अजित पवारांचा वाढदिवस 'अजित उत्सव' म्हणून साजरा करणार; सुनील तटकरेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 06:39 PM2023-07-18T18:39:46+5:302023-07-18T18:40:02+5:30

राष्टवादी युवक काँग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 'रोजगार नोकरी महोत्सव' मेळावा राज्यात आयोजित करणार

Ajit Pawar's birthday will be celebrated as 'Ajit Utsav'; Sunil Tatkare's announcement | अजित पवारांचा वाढदिवस 'अजित उत्सव' म्हणून साजरा करणार; सुनील तटकरेंची घोषणा

अजित पवारांचा वाढदिवस 'अजित उत्सव' म्हणून साजरा करणार; सुनील तटकरेंची घोषणा

googlenewsNext

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा वाढदिवस २२ जुलै रोजी साजरा करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने २२ ते ३१ जुलै हा सप्ताह 'अजित उत्सव' या नावाने राज्यभरात साजरा केला जाणार असल्याची माहिती अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. 

महाराष्ट्रातील शेतकरी पेरण्या न झाल्याने संकटात आहे याची जाणीव असल्याचे अगोदरच स्पष्ट करताना सुनील तटकरे यांनी या वाढदिवसाचे प्रदर्शन न करता सामाजिक उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करणार असल्याचे सांगितले. 

अजित पवारांच्या राजकारणाची सुरुवात समाजकारणापासून सहकार क्षेत्र, शिक्षण, कला, क्रीडापासून झाली. ज्या - ज्या पदावर काम करण्याची संधी मिळाली त्यामध्ये काही काळ लोकसभा सदस्य, राज्यमंत्री, राज्य सहकारी बँकेचे प्रमुख, विधानसभा सदस्य, मंत्री, विविध खात्याचा पदभार, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते असा प्रदीर्घ राजकीय प्रवास करत असताना अजित पवार यांनी विकासाला महत्त्व दिले आहे. सर्वांना न्याय देण्याची भूमिका ठेवली. स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा स्थायी भाव आहे. काहींना तो आवडत नसेल मात्र महाराष्ट्रातील जनतेला चांगल्यापध्दतीने तो रुचला आहे, असेही सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या उपक्रमात सगळ्या घटकांना सामावून घेण्याचा विचार आम्ही केला आहे. मॅरेथॉन स्पर्धा, रक्तदान शिबिर, शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप, वॉटरफिल्टर, छत्री वाटप,शाळकरी मुलींना सायकली मोफत देण्याचा कार्यक्रम, वृक्षलागवड, ज्येष्ठ नागरिकांच्या निवासस्थानी भेटी, स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान, ग्रामस्वच्छता अभियानासाठी दोन तास देणे असा सामाजिक उपक्रम राज्यभर सप्ताहाच्या कालावधीत राबवला जाणार आहे, असेही तटकरे म्हणाले.

महिलांसाठी रोजगार प्रशिक्षण, त्यामध्ये लघु, मध्यम उद्योग, खादी ग्रामोद्योग भारत सरकार व राज्यसरकार यांच्या माध्यमातून ३५ टक्के अनुदानातून वेगवेगळे व्यवसाय करण्याची संधी, महिला कोणता व्यवसाय घेऊ शकतात याचे मार्गदर्शन आणि व्यवसाय निवडल्यानंतर राष्ट्रीयकृत बँकातून त्यांना कर्ज कसे उपलब्ध होईल, त्यांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ कशी मिळेल, असा व्यापक कार्यक्रम राज्यात राबवला जाणार आहे, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. 

राष्टवादी युवक काँग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 'रोजगार नोकरी महोत्सव' मेळावा राज्यात आयोजित करणार आहोत. राज्यसरकार जी रिक्त पदांची भरती करणार आहे त्याची माहिती व प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न या उपक्रमात अंतर्भूत केला आहे असेही सुनील तटकरे यांनी सांगितले. राज्यातील युवतींसाठी शाळा व महाविद्यालयात 'स्वसंरक्षण शिबीरे' आयोजित केली जाणार आहेत असेही सुनील तटकरे यांनी सांगितले. 

Web Title: Ajit Pawar's birthday will be celebrated as 'Ajit Utsav'; Sunil Tatkare's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.