"शिवाजी महाराज सूरतवरुन गुवाहाटीला रेडे कापायला गेले नव्हते", संजय राऊतांचा भरत गोगावलेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 12:25 PM2023-12-13T12:25:43+5:302023-12-13T12:27:19+5:30

गद्दारांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी स्वत:ची तुलना करू नये. जे खरे बंडखोर असतात ते देशासाठी आणि राज्यासाठी बंड करतात. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यावे, असेही संजय राऊत म्हणाले.

sanjay raut reaction on bharat gogawale mention chhatrapati shivaji maharaj in shiv sena mla disqualification case hearing | "शिवाजी महाराज सूरतवरुन गुवाहाटीला रेडे कापायला गेले नव्हते", संजय राऊतांचा भरत गोगावलेंवर हल्लाबोल

"शिवाजी महाराज सूरतवरुन गुवाहाटीला रेडे कापायला गेले नव्हते", संजय राऊतांचा भरत गोगावलेंवर हल्लाबोल

नागपूर : हिवाळी विधिमंडळ अधिवेशनात सुरु असलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी सूरत मोहिमेबद्दल बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला होता. 'सूरत हे चांगलं ठिकाण आहे, असं मी ऐकलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज देखील सूरतला गेले होते' अशी साक्ष आमदार भरत गोगावले यांनी काल विधानसभा अध्यक्षांसमोर दिली होती. यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. तसेच, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही या विधानावरून गोगावले यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

भरत गोगावले यांचे हे विधान म्हणजे शिवाजी महाराजांचा अपमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज सुरतेला गेले होते. ते ब्रिटिशांना ईस्ट इंडिया कंपनीला मदत करणाऱ्या गुजराती मंडळाच्या वखारी लुटण्यासाठी. तुम्ही महाराष्ट्र लुटायला तिकडे गेला. तुम्ही छत्रपतीशिवाजी महाराजांचा इतिहास समजून घ्या. छत्रपती शिवाजी महाराज गुवाहाटीला गेले नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज सुरतेवरून गुवाहाटीला रेडे कापायला गेले नव्हते, अशी टीका संजय राऊत यांनी भरत गोगावले यांच्यावर केली आहे. तसेच, गद्दारी आणि बंड यात खूप फरक आहे. गद्दारांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी स्वत:ची तुलना करू नये. जे खरे बंडखोर असतात ते देशासाठी आणि राज्यासाठी बंड करतात. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यावे, असेही संजय राऊत म्हणाले.

दुसरीकडे, ठाकरे गटाचे आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही भरत गोगावले यांच्यावर जोरदार टीका केली. अंबादास दानवे यांनी म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराज वखारी लुटायला गेले होते. औरंग्याचे नाक कापायला शिवाजी महाराज गेले होते. पण या लोकांनी कोणाचे नाक कापले. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज ५० खोक्यांसाठी पळून गेले नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज गद्दारी करून गेले नव्हते. हे गणोजी शिर्के आहे, सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडे आहेत. यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला. हे गद्दार लोक, स्वराज्य लुटणारे लोक छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करणार का? असा संतप्त सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले होते भरत गोगावले?
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी सूरत मोहिमेबद्दल बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला होता. सुनावणीदरम्यान वकील देवदत्त कामत यांनी मंगळवारी भरत गोगावले यांची उलट तपासणी केली. यावेळी 'तुम्ही सूरतच हेच ठिकाण का निवडलं?, असा प्रश्न कामत यांनी विचारला. यावर गोगावले यांनी 'सूरत हे चांगलं ठिकाण आहे, असं मी ऐकलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज देखील सूरतला गेले होते' असं उत्तर दिलं होतं.  

Web Title: sanjay raut reaction on bharat gogawale mention chhatrapati shivaji maharaj in shiv sena mla disqualification case hearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.