गंगाशुद्धीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 06:06 AM2018-11-04T06:06:00+5:302018-11-04T06:06:00+5:30

गंगा नदी भारताच्या चिरंतन संस्कृतीचे प्रतीक आहे; पण हीच नदी आज प्रचंड प्रदूषित आहे. गंगा शुद्धिकरणाच्या प्रयत्नांत उलट कॉँक्रीटीकरण वाढले, त्याचबरोबर काही संतांचे प्राणही गेले. गंगेला वाचवणे व तापमानवाढीपासून जीवसृष्टी वाचवणे ही एकच गोष्ट आहे. प्रत्येक माणसासमोरील ते आव्हान आहे.

Challenge of cleaning Ganga.. | गंगाशुद्धीचे आव्हान

गंगाशुद्धीचे आव्हान

Next
ठळक मुद्देगंगेला वाचवणे व तापमानवाढीपासून मानवजात व जीवसृष्टीला वाचवणे ही एकच गोष्ट आहे. ते प्रत्येक माणसासमोरील आव्हान आहे.

अ‍ॅड. गिरीश राऊत

गंगा प्रदूषित होणे, तिचा प्रवाह अवरुद्ध होणे, यामुळे भारतीय धार्मिक व अध्यात्मिक जनमन अस्वस्थ आहे. गंगा भारताच्या चिरंतन संस्कृतीचे प्रतीक आहे.
मग गंगा वाचविणाऱ्या संतांना प्राण का गमावावे लागतात? गंगेचे पावित्र्य जपण्यासाठी संत ज्ञान स्वरूप सानंद (प्रो. जी.डी. अग्रवाल) यांनी ११२ दिवस उपोषण करून प्राणत्याग केला. या आधी स्वामी निगमानंदांनी बलिदान दिले. आता फक्त ३६ वर्षे वयाचे संत गोपालदास यांनी २४ जूनपासून चालू असलेल्या उपोषणात प्राण पणाला लावले आहेत. संत शिवदास हे त्यानंतर समर्पणासाठी तयार आहेत.
थोडे मागे जाऊ. १०० वर्षांपूर्वी स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा देणाऱ्या वंदे मातरम गीतात मातृभूमीचा सुजलाम सुफलाम असा उल्लेख होता. ही स्थिती स्वातंत्र्य मिळाल्यावर पहिल्या दोन पंचवार्षिक योजनांच्या काळापर्यंत म्हणजे साधारण सन १९५५ पर्यंत टिकून होती. देश सुमारे दहा हजार वर्षांची कृषिप्रधानता राखून होता. स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक असलेला चरखा अडगळीत गेला नव्हता. मातीला, माणसाला व श्रमाला प्रतिष्ठा होती. स्वयंचलित यंत्राला व पैशाला प्रतिष्ठा नव्हती.
साठ वर्षांपूर्वीपर्यंत शुद्ध पाण्याच्या नद्या दुथडी भरून वाहत होत्या. कोठल्याही नदी, झरा, ओढा, तलाव, विहिरीचे पाणी नि:शंकपणे पिता येत होते. भूजल पातळी भूपृष्ठालगत होती. मान्सून हजारो वर्षांच्या वेळापत्रकानुसार पडत होता. पण आता ती स्थिती राहिली नाही. सगळ्या नद्या अशुद्ध झाल्या आहेत.
गंगा शुद्धिकरणाची योजना म्हणजे तरी काय आहे? घाट बांधणे, सुशोभित करणे, निर्माल्य गोळा करणे, मृतदेह नदीत टाकले जाऊ नये म्हणून स्मशानभूमी बांधणे.. अशी ही योजना मर्यादित आहे.
अशाने आतापर्यंत गंगा शुद्ध झाली नाही. उलट कॉँक्रीटीकरण वाढले. गंगेच्या पाणलोट क्षेत्रातील लाखो कारखाने, उद्योग व शेकडो शहरे गंगेला प्रदूषित करतात. हे जगातील इतर भागांतील अर्थव्यवस्थेशी म्हणजे व्यापार व जीवनशैलीशी जोडलेले आहेत. या प्रदूषणाच्या मूळ स्रोताकडे दुर्लक्ष करून छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष वेधले जाते.
खरे तर गंगा-यमुना नद्यांच्या खोºयातील प्रदेश हा जगातील सर्वोत्कृष्ट सुपीक गाळाच्या प्रदेशांपैकी आहे. सुमारे आठ कोटी वर्षांपूर्वी आफ्रिका खंडाचा तुकडा आशिया खंडामध्ये शिरला. त्या प्रक्रि येत हिमालयाच्या पायथ्याशी दोन ते तीन हजार फूट खोलीची घळ निर्माण झाली. ही घळ पुढील लाखो वर्षांत गाळाने भरली. त्यातून कोठेही उंचसखलपणा नसलेले विस्तीर्ण गाळाचे सुपीक प्रदेश तयार झाले. दुर्दैवाने या अद्भुत देणगीचा उपयोग करून न घेता रोजगारासाठी आपण शहरांकडे धावत सुटलो.
जगातील औद्योगिकरण, शहरीकरणातून उत्सर्जित होणाºया कार्बन व इतर घटकांमुळे तापमानवाढ होत आहे. कोठेही कोळसा जाळून वीज बनली, रिफायनरीत तेल शुद्धिकरण झाले, मोटार चालली, सिमेंट, स्टील बनले तरी हिमालयाचा बर्फ वितळतो आणि कोठेही औद्योगिक जीवनशैली जगणाऱ्या माणसांसाठी गंगेच्या पाणलोट क्षेत्रात चालणाऱ्या उद्योगांमुळे रासायनिक प्रदूषण होते.
