याय शोधून, वापरून, अनुभवून बघायची मुभा आज माझ्या पिढीकडे आहे. जास्त पर्याय म्हणजे अधिक गोंधळ हे स्वाभाविक आहे. पण उद्दिष्ट आणि त्यामागच्या अपेक्षा स्पष्ट असतील, काय हवं आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे काय नको हे माहीत असेल तर शांतपणे विचार करून योग्य पर्याय निवडणं फार अवघड नाही. हवा तो पर्याय निवडायची आर्थिक, सामाजिकदृष्ट्या मुभा असेल तर जास्त पर्याय उपलब्ध असणं हे कधीही फायदेशीरच आहे. 
आज भारतापेक्षा जगाच्या अन्य कुठल्या भागात असणं तुला जास्त आवडलं असतं का? हो तर का? नाही तर का नाही?
- माझ्यापुरतं बोलायचं झालं तर तिकिटांच्या गर्दीत तासचे तास ताटकळताना, खड्ड्यांमधून रस्ता शोधत गाडी चालवताना, लाखो रु पयांच्या भ्रष्टाचाराच्या आणि बीफ खाल्ल्याच्या संशयावरून रक्तपात झाल्याच्या बातम्या ऐकल्यावर त्या क्षणापुरतं इथून बाहेर जायला हवं असं वाटून जातं. पण हा तात्कालिक संताप आणि त्रागा हे माझ्यासाठी देश सोडून जायचं कारण बनू शकत नाही. याचा अर्थ मी स्वत:ला देशभक्त आणि राष्ट्रवादी घोषित करत नाही. सध्यातरी माझ्या शैक्षणिक आणि करिअरविषयक गरजा इथे पूर्ण होत आहेत. मला आवडेल ते करिअर निवडायची मुभा मला मिळते आहे. पुढे भविष्यात ती मुभा मिळेनाशी झाली, इथले पर्याय अपुरे वाटायला लागले तर जगाच्या पाठीवर कुठेही जाताना मला फार वाईट वाटणार नाही. कारण मी माझ्या देशाला वरचेवर दूषण देत नसलो तरी माझं माझ्या देशावर आंधळं प्रेम नाही आणि भक्ती तर अजिबात नाही. मला इथल्या व्यवस्थेतल्या दोषांची जाणीव आहे. मुद्दा इतकाच की मी स्वार्थी आहे. सध्यातरी हे दोष माझ्या शिक्षण आणि करिअरच्या आड येऊन माझा मार्ग अडवताना मला दिसत नाहीत. याचा अर्थ दोष नाहीतच असा नाही. ते वैयक्तिकरीत्या मला देश सोडून निघून जाण्याइतपत त्रासदायक वाटत नाहीयेत इतकंच. 
शिवाय माझ्या सामाजिक संवेदना एवढ्या तीव्र नाहीत की मी स्वत: व्यवस्थेचा भाग होऊन ती बदलू पाहीन. त्यामुळे मला या दोषांचा प्रमाणाबाहेर त्रास झाला आणि माझ्या करिअरच्या आड ते यायला लागले तर मी बाहेर पडीन हे नक्की. ती मुभा मला आहे, मी स्वत:ला देऊ केली आहे. 
व्यक्तिगत निर्णय आणि राष्ट्रप्रेम यांची गल्लत मी करत नाही. करणार नाही. मी देशात राहणं किंवा देशाबाहेर जाणं हे माझ्या असलेल्या अथवा नसलेल्या राष्ट्रप्रेमाला प्रूव्ह अथवा डिस्प्रूव्ह करण्याचं साधन असू शकत नाही. फक्त अशावेळी मी व्यवस्थेतल्या दोषांचं भांडवलीकरण आणि जनरलायझेशन करून गळे काढणार नाही. जे देशाबाहेर जाण्याचा निर्णय घेतलेले माझ्या पिढीतले अनेकजण दुर्दैवाने करताहेत. 
बाहेर पडणं हा माझा वैयक्तिक निर्णय असेल. सध्या इथे असणं हादेखील माझा वैयक्तिक निर्णय आहे. मी पळवाट म्हणून देश सोडून जाऊ इच्छित नाही आणि सध्या नाइलाज म्हणून या देशात राहतोय असंही काही नाही. माझ्या आसपासचे अनेकजण मला बाहेर पडायचा सल्ला देत असताना इथे राहायचा निर्णय मी विचारपूर्वक घेतला आहे. त्यामुळे त्याचा मला पश्चात्ताप नाही. जगाच्या अन्य कुठल्या भागात असावं असंही साहजिकच त्यामुळे मला वाटत नाही. भविष्यात गरज भासली तर मी बाहेर पडीन. त्या निर्णयाचाही मला पश्चात्ताप नसेल याची खात्री वाटते.

Web Title: Inevitable ... and valid!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.