Kolhapur: मंदिरातील दागिन्यांवर डल्ला मारणारे दोघे अटकेत, सहा गुन्ह्यांची उकल

By उद्धव गोडसे | Published: March 13, 2024 07:20 PM2024-03-13T19:20:59+5:302024-03-13T19:22:17+5:30

साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Two thieves who stole ornaments from the temple were arrested in kolhapur, six crimes were solved | Kolhapur: मंदिरातील दागिन्यांवर डल्ला मारणारे दोघे अटकेत, सहा गुन्ह्यांची उकल

Kolhapur: मंदिरातील दागिन्यांवर डल्ला मारणारे दोघे अटकेत, सहा गुन्ह्यांची उकल

कोल्हापूर : मंदिरातील दागिने लंपास करणारे आणि धूम स्टाईलने महिलांचे दागिने हिसकावून पळणा-या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केले. मंगळवारी (दि. १२) दुपारी पुणे-बेंगळुरू महामार्गावर पंचगंगा नदीजवळ सापळा रचून ही कारवाई केली.

अब्दुल मौला मुल्ला (वय २०) आणि निखिल राजू बागडी (वय २०, दोघे रा. गणेशनगर, रुकडी, ता. हातकणंगले) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील दागिने आणि चोरीसाठी वापरलेली दुचाकी असा साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

पेठ वडगाव आणि शिंगणापूर येथे झालेल्या चेन स्नॅचिंगचा तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला रुकडी येथील सराईत चोरट्यांची माहिती मिळाली होती. संशयित अब्दुल मुल्ला आणि निखिल बागडी हे दोघे पुणे-बेंगळुरू महामार्गावर शिरोली पुलाच्या गावच्या हद्दीतील पीर बालेसाहेब बाबा दर्ग्याजवळ येणार असल्याचे समजले. त्यानुसार सापळा रचून मंगळवारी दुपारी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

अंगझडतीत त्यांच्याकडे दहा ग्रॅम सोने मिळाले. अधिक चौकशीत त्यांनी पेठ वडगाव, शिंगणापूर आणि लांजा (जि. रत्नागिरी) येथे महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावल्याची कबुली दिली. तसेच आकुर्डे, मठगाव (ता. भुदरगड) आणि खोतवाडी (ता. हातकणंगले) येथील मंदिरांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील दागिने आणि चोरीसाठी वापरलेली दुचाकी जप्त केली. चोरीचे सहा गुन्हे त्यांनी वर्षभरात केले. दोन्ही संशयितांना पेठ वडगाव पोलिसांच्या ताब्यात दिले असून, त्यांच्या चौकशीत आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.

यांनी केला तपास

पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक संदीर जाधव, शेष मोरे, अंमलदार सुरेश पाटील, सागर माने, राजू कांबळे, विनोद कांबळे, रामचंद्र कोळी, सतीश जंगम, आदींच्या पथकाने तपास करून संशयितांना अटक केली.

Web Title: Two thieves who stole ornaments from the temple were arrested in kolhapur, six crimes were solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.