हे स्वातंत्र्यलढ्याला अपेक्षित नव्हते. स्वतंत्र भारताच्या राष्ट्रध्वजावरून चरख्याला हटवले गेले. ही पुढील अनर्थाची नांदी होती. चरखा अहिंसक, शाश्वत, स्वतंत्र जीवनाचे प्रतीक होता. त्याला नाकारणे अज्ञान होते. त्यामुळे यंत्रसंस्कृतीला श्रेष्ठत्व बहाल करण्याची चूक झाली.
धरण हीच अवैज्ञानिक, मानवविरोधी, सजीवविरोधी, पृथ्वीविरोधी गोष्ट आहे असे आंदोलनांनी ठामपणे म्हटले नाही. यंत्र ही प्रगती आहे या गैरसमजामुळे अशी स्पष्ट भूमिका घेण्यात अडथळा आला.
आज मानवाचे उच्चाटन होण्याची प्रक्रि या सुरू झाली आहे. दि. ६ नोव्हेंबर २०१७ रोजी जर्मनीतील बॉन येथे झालेल्या युनोच्या वातावरण परिषदेत जागतिक हवामान संघटनेने तापमानवाढीने धोकादायक पातळी ओलांडल्याचे व तापमान आता वाढतच राहणार असल्याचे अहवाल स्पष्ट केले. तरीही धरणांना व औद्योगिकरणाला विरोध केल्यास, आपल्यावर पर्यावरण अतिरेकी व प्रगतीविरोधी असल्याचा शिक्का मारला जाईल, असा गंड व अपराधीपणाची भावना दिसते. पृथ्वीची, जीवनाची व न नदीची बाजू घेण्यात अतिरेक, अधोगती व अपराध कसा?
हा प्रश्न भौतिक विकास की अस्तित्व असा आहे. जनतेला व सरकारला विकास हवा व नद्याही हव्या. हा दुटप्पीपणा झाला. दोन्ही एका वेळी मिळणार नाही. संतांनी या ठाम भूमिकेत येणे जरुरीचे आहे. सरकारचाच नव्हे तर आंदोलकांचाही लोकानुनय बंद होण्याची व सत्य स्वीकारण्याची गरज आहे. कार्य जनतेचे आकलन व मानसिकता बदलण्यासाठीदेखील हवे.
गतवर्षी सन २०१७मध्ये भारतात जगात सर्वाधिक २५ लाख माणसे वायुप्रदूषणाने मेली. हे वायुप्रदूषण मोटार, वीज, सिमेंट, स्टील, रासायनिक खते इ. च्या निर्मिती व वापरातून झाले. याचाच परिणाम म्हणून यावर्षी पृथ्वीच्या वातावरणात पॅरिस कराराने धोकादायक ठरवलेली सरासरी तापमानातील १.५ अंश से.ची वाढ होत आहे.
कार्बन उत्सर्जन या क्षणी शून्य करण्याची व नदी, सागर, जंगलांचे हरितद्रव्य वाढीला लागण्याची गरज आहे. औद्योगिकरण तात्काळ थांबविण्याची गरज आहे. यात गंगा असो की मिठी, जगातील सर्व नद्या वाचवणे अंतर्भूत आहे. साठ वर्षांपूर्वीची, काळाच्या कसोटीला उतरलेली भारतीय शेतीवर आधारलेली जीवनपद्धती परत आणणे हाच मानवजात वाचण्याचा एकमेव मार्ग आहे.
आपण सर्वांनी समजून घ्यावे की धरणांना भावी पिढ्यांची मंदिरे म्हणणारे जवाहरलाल नेहरू भाक्र ा - नांगलच्या खऱ्या अनुभवाने व्यथित व अस्वस्थ झाले होते. त्यांनी मोठ्या धरणांबाबतची व विकासाच्या या मार्गाबाबतची त्यांची चिंता सन १९५८च्या भाषणात व्यक्त केली होती. महात्मा गांधीजींनी ११० वर्षांपूर्वी लिहिलेल्या हिंद स्वराज्यात स्पष्ट म्हटले की, ‘यंत्रांमुळे युरोप उजाड झाला. हिंदुस्थानचेही तेच होईल.’ टॉलस्टॉयना फ्रान्समध्ये बोलावले गेले. त्यांना कौतुकाने आयफेल टॉवर दाखवला गेला. हा संत टॉवरच्या पायथ्याशी उभा राहिला व त्याकडे वर पाहून म्हणाला की, ‘मी जगातील सर्वात ओंगळ व कुरूप गोष्ट पाहत आहे.’
कसेही करून ही यंत्रमानवी लाट परतवावी लागेल. हे निर्वैर अध्यात्मिक वृत्तीनेच होऊ शकते. उद्योगपती व त्याचा उद्योग या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. उद्योगपती व उद्योगात नोकरी करणारा कर्मचारी हा माणूस म्हणून पृथ्वीमुळे जगतो. जसे त्याचे पूर्वज हजारो लाखो वर्षे जगत होते. उद्योगामुळे नाही. आजही शहरातील सर्व माणसे इतर प्राण्यांप्रमाणे श्वास घेतात, पाणी पितात, अन्न खातात व त्यामुळे जगतात. ते पृथ्वी देते. उद्योग नाही. उलट उद्योग जीवनाला नष्ट करतो. पृथ्वी जीवन देण्यासाठी आहे. नोकरी देण्यासाठी नाही.
चरखा टिकणे हे भारत टिकणे होते. आज मानवजात टिकणे आहे. गंगा जपणे हे मानवासह जीवसृष्टी जपणे आहे. केवळ प्रतीकपूजा नको.
गंगेला वाचवणे व तापमानवाढीपासून मानवजात व जीवसृष्टीला वाचवणे ही एकच गोष्ट आहे. ते प्रत्येक माणसासमोरील आव्हान आहे. त्याचे उत्तर प्रत्येकाच्या अंतरंगात आहे, पृथ्वीला मान्य असलेल्या आचरणात आहे. उत्तुंग हिमालय व प्राणदायिनी गंगेच्या प्रेरणेने व साक्षीने भारतीयांनी आपला साधेपणा व शहाणपणाच्या ठेव्यातून हे आव्हान स्वीकारले तर निगमानंद व सानंदांसारख्या संतांचे आत्मार्पण सार्थकी लागेल.

..म्हणूनच अतिवृष्टी, महापूर आणि वादळे!
गंगा, यमुना व उत्तरेतील इतर मोठ्या नद्यांचा उगम हिमालयात होतो. हिमालयाचे बर्फाचे आवरण गेल्या काही दशकांत वातावरण बदलामुळे होत असलेल्या तापमानवाढीमुळे सातत्याने घटत आहे. गंगोत्रीच्या आसपासचा व वरील बाजूचा विस्तीर्ण प्रदेश उघडा पडला आहे. मुसळधार पाऊस, ढगफुटीमुळे मातीचा थर झपाट्याने वाहून जात आहे. यामुळे गंगा व इतर नद्या उगमापासून काळे, चॉकलेटी रंगाचे पाणी घेऊन वाहत आहेत. धरणे या मातीने भरत आहेत. फुटत आहेत. याचा परिणाम उत्तराखंड व इतर दुर्घटनांमध्ये दिसत आहे. दि.१२ मे २०१३ रोजी पृथ्वीच्या वातावरणात प्रथम ४०० पीपीएम या कार्बनच्या धोकादायक पातळीची नोंद झाली. तेव्हापासून पृथ्वीवर उष्णतेच्या लाटा, अवकाळी अतिवृष्टी, महापूर, बर्फवृष्टी, वादळे, वणवे.. अशा अभूतपूर्व तीव्रतेच्या दुर्घटनांचे तांडव सुरू झाले. १५ जून रोजी ढगफुटी व दोन हिमनद्या वितळून घसरल्यामुळे झालेली केदारनाथची भयंकर आपत्ती ही याचाच भाग होती.

(लेखक पर्यावरण अभ्यासक आहेत.)
manthan@lokmat.com
 

Web Title: Challenge of cleaning Ganga..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.